Indian Super League: चेन्नईयीनने पिछाडीवरुन मारली विजयी मुसंडी

आठव्या इंडियन सुपर लीग (Indian Super League) फुटबॉल स्पर्धेत शनिवारी दोन वेळच्या माजी विजेत्यांना 2-1 असा विजय नोंदविता आला. सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला.
Indian Super League: चेन्नईयीनने पिछाडीवरुन मारली विजयी मुसंडी

पणजी: नॉर्थईस्ट युनायटेडने पूर्वार्धात आघाडी घेतली, पण चेन्नईयीन एफसीने नंतर जोरदार मुसंडी मारत उत्तरार्धात सहा मिनिटांत दोन गोल केले. त्यामुळे आठव्या इंडियन सुपर लीग (Indian Super League) फुटबॉल स्पर्धेत शनिवारी दोन वेळच्या माजी विजेत्यांना 2-1 असा विजय नोंदविता आला. सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. (Chennaiyin Defeated Northeast United In The ISL Match)

लाल्डानमाविया राल्टे याने 35व्या मिनिटास नॉर्थईस्ट युनायटेडसाठी (Northeast United) गोल केला. नंतर 52व्या मिनिटास एरियल बोरीसियूक याने चेन्नईयीनची पिछाडी भरून काढली, तर 58व्या मिनिटास व्लादिमीर कोमनच्या फ्रीकिक गोलमुळे चेन्नईयीनला आघाडी मिळाली. शेवटच्या पाच मिनिटांत नॉर्थईस्टने बरोबरीसाठी कसोशीने प्रयत्न केले, पण सदोष नेमबाजी, तसेच गोलपोस्टचा अडथळा यामुळे त्यांना गुण हुकला.

दरम्यान, चेन्नईयीन एफसीचा 12 लढतीतील पाचवा विजय ठरला. त्यांचे आता 18 गुण झाले असून ते तिसऱ्या क्रमांकावर आले आहेत. नॉर्थईस्ट युनायटेडवर 13व्या लढतीत आठव्या पराभवाची नामुष्की आली. त्यामुळे नऊ गुणांसह ते शेवटच्या अकराव्या क्रमांकावर कायम राहिले. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातही चेन्नईयीनने नॉर्थईस्टला 2-1 फरकानेच हरविले होते.

तसेच, सामन्यातील गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडण्याचा मान नॉर्थईस्ट युनायटेडने मिळविला. अर्ध्या तासाच्या खेळानंतर पॅट्रिक फ्लॉटमन याच्या कॉर्नर फटक्यावर चेन्नईयीनचा गोलरक्षक देबजित मजुमदार याचा अंदाज चुकला आणि लाल्डानमाविया राल्टे याने संधी साधली. उत्तरार्धात सहा मिनिटांत दोन गोल नोंदवून चेन्नईयीनने सामन्याचे पारडे बदलले. दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या पोलंडच्या एरियल बोरीसियूक याने चेन्नईयीनला बरोबरी साधून दिली. या तीस वर्षीय खेळाडूचा हा आयएसएल स्पर्धेतील पहिलाच गोल ठरला.

शिवाय, रहीम अलीच्या असिस्टवर बोरीसियूक याचा फटका नॉर्थईस्टच्या सेहनाज सिंग याला लागला आणि त्यामुळे गोलरक्षक मिर्शाद मिचू याचा गोंधळ उडाला. त्यानंतर थेट फ्रीकिकवर व्लादिमीर कोमन याने नॉर्थईस्टचा गोलरक्षक मिर्शाद याला अजिबात संधी दिली नाही. यामुळे चेन्नईयीनला आघाडी मिळाली. चेंडू गोलपोस्टला लागून नेटमध्ये गेला. यावेळी नॉर्थईस्टच्या माशूर शरीफ याने चेन्नईयीनचा कर्णधार अनिरुद्ध थापा याला अडथळा आणल्याबद्दल रेफरीने फ्रीकिक फटक्याची खूण केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com