U19 World Cup: भारताला फायनलमध्ये कांगारू पुन्हा नडले! ऑस्ट्रेलियाच्या यंगिस्तानने 14 वर्षांनी पटकावलं विश्वविजेतेपद

U19 World Cup, India vs Australia Final: ऑस्ट्रेलियाच्या युवा संघाने भारताला अंतिम सामन्यात पराभूत करत चौथ्यांदा 19 वर्षांखालील वनडे वर्ल्डकपवर नाव कोरले.
Australia U19 Cricket Team
Australia U19 Cricket TeamX/ICC

ICC U19 Men’s Cricket World Cup 2024 Final, India vs Australia:

ऑस्ट्रेलियाच्या युवा क्रिकेट संघाने 19 वर्षांखालील वनडे वर्ल्डकप 2024 स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे. रविवारी (11 फेब्रुवारी) दक्षिण आफ्रिकेतील बेनोनीमधील विलोमूर पार्क येथे झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताच्या 19 वर्षांखालील संघाला 79 धावांनी पराभूत केले.

त्यामुळे ऑस्ट्रेलियाने तब्बल 14 वर्षांनी 19 वर्षांखालील वर्ल्डकपवर नाव कोरले. तसेच एकूण चौथ्यांदा ऑस्ट्रेलियाने 19 वर्षांखालील वर्ल्डकप जिंकला. ऑस्ट्रेलियाने यापूर्वी 1988, 2002 आणि 2010 साली 19 वर्षांखालील वर्ल्डकप जिंकला आहे.

तसेच भारताचे मात्र सहाव्यांदा 19 वर्षांखालील वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न भंगले. भारताला 2006, 2016 आणि 2020 नंतर चौथ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. भारताने यापूर्वी 2000, 2008, 2012, 2018 आणि 2022 या वर्षी झालेल्या 19 वर्षांखालील वर्ल्डकपचे विजेतेपद जिंकले आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाने 19 वर्षांखालील वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात भारताला पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ होती. यापूर्वी 2012 आणि 2018 साली झालेल्या 19 वर्षांखालील वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत-ऑस्ट्रेलिया संघ आमने-सामने होते. पण दोन्ही वेळी भारताने विजयश्री खेचून आणली होती.

भारताचा अंतिम सामन्यात पराभव

भारतासमोर अंतिम सामन्यात विजयासाठी ऑस्ट्रेलियाने 254 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला 43.5 षटकात सर्वबाद 174 धावा करता आल्या.

भारताकडून आदर्श सिंग आणि अर्शिन कुलकर्णी हे सलामीला उतरले होते. मात्र, अर्शिनने 3 धावांवरच विकेट गमावली. नंतर आदर्शसह मुशीरने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुशीरला 13 व्या षटकात महिल बिअर्डमनने बाद करत भारताला मोठा धक्का दिला.

बिअर्डमननेच लगेचच 17 व्या षटकात चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या कर्णधार उदय सहारनला 8 धावांवरच माघारी धाडले, तर राफ मॅकमिलनने सचिन धसला बाद करत भारताच्या डावाचा पायाच कमकुवत केला. त्यामुळे भारतासाठी आव्हान पूर्ण करणे आणखी कठीण झाले. त्यातच प्रियांशू मोलियाआणि अरावेल्ली अवनिशनेही स्वस्तात विकेट गमावली.

दरम्यान, या विकेट जात असताना आदर्शने एक बाजू सांभाळली होती. मात्र त्यालाही 31 व्या षटकात बिअर्डमननेच 47 धावांवर माघारी धाडले. नंतर मुरुगन अभिषेकने झुंझार खेळी केली. पण त्याला कोणाची फारशी साथ मिळाली नाही.

नमन 14 धावांवर बाद झाला, तर अभिषेक 42 धावांवर माघारी परतला. अखेर 44 व्या षटकात सौम्य पांडेला स्केकरने बाद करत भारताचा डाव संपवला.

ऑस्ट्रेलियाकडून महली बिअर्डमन आणि राफ मॅकमिलन यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच कॅलम विडलरने 2 विकेट्स घेतल्या, तर चार्ली अँडरसन आणि टॉम स्ट्रेकर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांनी सलामीवीर सॅम कोन्स्टासची विकेट शुन्यावरच गमावली.

मात्र, त्यानंतर हॅरी डिक्सन आणि कर्णधार ह्यू वेबगेन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 78 धावांची भागीदारी केली. ते दोघे बाद झाल्यावर हरजस सिंग आणि रायन हिक्स यांनी चौथ्या विकेटसाठी 66 धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला दिडशे धावांचा टप्पा पार करून दिला.

ते बाद झाल्यानंतर ऑलिव्हर पीकने बाकी फलंदाजांना साथीला घेत छोट्या भागीदाऱ्या करत ऑस्ट्रेलियाला 50 षटकात 7 बाद 253 धावांपर्यंत पोहचवले. पीक 46 धावांवर नाबाद राहिला.

या सामन्यात भारताकडून राज लिंबानीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच नमन तिवारीने 2 विकेट्स घेतल्या, तर सौम्य तिवारी आणि मुशीर खान यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

वर्षभरात तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाकडून भारताचा स्वप्नभंग

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की गेल्यावर्षभरात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाने तिसऱ्यांदा आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभूत करत विजेतेपदाला गवसणी घातली आहे.

यापूर्वी या दोन देशांचे वरिष्ठ संघ जून 2023 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आणि नोव्हेंबर 2023 मध्ये वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आमने-सामने आले होते. या दोन्ही अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com