Barcelona vs Real Madrid: रविवारी बार्सिलोना एफसी विरुद्ध रिअल मद्रिद संघात स्पॅनिश सुपरकप स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात बार्सिलोनाने 3-1 अशा फरकाने विजय मिळवत विजेतेपद पटकावले. गेल्या 14 महिन्यांपासून बार्सिलोनाचे प्रशिक्षकपद घेतल्यापासूनचे झावी हर्नांडेझ यांच्यासाठी ही पहिलीच ट्रॉफी ठरली.
बार्सिलोनासाठी त्यांच्या कट्टर प्रतिस्पर्धी रिअल मद्रिदविरुद्धच्या विजयाचे गावी, रॉबर्ट लेवान्डोस्की आणि पेड्री हे नायक ठरले. त्यांनी बार्सिलोनाला 14 व्यांदा स्पॅनिश सुपर कप मिळवून दिला. बार्सिलोनाने जवळपास संपूर्ण सामन्यात वर्चस्व ठेवले होते. दरम्यान, या सामन्याच्या सुरुवातीपासूनच बार्सिलोना चांगल्या लयीत दिसले.
या सामन्यात 4-3-3 अशी रणनीतीपेक्षा झावीने मिडफिल्डला ज्यादाचा खेळाडू खेळवून सर्वांना चकीत केले. ज्यामुळे रिअल मद्रिदच्या विनिसियस ज्यूनियरला रोखता येईल. यात बार्सिलोनाला यशही मिळाले, कारण विनिसियस या सामन्यात फार काही करू शकला नाही. पण बार्सिलोनासाठी 18 वर्षीय गावीची कामगिरी महत्त्वाची ठरली. गावीने या सामन्यात एक गोल केला, तसेच दोन असिस्टही केले.
सुरुवातीला दोन्ही संघांनी एकमेकांना तगडी लढत दिली होती. सुरुवातीच्या 30 मिनिटात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. पण अखेर 33 व्या मिनिटाला गावीने डाव्या पायाने गोल करत बार्सिलोनाचे खाते उघडले. त्याला लेवान्डोस्कीने असिस्ट दिला होता.
(Barcelona beat Real Madrid 3-1 in the Spanish Supercup final)
त्यानंतर बारा मिनिटातच म्हणजेच सामन्याच्या 45 व्या मिनिटाला लेवान्डोस्कीने बार्सिलोनासाठी दुसरा गोल नोंदवला. फ्रेंकी डी जोंगने गावीकडे पास दिला, त्यावर गावीने वेगात चेंडूवर नियंत्रण ठेवत लेवान्डोस्कीला पास दिला, ज्यावर त्याने गोल करत बार्सिलोनाला 2-0 अशा आघाडीवर नेले.
दुसऱ्या हाफमध्ये रिअल मद्रिदने ही आघाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला, परंतु बार्सिलोनाने त्यांना गोल करू दिला नाही. 69 व्या मिनिटाला गावीने दिलेल्या पासवर पेड्रीने बार्सिलोनासाठी तिसरा गोल करत रिअल मद्रिदला पूर्णपणे बॅकफुटवर ढकलले. यातून पुनरागमन करणे रिअल मद्रिदसाठी कठीण झाले.
पण असे असले तरी करिम बेंझेमाने भरपाईवेळेत रिअल मद्रिदसाठी गोल केला, पण तोपर्यंत उशीर झाला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.