Women's BBL 2023: महिला बिग बॅश लीगच्या 9व्या हंगामातील अंतिम सामना ॲडलेड स्ट्रायकर्स आणि ब्रिस्बेन हीट यांच्यात ॲडलेड ओव्हलवर खेळला गेला. या सामन्यात ताहलिया मॅकग्राच्या नेतृत्वाखाली ॲडलेड संघाने चमकदार कामगिरी करत ब्रिस्बेन संघाचा 3 धावांच्या कमी फरकाने पराभव करत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. ॲडलेड स्ट्रायकर्स महिला संघानेही गेल्या मोसमात ही ट्रॉफी जिंकली होती. अंतिम सामन्यात अमांडा जेड वॉलिंग्टनने ॲडलेडसाठी शानदार गोलंदाजी केली आणि चार षटकांत 16 धावा देत 3 बळी घेतले.
दरम्यान, अंतिम सामन्यात ॲडलेडच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, संघाला पहिला धक्का कॅटी मॅकच्या रुपाने 5 धावांवर बसला. यानंतर व्हॅल्व्हडार्ट आणि कॅप्टन मॅकग्रा यांनी मिळून 10 षटकांत धावसंख्या 71 धावांपर्यंत नेली. येथून, ब्रिस्बेन हीटच्या गोलंदाजांनी त्यांच्या संघाचे पुनरागमन करण्यासाठी ठराविक अंतराने विकेट्स घेण्यास सुरुवात केली, ज्यामुळे ॲडलेड स्ट्रायकर्स संघाला शेवटच्या षटकांमध्ये वेगाने धावा करता आल्या नाहीत. ॲडलेडसाठी झालेल्या या सामन्यात व्हॅल्व्हर्डेने 39 तर कर्णधार मॅकग्राने 38 धावा केल्या. याशिवाय, तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक 11 धावा ब्रिजेट पॅटरसनने केल्या. ॲडलेड संघाने 20 षटकांत 5 गडी गमावून 125 धावांपर्यंत मजल मारली. ब्रिस्बेनकडून गोलंदाजीत निकोला हॅनकॉकने 4 षटकात 23 धावा देत 3 बळी घेतले.
दुसरीकडे, 126 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ब्रिस्बेन हीट संघाची सुरुवात चांगली झाली आणि 32 धावांवर त्यांनी पहिली विकेट गमावली. मात्र, इथून पुढे संघाला वारंवार अंतराने विकेट्स गमावल्या. एमेलिया केरने एका बाजूकडून डावावर निश्चितपणे नियंत्रण ठेवले, पण तिला दुसऱ्या बाजूकडून सहकाऱ्यांची साथ मिळू शकली नाही. ब्रिस्बेन संघाला 20 षटकांत केवळ 122 धावांपर्यंतच मजल मारता आली आणि विजेतेपदाचे त्यांचे स्वप्न 3 धावांनी भंगले. ॲडलेडकडून अमांडा जेड वॉलिंग्टनने 3, मेगन शट आणि ताहलिया मॅकग्राने 2-2 तर गेमा बार्सबीने 1 बळी घेतला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.