

क्रिकेटचा खेळ हा केवळ चुरशीच्या लढतींसाठी नाही, तर अनेकदा मैदानावर घडणाऱ्या मजेशीर प्रसंगांसाठीही लक्षात राहतो. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चाहत्यांनी सुरक्षा कडे तोडून मैदानात घुसल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे, ज्यांना 'पिच इनवेडर' म्हटले जाते. मात्र, आयर्लंडमधील एका स्थानिक महिला क्रिकेट सामन्यात असा एक 'इनवेडर' मैदानात शिरला, ज्याने खेळाडूंचीच नाही तर संपूर्ण जगाची मने जिंकली. हा नवा पाहुणा दुसरा कोणी नसून एक गोंडस कुत्रा होता, ज्याने चक्क चेंडूच आपल्या ताब्यात घेतला.
ही घटना आयर्लंडमधील सीएसएनआई (CSNI) आणि ब्रेडी (Bready) क्रिकेट क्लब यांच्यात सुरू असलेल्या सामन्यादरम्यान घडली. सीएसएनआई संघाच्या फलंदाजीचा ९ वा ओव्हर सुरू असताना, फलंदाज एब्बी लेकीने एक सुरेख शॉट मारला.
फिल्डरने चेंडू अडवून तो विकेटकीपरकडे फेकला, पण त्याच क्षणी एका कुत्र्याने मैदानात जोरात धाव घेतली. हा कुत्रा इतका चपळ होता की, यष्टीरक्षक चेंडू पकडण्यापूर्वीच त्याने तो आपल्या जबड्यात घट्ट धरला.
ब्रेडी संघाची यष्टीरक्षक राचेल हेपबर्न हिने चेंडू उचलून फलंदाजाला धावबाद करण्याचा प्रयत्न केला, पण तिला अपयश आले. तिथेच कुत्र्याची खरी करामत सुरू झाली. या पाहुण्या फिल्डरने चेंडू तोंडात पकडून मैदानावर पळायला सुरुवात केली. गळ्यात लाल पट्टा असलेला हा कुत्रा कोणत्याही खेळाडूच्या हाती लागत नव्हता. जेव्हा तो चेंडू घेऊन थेट खेळपट्टीवर पोहोचला, तेव्हा तिथे उभी असलेली फलंदाज ओइफी फिशर त्याला प्रेमाने कुरवाळताना दिसली.
अखेर या कुत्र्याचा मालक मैदानात धावत आला आणि त्याने मोठ्या मुश्किलीने त्याच्याकडून चेंडू सोडवला. हा मजेशीर प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. आयसीसीनेही या घटनेची दखल घेत त्याला 'बेस्ट फिल्डर' म्हणून संबोधले आहे. चेंडू एखाद्या डिंकाप्रमाणे कुत्र्याच्या जबड्याला चिकटला होता, हे पाहून मैदानातील खेळाडू आणि प्रेक्षक पोट धरून हसताना दिसले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.