Ahmedabad Test: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर चौथा कसोटी सामना गुरुवारी सुरू झाला आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज उपस्थित होते.
सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी मोदी आणि अल्बानीज हे स्टेडियममध्ये आले, त्यांचे गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल आणि राज्याचे गृहमंत्री हर्श संघवी यांच्याकडून स्वागत करण्यात आले. यावेळी बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शाह हे देखील उपस्थितीत होते.
मोदी आणि अल्बानीज यांचे स्टेडियममध्ये आगमन झाल्यानंतर क्रिकेटच्या माध्यमातून दोन्ही देशांमधील 75 वर्षांच्या मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे पोस्टर झळकावण्यात आले. ज्यावर मोदी आणि अल्बानीज यांचे फोटोही होते.
त्यानंतर सत्कार सोहळा सुरू झाला. या सोहळ्याचे निवेदन माजी क्रिकेटपटू आणि भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केले. या सोहळ्यादरम्यान रॉजर बिन्नी यांनी क्रिकेटच्या माध्यमातून 75 वर्षांच्या मैत्रीचे प्रतिनिधित्व करणारी एक फ्रेम अल्बानीज यांना भेट दिली. त्यानंतर त्याचप्रकारची फ्रेम जय शाह यांनी मोदी यांना भेट दिली.
यानंतर मोदी यांनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माला आणि अल्बानीज यांनी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला कॅप प्रदान केल्या. यानंतर मोदी यांनी लगेचच रोहितचा हात धरला आणि नंतर अल्बानीज यांना थोडे बाजूला करत स्मिथशी हस्तांदोलन केले. नंतर मोदी यांनी अल्बानीज यांच्यासह रोहित आणि स्मिथ यांचा हात पकडून तो उंचावला
तसेच या कॅप प्रदान सोहळ्यानंतर दोन्ही पंतप्रधानांची जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या या स्टेडियमच्या मैदानातून सन्मान फेरी झाली.
यानंतर नाणेफेक पार पडली आणि नंतर दोन्ही संघांच्या कर्णधारांना आपापल्या देशाच्या पंतप्रधानांची संघातील खेळाडूंशी ओळख करून दिली. या सोहळ्याचे व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
दरम्यान, या सामन्याचा पहिल्या तासाचा खेळ अल्बानीज मोदी यांच्यासह बसून पाहाणार आहेत. अल्बानीज सध्या भारत दौऱ्यावर असून त्यांनी नुकतीच मुख्यमंत्री भुपेंद्र पाल यांच्यासह होळी साजरी केली. तसेच त्यांनी साबरमती आश्रमालाही भेट देत महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी भारताने प्लेइंग इलेव्हनध्ये मोहम्मद सिराज ऐवजी मोहम्मद शमीला संधी दिली आहे. सिराजला या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. तसेच ऑस्ट्रेलियाने प्लेइंग इलेव्हनमध्ये काहीही बदल केलेला नाही.
भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, श्रीकर भारत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, उमेश यादव
ऑस्ट्रेलिया संघ - ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅब्युशेन, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), पीटर हँड्सकॉम्ब, कॅमेरॉन ग्रीन, ऍलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), मिशेल स्टार्क, टॉड मर्फी, मॅथ्यू कुहनेमन, नॅथन लायन
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.