पणजी : गतविजेत्या मुंबई सिटी एफसीने करारबद्ध केल्यामुळे ब्राझीलियन आघाडीपटू दिएगो मॉरिसियो याला आठव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल (football) स्पर्धेत पुनरागमन करण्याची संधी लाभली. तो स्पर्धेसाठी गोव्यात (goa) दाखल झाला असून कोविडविषयक सक्तीचे विलगीकरण संपवून मुंबईच्या संघात रुजू होईल.
मुंबई सिटीने मॉरिसियोशी 31 मेपर्यंत करार केला आहे. या कालावधीत तो आयएसएल स्पर्धेतील बाकी सामने, तसेच एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेत खेळेल. गतमोसमात (2020-21) तो ओडिशा एफसीतर्फे आयएसएल स्पर्धेत खेळला होता.
मुंबई सिटीचे मुख्य प्रशिक्षक डेस बकिंगहॅम यांनी नव्या खेळाडूचे संघात स्वागत केले आहे. त्याचा या स्पर्धेतील मागील अनुभव क्लबसाठी फायदेशीर ठरेल, असे त्यांनी नमूद केले. मुंबई सिटीशी करार करण्यापूर्वी मॉरिसियोने कतारमधील द्वितीय विभागीय संघ अल शाहानियाकडून खेळताना नऊ सामन्यांत आठ गोल नोंदविले.
मुंबई सिटीचा ब्राझीलियन खेळाडू य्गोर कातातौ याने संघ सोडण्याचे ठरविल्यामुळे परदेशी खेळाडूची एक जागा रिक्त झाली होती. कातातौ याने 11 सामन्यांत तीन गोल केले होते. तो मादुरैरा एस्पोर्ते या आपल्या मूळ संघात परतला आहे. ‘‘भारतात पुन्हा परतताना मला आनंद झाला असून गतविजेत्या मुंबई सिटीशी करार केल्यामुळे खूष आहे.
आयएसएलमधील गतमोसमातील अनुभव चांगला होता, तरीही भारतात मला अजून भरपूर काही साध्य करायचे आहे. मुंबई सिटीसारख्या संघात दाखल झाल्यामुळे अपेक्षाही वाढल्या आहेत. मैदानात उतरण्यासाठी मी सज्ज आहे,’’ असे मॉरिसियो याने सांगितले. गतमोसमातील 20 आयएसएल सामन्यांत त्याने 12 गोल व 2 असिस्टची नोंद केली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.