I-League : कामगिरीत सातत्य नसल्याने गोव्याच्या चर्चिल ब्रदर्सला आय-लीग फुटबॉल स्पर्धेत नुकसान सोसावे लागले असून त्यांची नवव्या क्रमांकावर घसरण झाली. पुढील लढतीत त्यांच्यासमोर मागील सलग तीन सामने जिंकलेल्या हैदराबादच्या श्रीनिदी डेक्कन संघाने खडतर आव्हान असेल. सामना सोमवारी (ता. 28) पश्चिम बंगालमधील कल्याणी येथे खेळला जाईल. (Churchill Brothers need consistency in I-League football)
चर्चिल ब्रदर्सने मागील लढतीत ऐजॉल एफसीला नमवून स्थिती थोडीफार सुधारली. त्यांचे सात लढतीनंतर सात गुण झाले आहेत. मागील पाच लढतीत त्यांनी तीन पराभव पत्करले असून दोन सामने जिंकले आहेत. आक्रमणातील धार आणि अचूक नेमबाजी राखल्यास माजी आय-लीग विजेत्यांना हैदराबादमधील संघाला धक्का देणे शक्य होईल. ‘‘आम्हाला सांघिक पातळीवर योगदान द्यावे लागेल. खेळाडूंतील समन्वय दिवसागणिक सुधारतोय. मैदानावर जाऊन गोलधडाका राखणे आमच्यासाठी अत्यावश्यक आहे,’’ असे मत चर्चिल ब्रदर्सचे सहाय्यक प्रशिक्षक मातेस कॉस्ता यांनी व्यक्त केले. श्रीनिदी डेक्कन संघ तांत्रिकदृष्ट्या मजबूत असला, तरी आम्हाला नियोजनबद्ध खेळत तीन गुणांवर लक्ष्य केंद्रित करावे लागेल, असेही कॉस्ता यांनी नमूद केले.
श्रीनिदी डेक्कनचे स्पॅनिश प्रशिक्षक फर्नांडो सांतियागो गतमोसमात चर्चिल ब्रदर्सचेही प्रशिक्षक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्यातील संघाने उपविजेतेपद मिळविले होते. आता या प्रशिक्षकाचे आय-लीगमधील नव्या संघास मार्गदर्शन लाभत असून यांनी सात लढतीतून 13 गुणांची कमाई करत तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे. पहिल्या क्रमांकावरील मोहम्मेडन स्पोर्टिंगचे 16, तर गतविजेत्या गोकुळम केरळाचे 14 गुण झाले आहेत. श्रीनिदी डेक्कनने मागील सलग तीन सामने जिंकून मुसंडी मारली. अगोदरच्या लढतीत त्यांनी इंडियन ॲरोजला हरविले. चर्चिल ब्रदर्सलाही नमविल्यास हैदराबादच्या संघाला अव्वल स्थानाची संधी राहील.
दृष्टिक्षेपात...
- श्रीनिदी डेक्कनच्या डेव्हिड मुनोझ याचे 6, तर चर्चिल ब्रदर्सच्या केनेथ इकेचुक्वू याचे 5 गोल
- स्पर्धेत आतापर्यंत श्रीनिदी डेक्कनचे 12 गोल, तर तुलनेत चर्चिल ब्रदर्सचे 6 गोल
- श्रीनिदी डेक्कनचे 4 विजय, 1 बरोबरी, 2 पराभव
- चर्चिल ब्रदर्सचे 2 विजय, 1 बरोबरी, 4 पराभव
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.