पणजी : गोवा बुद्धिबळ संघटनेच्या निवडणुकीतील गैरव्यवस्थापनाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाने राज्य संघटनेचा कारभार हाकण्यासाठी पाच सदस्यीय अस्थायी समिती नियुक्त केली. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महासंघाने निर्णय घेतला असल्याची माहिती राज्य संघटनेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध ठरलेले अरविंद म्हामल यांनी गुरुवारी दिली.
दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) गोवा बुद्धिबळ (Goa Chess) संघटनेच्या निवडणूक संदर्भात २२ फेब्रुवारी रोजी आदेश दिला होता. महासंघाच्या केंद्रीय समितीची बैठक १३ मार्च रोजी कोची येथे झाली, त्यावेळी गोव्यातील बुद्धिबळ प्रशासकीय कारभार हाकण्यासाठी पाच सदस्यीय समितीच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब झाले. महासंघाच्या घटनेतील कलम १६ नुसार आणि उपनियम २४ नुसार अस्थायी समिती नियुक्तीचा निर्णय झाल्याचे म्हामल यांनी सांगितले. (Appointment of a five-member committee to run the chess administration in Goa)
आदेशानुसार, अस्थायी समितीकडे गोवा बुद्धिबळ (Goa Chess) संघटनेचे सर्व अधिकार असतील. राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी संघ निवड प्रक्रिया अस्थायी समितीतर्फे घेण्यात येईल. महासंघाने अस्थायी समितीला सूरळीत कामकाजासाठी नियमावली निश्चित करण्यास सांगितले आहे, तसेच आर्थिक व्यवहारासाठी ‘गोवा बुद्धिबळ अस्थायी समिती’च्या नावे बँकेत खाते उघडण्याची सूचनाही केली आहे. महासंघाकडून पुढील नोटीस येईपर्यंत अस्थायी समिती राज्य बुद्धिबळात (Chess) कार्यरत असेल, असे महासंघाचे सचिव भारतसिंग चौहान यांनी नमूद केले आहे.
ज्ञानेश्वर नाईक अस्थायी समितीचे प्रमुख
पाच सदस्यीय अस्थायी समितीचे ज्ञानेश्वर नाईक अध्यक्ष, तर सचिन आरोलकर समन्वयक आहेत. अर्चना तेंडुलकर व गोव्याचा पहिला ग्रँडमास्टर अनुराग म्हामल यांची सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. भारतीय ग्रँडमास्टर अभिजित कुंटे समितीवर महासंघाचे प्रतिनिधी असतील. समितीतील ज्ञानेश्वर, सचिन व अर्चना आदी बुद्धिबळ (Chess) आयोजक असून अनुराग व अभिजित खेळाडू आहेत.
निवडणूक वादाची पार्श्वभूमी
अरविंद म्हामल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवा बुद्धिबळ संघटनेवर अस्थायी समितीची नियुक्ती होण्यामागे निवडणूक वादाची पार्श्वभूमी आहे. संघटनेचे निवडणूक (Election) अधिकारी माता सेंकडरी स्कूलचे प्राचार्य सुभाष शिरोडकर, उपनिवडणूक अधिकारी के. व्ही. महंत यांनी अध्यक्ष, सचिव, खजिनदार, संयुक्त सचिव (दक्षिण) या पदासाठी दाखल केलेले उमेदवारी अर्ज फेटाळले आणि तत्कालीन सचिव किशोर बांदेकर यांनी पुरविलेल्या माहितीनुसार उमेदवारांना बिनविरोध जाहीर केले. यासंदर्भात, विरोधातील उमेदवार महेश कांदोळकर, आशेष केणी, विश्वास पिळर्णकर, अमोघ नमशीकर यांनी अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या (All India Chess Federation) नैतिकता समितीकडे दाद मागितली होती आणि त्या समितीने नव्याने निवडणूक घेण्याचा आदेश दिला होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.