Asian Wrestling Championships 2023: भारताच्या महिला कुस्तीपटूंनी बुधवारी अस्थाना, कझाकस्तान येथे झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेमध्ये पाच पदकांवर मोहोर उमटवली. अंतिम पंघाल हिचे सुवर्णपदक हुकले असले तरी तिने रौप्यपदकाला गवसणी घातली. भारताच्या इतर चार खेळाडूंनी ब्राँझपदकाची माळ आपल्या गळ्यात घातली.
भारताची 20 वर्षांखालील विश्वविजेती अंतिम पंघाल हिने 53 किलो वजनी गटात उझबेकिस्तानच्या अकटेंगे क्यूनिमजेवा हिचा 8-1 असा एकतर्फी पराभव करत सुवर्णपदक पटकावण्याच्या दिशेने वाटचाल केली होती.
अंतिम हिने या लढतीत खरेतर एकही गुण गमावला नाही. उपांत्य फेरीची कुस्ती चालू असताना अंतिमला पंचांनी ताकीद दिली, त्यामुळे तिला एक गुण गमवावा लागला. नाहीतर या संपूर्ण लढतीमध्ये अंतिम हिने अकटेंगे क्यूनिमजेवावर कुस्तीच्या पहिल्या क्षणापासूनच वर्चस्व राखले होते.
अंतिम हिने लढतीमध्ये सुरुवातीलाच आक्रमण करताना डाव्या पायाने चाल रचत पहिला गुण जिंकला. पहिला गुण गमावल्यानंतर उझबेकिस्तानच्या कुस्ती खेळाडूने प्रतिआक्रमण रचत अंतिमला बांधून ठेवले.
मात्र चपळाईने अंतिम हिने अकटेंगे क्यूनिमजेवाची पकड ढिली करत आपली सहज सुटका करून घेतली. जेव्हा जेव्हा अंतिम क्यूनिमजेवाच्या पकडीमधून आपली सुटका करून घेत होती, तेव्हा तेव्हा लगेच सुटका झाल्यावर तिने आक्रमण करत सलग गुण जिंकले.
अंतिम हिने या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या फेरीमध्ये सिंगापूरच्या हसियो पिंग अलविना लिमचा चितपट करत पराभव केला होता. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात चीनच्या लि डेंग हिच्यावर 6-0 असा सहज विजय मिळवला होता. अंतिम हिचा सुवर्णपदकासाठी सामना 2021 मधील जागतिक विजेत्या खेळाडूविरुद्ध झाला.
आशियाई या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये भारताच्या चार खेळाडूंनी ब्राँझपदकाला गवसणी घातली. अंशू मलिक हिने 57 किलो वजनी गटात, सोनम हिने 62 किलो वजनी गटात, मनीषा हिने 65 किलो वजनी गटात आणि रितिका हिने 72 किलो वजनी गटात भारतासाठी ब्राँझपदक पटकावले. याआधी अंशूला जपानच्या साई नांजोकडून उपांत्यफेरीच्या सामन्यात 5-1 असे पराभूत व्हावे लागले.
कुस्ती लढतीच्या पहिल्या भागात साई नांजोकडून आक्रमक पवित्रा अवलंबला गेला. दुसऱ्या भागातही साईकडून अंशूची पकड करण्यात आली. साईकडून पकडीसाठी केलेल्या आक्रमणामुळे अंशूला दुखापत झाल्याने ही लढत थांबवण्यात आली आणि साईला 5-1 असे विजयी घोषित करण्यात आले. पण अंशू ही ब्राँझपदकासाठी पात्र ठरली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.