Bangladesh Women won by 40 runs Against India Women : भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर असून 3 सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. दरम्यान, ढाकाला पार पडलेल्या पहिल्या वनडे सामन्याच भारतीय संघाला बांगलादेश महिला संघाने 40 धावांनी पराभूत केले. त्यामुळे भारतीय संघ मालिकेत 0-1 असा पिछाडीवर पडला आहे.
दरम्यान बांगलादेश महिला संघाचा हा भारताविरुद्धचा पहिलाच वनडे विजय ठरला आहे. बांगलादेश महिला संघाने भारताविरुद्ध पहिला वनडे सामना 2013 साली खेळला होता. त्यानंतर आता पहिल्यांदाच संघाला विजय मिळवता आला आहे.
दरम्यान, हा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे प्रत्येकी 44 षटकांचा करण्यात आला होता. या सामन्यात बांगलादेशने भारतासमोर विजयासाठी 44 षटकात 153 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव 35.5 षटकातच 113 धावांवर संपुष्टात आला.
भारताकडून केवळ दिप्ती शर्माला 20 धावांचा टप्पा गाठता आला. दिप्तीने 20 धावांची खेळी केली. याशिवाय यास्तिका भाटीया आणि अमनज्योत कौर यांनी प्रत्येकी 15 धावांची खेळी केली. याशिवाय कोणालाही खास काही करता आले नाही. त्यामुळे भारतीय संघ 36 षटकांच्या आतच सर्वबाद झाला.
बांगलादेशकडून मुरुफा अख्तरने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच राबेया खानने 3 विकेट्स घेतल्या. त्याशिवाय नाहिदा अख्तर आणि सुलताना खातुन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
तत्पुर्वी या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, बांगलादेश फलंदाजी करत असतानाच पावसाचा व्यत्यय आला. त्यामुळे बराच वेळ सामना थांबला होता. पण नंतर पुन्हा सामन्याला सुरुवात झाली.
या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी वातावरणाचा चांगला फायदा घेत बांगलादेशला 43 षटकातच 152 धावांवर सर्वबाद केले होते. बांगलादेशकडून कर्णधार आणि यष्टीरक्षक निगर सुलतानाने सर्वाधिक 39 धावांची खेळी केली. तसेच फरगणा हकने 27 धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त कोणालाही 20 धावांचा टप्पा पार करता आला नाही.
भारताकडून अमनज्योत कौरने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच देविका वैद्यने 2 विकेट्स घेतल्या, तर दिप्ती शर्माने 1 विकेट घेतली. पण गोलंदाजांच्या चांगल्या कामगिरीचा फायदा फलंदाजांना घेता आला नाही.
दरम्यान, या वनडे मालिकेतील दुसरा सामना 19 जुलैला ढाका येथेच होणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.