Rohit Sharma on 100th Test Match against West Indies: वेस्ट इंडिज दौऱ्यावर सध्या भारतीय क्रिकेट संघ आहे. या दौऱ्यात भारतीय संघ यजमान वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील दुसरा सामना गुरुवारपासून (20 जुलै) त्रिनिदादमधील पोर्ट ऑफ स्पेन येथील क्विन्स पार्क ओव्हल येथे सुरू होणार आहे.
हा सामना भारत आणि वेस्ट इंडिज संघांसाठी खास आहे. कारण हा दोन्ही संघात होणारा 100 वा कसोटी सामना आहे. याबद्दल भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या प्रतिक्रियेचा व्हिडिओही बीसीसीआयने शेअर केला आहे.
रोहित म्हणाला, 'हा मोठा क्षण आहे. दोन्ही संघातील 100 वा सामना आहे. दीर्घकाळापासून हे दोन संघ एकमेकांविरुद्ध खेळत असल्याने इतिहास मोठा आहे. माझा तर जन्मही नव्हता झाला, तेव्हापासून सामने सुरु आहेत. त्यामुळे तुम्ही कल्पना करू शकता की इतिहास किती मोठा आहे.'
'दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध खूप सामने खेळले आहेत आणि प्रेक्षकांचेही बरीच वर्षे मनोरंजन करत आहेत. त्यामुळे आता आहे की हा सामनाही असाच असेल.'
त्याचबरोबर या ऐतिहासिक सामन्यात भारताचे नेतृत्व करणारा रोहित म्हणाला, 'या सामन्यात भारताचे नेतृत्व करणे, ही अभिमानाची गोष्ट आहे. हा ऐतिहासिक सामना आहे आणि रोज असे घडत नाही. मी भाग्यवान आहे.'
भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध चालू कसोटी मालिकेतील डॉमिनिकाला झालेला पहिला कसोटी सामना 1 डाव आणि 141 धावांनी जिंकला होता. त्यामुळे दुसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार का असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
याबद्दल रोहित म्हणाला, 'डॉमिनिकामध्ये आम्हाला खेळपट्टी पाहिल्यानंतर आणि परिस्थिती पाहून संघाच्या संयोजनाबद्दल स्पष्ट माहित होतं. पण इथे आम्हाला फारशी स्पष्टता नाही, कारण पावसाचीही शक्यता असल्याचे म्हटले जात आहे. पण मला वाटत नाही की फारसा मोठा बदल होईल. पण जी काही परिस्थिती असेल, ते पाहून आम्ही निर्णय घेऊ.'
इतकेच नाही, तर रोहितने भविष्यात भारतीय संघात बदल होतील असेही सांगितले. तो म्हणाला, 'आज किंवा उद्या, पण संक्रमण होणारच आहे. पण मी खूश आहे की जे खेळाडू येत आहेत, ते चांगली कामगिरी करत आहेत. आमची भूमिका महत्त्वाची आहे की आम्ही त्यांना त्यांच्या भूमिकेबद्दल स्पष्टता देऊ.'
'आता हे त्यांच्यावर आहे की ते कशी तयारी करतात आणि संघासाठी कशी कामगिरी करतात. आणि आम्ही त्या खेळाडूंवर अवलंबून आहोत, ते भारतीय क्रिकेटचे भविष्य आहेत. ते भारतीय क्रिकेटला आणखी उंचीवर नेणार आहेत.'
यापूर्वी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 99 कसोटी सामने झाले आहेत. या 99 सामन्यांपैकी भारतीय संघाने 23 सामने जिंकले आहेत, तसेच 30 सामने पराभूत झाले आहेत. याशिवाय 46 सामने अनिर्णित राहिले आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.