AUS vs SA: बुधवारपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी मालिकेतील तिसरा सामना सुरू झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, पहिल्या दिवसाचा खेळ सुरू असताना अचानक ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लॅब्युशेनने सिगारेट लायटरची मागणी केल्याने अनेकजण गोंधळात पडले.
झाले असे की डेव्हिड वॉर्नर बाद झाल्यानंतर लॅब्युशेन उस्मान ख्वाजासह फलंदाजी करण्यासाठी आला. पण फलंदाजी करत असताना अचानक त्याने ऑस्ट्रेलियाच्या ड्रेसिंग रुमकडे सिगारेट लायटरची मागणी केली. यावेळी त्याने सिगारेट ओढण्याची कृती करत लायटर हवे असल्याचे सांगितले.
(Marnus Labuschagne asks for a cigarette lighter)
त्याची ही कृती पाहून समालोचकही गोंधळात पडले होते. तसेच अनेकांना प्रश्न पडला की चालू सामन्यात त्याने असे का केले असावे. पण नंतर त्याने हेल्मेटमधील नायलॉनचे धागे जाळण्यासाठी सिगारेट लायटर मागवले असल्याचा उलगडा झाला. त्याने नंतर त्या लायटरने त्याच्या हेल्मेटमधील त्याला त्रास देणारे नायलॉनचे धागे जाळले.
दरम्यान लॅब्युशेनने ख्वाजासह १३५ धावांची दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी केली. पण तो ७९ धावा करून बाद झाला. या खेळीत त्याने १३ चौकार मारले. पहिल्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने ४७ षटकात २ बाद १४७ धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा ५४ धावांवर नाबाद आहे, तर स्मिथ शुन्यावर नाबाद आहे. वॉर्नर १० धावांवर बाद झाला. दक्षिण आफ्रिकेकडून एन्रिच नॉर्कियानेच लॅब्युशेन आणि वॉर्नरला बाद केले.
दरम्यान, सिडनीमध्ये सुरू असलेला हा सामना दिवस-रात्र कसोटी सामना आहे. ऑस्ट्रेलियाने यापूर्वी या कसोटी मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे ते मालिकेत २-० अशा विजयी आघाडीवर आहेत. आता तिसरा सामना जिंकून त्यांना दक्षिण आफ्रिकेला व्हाईटवॉश देण्याची संधी आहे, तर दक्षिण आफ्रिकेसमोर प्रतिष्ठा राखण्याचे आव्हान आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.