

Dipendra Singh Airee ODI Century: सध्या भारतात आयपीएल 2026 चा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच, दुसरीकडे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटच्या मैदानातून एक अत्यंत थक्क करणारी बातमी समोर आली. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग दोन वेळा 6 चेंडूत 6 षटकार मारण्याचा अचाट पराक्रम गाजवणाऱ्या नेपाळच्या दीपेंद्र सिंह ऐरी याने आता एकदिवसीय (ODI) क्रिकेटमध्येही आपली ताकद सिद्ध केली. 1 मे रोजी आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप लीग 2च्या क्वालिफायर सामन्यात संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध खेळताना ऐरीने शानदार शतक झळकावले आणि नेपाळ क्रिकेटच्या इतिहासात एका खास विक्रमाची नोंद केली.
कीर्तिपूर येथे नेपाळ (Nepal) आणि युएई दरम्यान पार पडलेल्या या अटीतटीच्या लढतीत दीपेंद्र सिंह ऐरी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. त्याने आपल्या खेळीत अत्यंत संयम आणि आक्रमकता यांचा योग्य मेळ घालत 94 चेंडूंमध्ये 100 धावांची नाबाद खेळी साकारली. त्याच्या या खेळीत 13 चौकार आणि 1 उत्तुंग षटकाराचा समावेश होता. या शतकी खेळीच्या जोरावर ऐरीने नेपाळसाठी एकदिवसीय क्रिकेटमधील 'अनोखी हॅटट्रिक' पूर्ण केली. सलग तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये 50 पेक्षा जास्त धावा करणारा तो नेपाळचा पहिला आणि एकमेव फलंदाज ठरला.
दीपेंद्र सिंह ऐरीच्या या ऐतिहासिक कामगिरीचा प्रवास याच मैदानावर सुरु झाला होता. त्याने युएई विरुद्धच्या शतकापूर्वी ओमान विरुद्ध 60 धावांची आणि त्याआधीच्या सामन्यात 75 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली होती. अशाप्रकारे लागोपाठ तीन सामन्यांत मोठी धावसंख्या उभारुन त्याने नेपाळच्या फलंदाजीचा कणा आपणच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. ऐरी सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये असून त्याच्या या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे जागतिक क्रिकेट वर्तुळात नेपाळच्या क्रिकेटची चर्चा रंगली आहे. टी-20 मध्ये आपल्या फटकेबाजीने सर्वांना थक्क करणाऱ्या ऐरीने आता एकदिवसीय क्रिकेटमध्येही आपली पकड मजबूत केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.