Asia Cup 2023 Dates and Venues Announced: आशिया चषक २०२३ स्पर्धेच्या आयोजनाबद्दल मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. पण अखेर आशियाई क्रिकेट परिषदेने स्पर्धेच्या तारखा आणि ठिकाण जाहीर केले आहे. ही स्पर्धा पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांमध्ये खेळवली जाणार आहे.
स्पर्धेला 31 ऑगस्टपासून सुरुवात होणार असून 17 सप्टेंबर रोजी अंतिम सामना खेळला जाणार आहे. हे आशिया चषकाचे 16 वे पर्व आहे. या 16 व्या पर्वात होणाऱ्या एकूण 13 सामन्यांपैकी 4 सामने पाकिस्तानमध्ये खेळवले जाणार आहेत. तसेच अन्य 9 सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत.
खरंतर आशिया चषकाचे आयोजनचा हक्क पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे होता. पण भारतीय क्रिकेट संघ सुरक्षेच्या कारणाने पाकिस्तानला जाणार नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले होते. त्याचमुळे या स्पर्धेच्या आयोजनावरून बराच गोंधळ झालेला होता.
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने हायब्रिड मॉडेलचा प्रस्ताव मांडला होता, जो आता आशियाई क्रिकेट परिषदेकडून स्विकारला गेला आहे. त्याचमुळे पाकिस्तान आणि श्रीलंकेत सामने खेळवले जाणार आहे.
दरम्यान, स्पर्धेची तारिख आणि ठिकाणाची घोषणा झाली असली, तरी अद्याप संपूर्ण वेळापत्रक घोषित झालेले नाही.
आशिया चषक 2023 स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ हे सहा संघ सहभागी होणार आहेत. या सहा संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. नेपाळ या स्पर्धेसाठी एसीसी प्रीमियर कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात युएईला पराभूत केल्यानंतर पात्र ठरले आहेत.
या स्पर्धेतील सुपर सिक्सची फेरी दोन गटात पार पडेल. एका गटात भारत, पाकिस्तान आणि नेपाळ संघांचा समावेश आहे, तर दुसऱ्या गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या संघांचा समावेश आहे.
सुपर सिक्स फेरीनंतर प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर फोर फेरीत प्रवेश करतील. सुपर फोर फेरीत चार संघात साखळी फेरी खेळवली जाईल, यातून अव्वल दोन संघ १७ सप्टेंबर दरम्यान अंतिम सामना खेळणार आहेत. म्हणजेच एकूण 13 सामने 18 दिवसांच्या कालावधीत खेळवण्यात येणार आहेत.
या स्पर्धेचे 15 व्या पर्वाचे विजेतेपद श्रीलंकेने अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभूत करत मिळवले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.