Bangladesh vs England: बांगलादेश क्रिकेट संघाने मंगळवारी इंग्लंडविरुद्ध ढाकामध्ये पार पडलेल्या टी20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात 16 धावांनी विजय मिळवत इतिहास रचला आहे. या विजयासह बांगलादेशने इंग्लंडला या टी20 मालिकेत 3-0 असा विजय मिळवला आहे.
हा बांगलादेशचा सध्याचे टी20 वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंडविरुद्ध पहिलाच टी20 मालिका विजय आहे. तसेच त्यांनी पहिल्यांदाच टी20 क्रिकेटमध्ये इंग्लंडला व्हाईटवॉश दिला आहे.
तिसऱ्या टी20 सामन्यात बांगलादेशने इंग्लंडसमोर विजयासाठी 20 षटकात 159 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला 20 षटकात 6 बाद 142 धावाच करता आल्या.
खरंतर, इंग्लंडने पहिली विकेट फिलिप सॉल्टच्या रुपात झटपट गमावली असली, तरी नंतर दुसऱ्या विकेटसाठी डेव्हिड मलान आणि जोस बटलर यांनी चांगली भागीदारी केली होती. त्यांच्यात 95 धावांची भागीदारी झाली होती. त्यामुळे इंग्लंड संघ या सामन्यात पुढे होता. मात्र 14 व्या षटकात इंग्लंडला दुहेरी धक्के बसले.
या षटकात मलान आणि बटलर एकापाठोपाठ बाद झाले. मलानला मुस्तफिजूर रेहमानने 47 चेंडूत ५३ धावांवर खेळत असताना बाद केले. तसेच बटलर 31 चेंडूत 40 धावा करून धावबाद झाला. यानंतर मात्र इंग्लंड सावरू शकला नाही.
बांगलादेशकडून तस्किन अहमद आणि मुस्तफिजूर यांनी 17 आणि 18 व्या षटकात मिळून केवळ 9 धावा दिल्या. 17 व्या षटकात तस्किनने मोईन अली (9) आणि बेन डकेट (11) यांना बाद केले. त्याचबरोबर 19 व्या षटकात कर्णधार शाकिब अल हसनने 4 धावा देत सॅम करनला बाद केले. त्यामुळे इंग्लंडसमोरील आव्हान कठीण झाले.
अखेरच्या षटकात इंग्लंडला 27 धावांची गरज होती, पण 10 धावाच निघाल्या त्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. बांगलादेशकडून तस्किन अहमदने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या, तसेच तन्वीर इस्लाम, शाकिब अल हसन आणि मुस्तफिजूर रेहमान यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
तत्पूर्वी, बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 2 बाद 158 धावा केल्या होत्या. बांगलादेशकडून यष्टीरक्षक फलंदाज लिटन दासने सर्वाधिक 73 धावांची खेळी केली. तसेच नजमुल हुसैन शांतोने नाबाद 47 धावा केल्या, तर रोनी तालुकदारने 24 धावा केल्या. त्याचबरोबर शाकिब 4 धावांवर नाबाद राहिला.
इंग्लंडकडून आदील राशिद आणि ख्रिस जॉर्डन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.