BCCI Secretary Jay Shah: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) अध्यक्षपदी न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले यांची दुसऱ्यांदा एकमताने निवड करण्यात आली. बोर्डाच्या बैठकीत, बार्कले व्यतिरिक्त, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांची आयसीसीच्या शक्तिशाली वित्त आणि व्यावसायिक व्यवहार समितीच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. बार्कले यांचा कार्यकाळ 2 वर्षांचा असेल. झिम्बाब्वेच्या तवेंगवा मुकुहलानी यांनी माघार घेतल्याने बार्कले यांची बिनविरोध निवड झाली आहे. आयसीसी बोर्डाने बार्कले यांच्या पूर्ण समर्थनाची पुष्टी केली आहे.
जय शहा यांच्याकडे जबाबदारी आली
जय शाह (Jai Shah) यांच्याकडे आयसीसीच्या सर्वात महत्त्वाच्या समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ही समिती सर्व प्रमुख आर्थिक धोरणासंबंधी निर्णय घेते, त्यानंतर ICC बोर्ड त्यांना मान्यता देते. वित्त आणि व्यावसायिक व्यवहार समितीचे अध्यक्ष नेहमीच आयसीसी बोर्ड सदस्य असतात. आता, शाह यांच्या निवडीवरुन हे स्पष्ट होते की ते आयसीसी बोर्डावर बीसीसीआयचे प्रतिनिधित्व करतील.
महसूल वाटणीचा समावेश आहे
आयसीसीच्या (ICC) एका सूत्राने गोपनीयतेच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, 'प्रत्येक सदस्याने जय शाह यांना वित्त आणि व्यावसायिक व्यवहार समितीचे प्रमुख म्हणून स्वीकारले आहे. ICC चेअरमन व्यतिरिक्त ही तितकीच शक्तिशाली उपसमिती आहे. या समितीच्या कामात सदस्य देशांमधील महसूल वाटणीचा समावेश आहे.'
गांगुली हे गेल्या वर्षीपर्यंत सदस्य होते
एन श्रीनिवासन यांच्या काळात या समितीचे प्रमुखपद भारताकडे होते, परंतु शशांक मनोहर यांच्या आयसीसी अध्यक्षपदाच्या कार्यकाळात बीसीसीआयची ताकद खूपच कमी झाली होती. तर, प्रशासक समितीच्या कार्यकाळातही अशीच वेळ आली होती. जेव्हा बीसीसीआयला वित्त आणि व्यावसायिक व्यवहार समितीमध्ये कोणतेही प्रतिनिधित्व नव्हते. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) गेल्या वर्षीपर्यंत या समितीचे सदस्य होते.
भारत हा क्रिकेटचा केंद्रबिंदू आहे
आयसीसीच्या एका सूत्राने सांगितले की, "भारत हे जागतिक क्रिकेटचे व्यावसायिक केंद्र असल्याने आणि 70 टक्क्यांहून अधिक प्रायोजकत्व याच प्रदेशातून येत असल्याने, आयसीसीच्या वित्त आणि व्यावसायिक व्यवहार समितीचे अध्यक्षपद नेहमीच बीसीसीआयकडे असणे आवश्यक आहे."
बार्कले चेअरमन झाले
ग्रेग बार्कले यांनी त्यांच्या पुनर्नियुक्तीबद्दल सांगितले की, 'आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड होणे हा एक सन्मान आहे. मला दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी माझ्या सहकारी आयसीसी संचालकांचे आभार मानू इच्छितो.' बार्कले यांना नोव्हेंबर 2020 मध्ये आयसीसीचे अध्यक्ष बनवण्यात आले. ते यापूर्वी न्यूझीलंड क्रिकेटचे अध्यक्ष आणि 2015 मध्ये आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषकाचे संचालक होते. ते बिनविरोध निवडून आले याचा अर्थ त्यांना 17 सदस्यीय मंडळात बीसीसीआयचाही पाठिंबा होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.