Vinod Kambli Birthday: 9 वेळा कमबॅकची संधी, 7 सामन्यात दोन द्विशतके, तरी 28 व्या वर्षीच संपले करियर

प्रतिभा असूनही मोठी कारकिर्द विनोद कांबळी घडवू शकला नाही, वाचा त्याच्या क्रिकेट प्रवासाबद्दल.
Vinod Kambli
Vinod Kambli Dainik Gomantak
Published on

Vinod Kambli Birthday: भारताला आजपर्यंत अनेक प्रतिभाशाली क्रिकेटपटू मिळाले आहेत. यामध्ये विनोद कांबळीचाही समावेश आहे. मात्र त्याला भारतीय संघात फार काळ त्याचे स्थान टिकवता आले नाही. तरी विनोद कांबळीचे भारतीय क्रिकेटमध्ये योगदान लक्षात राहाण्यासारखे राहिले. त्याचा आज 51 वा वाढदिवस आहे. त्याचनिमित्ताने त्याच्या क्रिकेटमधील प्रवासावर टाकलेली एक नजर.

विनोद कांबळीचा जन्म मुंबईत 18 जानेवारी 1972 रोजी इंदिरा नगरमध्ये झाला. त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थितीत तशी फारशी चांगली नव्हती. पण कांबळीने हार न मानता क्रिकेटमध्ये कारकिर्द घडवण्याचे ठरवले. यात तो यशस्वीही झाला.

Vinod Kambli
Vinod KambliDainik Gomantak

या दरम्यान, शालेय जीवनात शारदाश्रम शाळेत असताना त्याची मैत्री सचिन तेंडुलकरशी झाली. या दोघांनीही रमाकांत आचरेकर सरांकडून क्रिकेटचे धडे गिरवले. हे दोघेही त्यांच्या शालेय संघाचे भक्कम आधारस्तंभ बनले. त्यांची मैत्रीही चांगली फुलली.

त्यांनी शारदाश्रम शालेय संघाकडून खेळताना सेंट झेवियर्स संघाविरुद्ध 664 धावांची विक्रमी भागीदारीही केली होती. या भागीदारीदरम्यान एकट्या कांबळीने नाबाद 349 धावा केल्या होत्या. त्यानंतर कांबळी आणि सचिन दोघेही प्रकाशझोतातही आले होते.

Vinod Kambli
Vinod KambliDainik Gomantak

पुढे जाऊन या दोघांनाही मुंबई संघात संधी मिळाली. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी सचिनला आधी मिळाली. सचिनने 1989 साली भारतासाठी मैदानात पाऊल ठेवले, तर कांबळीला यासाठी 1991 सालची वाट पाहावी लागली. त्याने 1991 मध्ये पाकिस्तानविरुद्ध शारजाहमध्ये झालेल्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.

त्यानंतर त्याने त्याच्या 21 व्या वाढदिवसाला म्हणजेच 18 जानेवारी 1993 रोजी इंग्लंडविरुद्ध जयपूर येथे नाबाद 100 धावांची शतकी खेळी केली. त्यावेळी तो वाढदिवसाच्या दिवशी वनडे शतक करणारा पहिलाच खेळाडूही ठरला होता.

Vinod Kambli
Vinod KambliDainik Gomantak

पुढे लगेचच 1993 साली त्याचे इंग्लंडविरुद्धच कसोटी पदार्पणही झाले. त्याने कसोटीत सुरुवातीलाच धमाकेदार कामगिरी करत त्याच्यात असलेल्या क्षमतेची सर्वांना ओळख पटवून दिली. त्याने पहिल्या सात सामन्यांत तब्बल 4 शतके केली. यातील दोन द्विशतके होती. त्यामुळे तो कसोटीत सर्वात जलद 1000 धावा करणारा भारतीय फलंदाजही ठरला. त्याने 14 डावात 1000 कसोटी धावा पूर्ण केल्या होत्या.

पण, कांबळीला जेवढे यश झटपट मिळत गेले, तेवढी प्रसिद्धीही झटपट मिळाली. या प्रसिद्धीच्या झोताने मात्र त्याच्या कारकिर्दीला ब्रेक लागला. तो त्याच्या मैदानातील कामगिरीबरोबरच मैदानाबाहेरील कामगिरीमुळेही चर्चेत येऊ लागला.

Vinod Kambli
Vinod KambliDainik Gomantak

दरम्यान, त्याची कसोटी कारकिर्दीची सुरुवात दमदार झाली असली तरी फार मोठी होऊ शकली नाही. तो त्याचा अखेरचा कसोटी सामना 1995 साली वयाच्या 23 व्या वर्षीच खेळला.

वनडे क्रिकेट कारकिर्द त्याची 9 वर्षांची राहिली. यादरम्यान त्याला 9 वेळा पुनरागमनाची संधी मिळाली, असे म्हटले जाते. पण तरीही तो कामगिरीत सातत्य ठेऊ न शकल्याने वनडे संघातही स्थान टिकवू शकला नाही. त्याने 2000 साली वयाच्या २८ व्या वर्षी अखेरचा वनडे सामना खेळला.

दरम्यान तो नंतर 2004 सालापर्यंत देशांतर्गत क्रिकेट खेळत होता. त्याने अखेर 2009 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आणि 2011 साली क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्ती जाहीर केली.

Vinod Kambli with Family
Vinod Kambli with FamilyDainik Gomantak

निवृत्तीनंतर तो अनेकदा आर्थिक अडचणीतही सापडला. त्याचबरोबर त्याचे काही वादही समोर आले होते. यामुळे तो सातत्याने चर्चेतही राहिला. त्याने दोन वेळा लग्नही केले. त्याने नोएल लुईसबरोबर 1998 साली पहिले लग्न केले होते. पण त्याचे हे लग्न फार काळ टिकले नाही आणि त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्याने अँड्रिया हेविटबरोबर लग्न केले. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी देखील आहे.

Vinod Kambli
Vinod KambliDainik Gomantak

कांबळीने त्याच्या कारकिर्दीत 17 कसोटी सामन्यांत 54.20 च्या सरासरीने ४ शतके आणि ३ अर्धशतकांसह 1084 धावा केल्या. तसेच 104 वनडे सामन्यांमध्ये त्याने 32.59 च्या सरासरीने 2477 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 2 शतकांचा आणि 14 अर्धशतकांचा समावेश होता.

त्याचबरोबर त्याने 129 प्रथम श्रेणी सामने खेळले असून यामध्ये 35 शतके आणि 44 अर्धशतकांसह 9965 धावा केल्या आहेत. तसेच 221 लिस्ट ए सामन्यांत 6476 धावा केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com