Mukesh Choudhary ruled out of IPL 2023: इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या हंगामाला 31 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या हंगामाचा सलामीचा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. पण या सामन्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का बसला आहे.
चेन्नई सुपर किंग्सचा युवा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी दुखापतीमुळे आयपीएल 2023 स्पर्धेतून बाहेर झाला असल्याचे समोर आले आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज असलेला मुकेश सीएसकेसाठी महत्त्वाचा गोलंदाज होता. त्याने गेल्यावर्षी दीपक चाहरच्या अनुपस्थितीत सीएसकेसाठी दमदार कामगिरी केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार मुकेश सध्या पाठीच्या दुखापतीतून सावरत आहे. तसेच तो बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये उपचार घेत आहे. दरम्यान, सीएसकेने अद्याप मुकेशच्या बदली खेळाडूची घोषणा केलेली नाही.
सीएसकेने मुकेशला आयपीएल 2022 लिलावादरम्यान 20 लाखाच्या त्याच्या मुळ किमतीत खरेदी केले होते. त्यानेही त्याच्यावरील विश्वास कायम ठेवत गेल्यावर्षी सीएसकेसाठी 13 सामने खेळताना 26.50 च्या सरासरीने 16 विकेट्स घेतल्या होत्या.
सीएसकेने आयपीएल 2023 साठी खरेदी केलेला न्यूझीलंडचा अष्टपैलू काईल जेमिसनही दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्याच्याऐवजी सीएसकेने सिसांडा मंगला या दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूला संघात सामील करून घेतले आहे.
दरम्यान, सीएसके यंदा तीन वर्षांनी चेन्नईतील त्यांच्या घरच्या मैदानावर म्हणजेच एमए चिदंबरम स्टेडियमवर आयपीएलचे सामने खेळताना दिसणार आहे. त्यांना गेल्या तीन वर्षात कोरोनाच्या कारणाने चेन्नईत आयपीएल सामने खेळता आले नव्हते.
आयपीएल 2023 साठी सीएसके संघ - डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायडू, मोईन अली, बेन स्टोक्स, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार/यष्टीरक्षक), ड्वेन प्रिटोरियस, दीपक चाहर, सिमरजीत सिंग, अजिंक्य रहाणे, शुभ्रांशू सेनापती, शेख रशीद, निशांत सिंधू, मिचेल सँटनर, भगत वर्मा, तुषार देशपांडे, राजवर्धन हंगारगेकर, अजय जाधव मंडल, मथीशा पाथीराना, महिश तिक्षणा, प्रशांत सोळंकी, सिसांडा मंगला
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.