India vs Bangladesh: दुखापतग्रस्त रोहितची झुंज अपयशी; अखेरच्या चेंडुपर्यंत रंगलेल्या सामन्यात बांग्लादेशची भारतावर 5 धावांनी मात

मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी; रोहित शर्माची झुंज अपयशी
Rohit Sharma
Rohit SharmaDainik Gomantak

India vs Bangladesh:India vs Bangladesh: बांग्लादेशविरूद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 272 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने अखेरच्या चेंडुपर्यंत लढत दिली, पण तरीही या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. कर्णधार रोहित शर्मा याने अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत भारतीयांच्या आशा जागवल्या होत्या. पण अखेरच्या चेंडुवर सहा धावांची गरज असताना त्याला षटकार मारणे शक्य झाले नाही.

दरम्यान, हा सामना जिंकून तीन सामन्यांची मालिका बांग्लादेशने खिशात घातली आहे. बांग्लादेशने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. शनिवारी 10 डिसेंबर रोजी या मालिकेतील अखेरचा सामना खेळला जाणार आहे.

Rohit Sharma
IND vs BAN, 2nd ODI: बांगलादेशचा मिराज पुन्हा नडला! शतकासह केला 'हा' वर्ल्ड रेकॉर्ड

भारताची अवस्था 42.2 षटकात 8 बाद 207 धावा अशी झाली असताना दुखऱ्या अंगठ्यानिशी कर्णधार रोहित शर्मा अडचणीत सापडलेल्या भारतासाठी मैदानात उतरला. रोहितने गियर बदलत 46 व्या षटकात दोन षटकार आणि एक चौकार मारत 18 धावा वसूल केल्या. त्याने सामना 24 चेंडूत 41 धावा असा आणला. मात्र बांगलादेशने खुबीने रोहित शर्माला स्ट्राईकपासून दूर ठेवले. मुस्तफिजूरने 48 वे षटक निर्धाव टाकले. यामुळे रोहित स्ट्राईकवर आला त्यावेळी भारताला 12 चेंडूत विजयासाठी 40 धावांची गरज होती.

या शेवटच्या दोन षटकात रोहितने तीन षटकार आणि दोन चौकार लगावले. शेवटच्या तीन चेंडुत 12 धावा असे समीकरण असताना एक चेंडु वाया गेला. त्यानंतरच्या चेंडुवर रोहितने षटकार ठोकला तर अखेरच्या चेंडुवर रोहितला एक धाव घेता आली. पण रोहितच्या खेळपट्टीवर असण्याने सामन्याचा नूर पालटून गेला होता आणि बांग्लादेशच्या गोटात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पण रोहितची झुंज अपयशी ठरली.

Rohit Sharma
IND vs BAN: 'या' चुकीमुळे टीम इंडियाचं झालं मोठं नुकसान, विराट कोहलीला...

बांगलादेशने दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 50 षटकात 7 बाद 271 धावा ठोकल्या होत्या. सामन्याच्या दुसऱ्याच षटकात भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या अंगठ्याला दुखापत झाल्याने त्याने मैदान सोडले होते. त्यामुळे शिखर धवनच्या साथीला विराट कोहली सलामीला आला. मात्र दुसऱ्याच षटकात इबादत हुसैनने त्याचा 5 धावांवर त्रिफळा उडवत भारताला पहिला धक्का दिला. शिखर धवन देखील 8 धावांवर माघारी परतला. श्रेयस अय्यर आणि बढती मिळालेल्या वॉशिंग्टन सुंदरने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र अनुभवी शाकिब अल हसनने 10 व्या षटकात वॉशिंग्टन सुंदरला 11 धावांवर बाद करत भारताला तिसरा धक्का दिला.

मेहदी हसन मिराझने फलंदाजीपाठोपाठ गोलंदाजीतही भारताला धक्के दिले. त्याने भारताचा काळजीवाहू कर्णधार केएल राहुलला 14 धावांवर बाद करत भारताला शंभरच्या आत चौथा धक्का दिला. श्रेयस अय्यरने अक्षर पटेलच्या साथीने भारताचा डाव सावरला. या दोघांनी भारताला 27 षटकात 124 धावांपर्यंत पोहचवले. श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी पाचव्या विकेटसाठी 101 चेंडूत 107 धावांची शतकी भागीदारी रचली. बांगलादेशविरूद्ध पाचव्या विकेटसाठी भारताकडून केली गेलेली ही सर्वात मोठी भागीदारी होती. मात्र मेहदी हसन मिराझने श्रेयस अय्यरला 82 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर अक्षर पटेलदेखील 56 चेंडूत 56 धावा करत बाद झाला. त्यानंतर शार्दुल ठाकूर 7 धावांवर परतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com