MS Dhoni Painting Chairs: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेला 31 मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे काही दिवसांचाच कालावधी राहिलेला असताना संघांबरोबरच आयोजक स्टेडियम्सनेही अंतिम तयारीला सुरुवात केली आहे. याच तयारीदरम्यान चक्क भारताचा दिग्गज कर्णधार आणि यष्टीरक्षक एमएस धोनी देखील स्टेडियममधील खुर्च्यांना रंग देताना दिसला आहे.
धोनी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार असून हा संघ सध्या चेन्नईत आयपीएल 2023 ची तयारी करत आहे. यादरम्यान चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर देखील सामने होणार असल्याने त्याचीही तयारी सध्या सुरू आहे.
या तयारीत धोनीनेही त्याचा मदतीचा हात दिला आहे. त्याने या स्टेडियममध्ये प्रेक्षकांसाठी ठेवलेल्या खुर्च्यांना स्प्रेने पिवळा आणि निळा रंग दिला आहे. तो या कामाचा आनंदही घेताना दिसला आहे.
यावेळी धोनी असेही म्हणताना दिसला की 'डेफिनेटली लुकिंग यल्लोव्ह'. तसेच स्प्रे काम करत आहे आणि गडद रंग देणे सोपे असल्याचेही तो कोणाला तरी सांगत असल्याचे दिसले. यावेळी धोनीबरोबर सीएसकेचे मॅनेजर रसेल राधाकृष्णन देखील होते.
या घटनेचा व्हिडिओ सीएसकेने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांच्या विविध प्रतिक्रिया येत असून त्यांनी धोनीच्या या भूमिकेलाही पसंती दिली आहे.
दरम्यान, सीएसके चेन्नईत अखेरच्या वेळी 2019 मध्ये आयपीएलचा सामना खेळला होता. त्यानंतर कोरोनाच्या कारणामुळे सीएसकेला चेन्नईत सामना खेळता आला नव्हता. पण आता पुन्हा एकदा आयपीएल होम-अवे पद्धतीने होणार आहे म्हणजेच प्रत्येक संघ त्यांच्या घरच्या मैदानावर आणि प्रतिस्पर्धीच्या मैदानावर सामने खेळणार आहे.
त्यामुळे सीएसकेचे घरचे सामने यंदा चेन्नईतच होणार आहेत. त्यामुळे चेन्नईतील प्रेक्षकांना तीन वर्षांनंतर सीएसकेला प्रत्यक्ष पाहाता येणार आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की एमए चिदंबरम स्टेडियमचे नुतनीकरण करण्यात आले आहे. तसेच गेल्या काही वर्षांपासून काही कायदेशीर प्रकरणांमुळे बंद असलेले स्टँडही यंदा खुले करण्यात आले आहेत.
चेन्नईमध्ये सीएसकेचा पहिला सामना ३ एप्रिल रोजी लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्ध होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.