भारत विरुद्ध इंग्लंड संघात शुक्रवारपासून (23 फेब्रुवारी) कसोटी मालिकेतील चौथा सामना सुरू झाला आहे. या सामन्यातून भारताकडून 27 वर्षीय वेगवान गोलंदाज आकाश दीपने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे.
आकाशला अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या जागेवर भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. तो भारताकडून कसोटीत पदार्पण करणारा 313 वा खेळाडू ठरला आहे. दरम्यान, आकाशसाठी हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता.
बंगालकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा आकाश दीपकडे नवीन आणि जुना चेंडूही स्विंग करण्याची क्षमता आहे. त्याने वयोगटातील क्रिकेटपासून अनेकदा त्याच्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे.
बिहारमधील सासाराम येथील मुळचा असलेल्या आकाश दीपला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. परंतु, शिक्षक असलेल्या त्याच्या वडीलांचा त्याच्या क्रिकेटला विरोध होता.
इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार नंतर आकाश 2010 सालादरम्यान पश्चिम बंगालमधील दुर्गापूर या छोट्या शहरात नोकरी शोधण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याच्या काकांनी क्रिकेटसाठी त्याला पाठिंबा दिला.
त्यांनी त्यांच्या मुलाला आणि आकाशला एका स्थानिक अकादमीमध्ये भरती केले, तिथून आकाशच्या क्रिकेटच्या ट्रेनिंगला खरीखुरी सुरुवात झाली. परंतु, त्याच्यासाठी पुढील काळ सोपा नव्हता.
साधारण सहा-सात वर्षांनंतर त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्याच्या वडिलांना स्ट्रोक आला आणि पॅरेलिसिसची झुंद देताना त्यांचे निधन झाले. त्यानंतर लगेचच दोन महिन्यात त्याचा मोठा भाऊ आजारी पडला. त्यातच त्याचेही निधन झाले.
या आघातामुळे आकाश पूर्ण खचला होता. घरी आईला आधार द्यायचा होता आणि आर्थिक स्थितीही सांभाळण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. त्याला या सगळ्यातून बाहेर पडता पडता तीन वर्षे गेले, पण त्याने क्रिकेट न सोडण्याचा निर्णय घेतला.
तो दुर्गापूर आणि मग कोलकाताला गेला. त्याचा बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या सेकंड डिव्हिजन लीगसाठी युनायडेट क्लबमध्ये समावेश झाला. त्यानंतर मोहम्मद शमीने त्याला तंदुरुस्तीबाबत काही सल्ले दिले आणि त्यामुळे त्याला फायदा झाला.
आकाशचा समावेश बंगालच्या 23 वर्षांखालील संघात झाला आणि नंतर त्याने 2019 मध्ये बंगालच्या वरिष्ठ संघाकडूनही पदार्पण केले. त्याने त्याच्या गोलंदाजीने प्रभावित करत भारताच्या अ संघात स्थान मिळवण्यातही यश मिळवले.
दरम्यान, गेल्याच महिन्यात संपलेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील वनडे मालिकेसाठी त्याला भारतीय संघात संधी मिळाली होती. त्याआधी गेल्यावर्षी चीनमध्ये यावर्षी झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघात संधी मिळाली होती, पण त्याला पदार्पणाची संधी मिळाली नव्हती.
त्याने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरून परत आल्यानंतर भारतीय अ संघाकडून इंग्लंड अ संघाविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेट खेळताना प्रभावित केले. त्याने तीन सामन्यांतच 13 विकेट्स घेतल्या.
त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील सामन्यांसाठी त्याचा भारतीय संघात समावेशासाठीही विचार झाला आणि अखेर त्याने भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. विशेष म्हणजे पदार्पणाच्या कसोटीत पहिल्याच तासात त्याने इंग्लंडच्या तीन फलंदाजांना बाद केले.
आकाश दीपने आत्तापर्यंत 30 प्रथम श्रेणी सामने खेळले असून 104 विकेट्स घेतल्या आहे, तसेच 423 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर 28 लिस्ट ए सामन्यांमध्ये त्याने 42 विकेट्स घेतल्या आहेत, तर 140 धावा केल्या आहेत.
तो 41 टी20 सामनेही खेळला आहे, ज्यात त्याने 48 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने आत्तापर्यंत 7 आयपीएल सामने खेळले असून 6 विकेट्स घेतल्या आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.