वूमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत 15 वा सामना शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध युपी वॉरियर्स संघात पार पडला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात युपी वॉरियर्सने 1 धावेने रोमांचक विजय मिळवला.
या सामन्यात युपी वॉरियर्ससाठी दिप्ती शर्माने हॅट्रिक घेत इतिहास रचला. दिप्ती डब्ल्युपीएलमध्ये हॅट्रिक घेणारी पहिलीच भारतीय गोलंदाज ठरली आहे.
या सामन्यात युपीने दिल्लीसमोर 139 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची कर्णधार मेग लेनिंगने शानदार सुरुवात दिली होती. तिने अर्धशतकही केले. ती मैदानावर असेपर्यंत दिल्लीचे सामन्याच वर्चस्व होते.
परंतु, डावाच्या 14 व्या षटकात दिप्ती शर्मा गोलंदाजी करत होती. तिने या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर दिप्तीने लेनिंगला 60 धावांवर पायचीत केले. त्यानंतर युपीची कर्णधार एलिसा हेलीने दिप्तीकडे 19 व्या षटकात गोलंदाजीसाठी चेंडू सोपवला. हे दिप्तीचे चौथे षटक होते.
तसेच सामन्यातील महत्त्वाचे षटक होते. कारण अखेरच्या 12 चेंडूत दिल्लीला अवघ्या 15 धावांची गरज होती आणि त्यांच्या हातात 6 विकेट्स होत्या. परंतु, दिप्तीने 19 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ऍनाबेल सदरलँड हिला 6 धावांवर त्रिफळाचीत केले. त्याच्या पुढच्याच चेंडूवर तिने अरुंधती रेड्डीला ग्रेस हॅरिसच्या हातून शुन्यावर झेलबाद केले.
तिने 14 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवरही विकेट घेतली असल्याने तिने 19 व्या षटकातील पहिल्या दोन चेंडूवरही विकेट घेत हॅट्रिक पूर्ण केली. महत्त्वाचे म्हणजे 19 व्या षटकातच तिने चौथ्या चेंडूवरही शिखा पांडेलाही आपल्याच गोलंदाजीवर झेल घेत बाद केले.
त्यामुळे एकाच षटकात 3 विकेट्स गेल्याने दिल्ली संघ अडचणीत सापला. अखेरच्या षटकात ग्रेस हॅरिसने शानदार गोलंदाजी करत दिल्लीला विजयापासून अवघ्या 1 धावेने रोखले. या सामन्यात दिल्लीला 139 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 19.5 षटकात सर्वबाद 137 धावाच करता आल्या.
दिप्तीने या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या युपी वॉरियर्सकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 48 चेंडूत सर्वाधिक 59 धावांची खेळीही केली होती. त्यामुळे युपीने 20 षटकात 8 बाद 138 धावा केल्या होत्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.