प्रो कबड्डीच्या 9 व्या हंगामाची शनिवारी सांगता झाली. या हंगामाचा अंतिम सामना जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध पुणेरी पलटण यांच्यात झाला. शेवटपर्यंत रोमांचकारी झालेल्या या सामन्यात जयपूर पिंक पँथर्सने 33-29 अशा फरकाने विजय मिळवला.
पुणेरी पलटणने चांगली सुरुवात केली होती. एका क्षणी ते आघाडीवरही होते. मात्र, त्यांना या सामन्यात अस्लम इनामदार आणि मोहित गोयत या संघाच्या प्रमुख रेडर्सची अनुपस्थिती अधिक प्रमाणात जाणवली.
जयपूर पिंक पँथर्सने मात्र या संपूर्ण सामन्यात सातत्यपूर्ण कामगिरी करत अखेर विजय आपलाच होईल याची काळजी घेतली. त्यांच्याकडून कर्णधार सुनील कुमारने महत्त्वाची भूमिका निभावली. त्याने बचावात दाखवलेली चपळता संघाला विजय मिळवून देण्यासाठी महत्त्वाची ठरली. जयपूर पिंक पँथर्सचे हे प्रो कबड्डीतील दुसरे विजेतेपद ठरले आहे.
दरम्यान जयपूर पिंक पँथर्सने विजय मिळवताच संघाचे सहसंघमालक अभिषेक बच्चन आणि कुटुबिंयांनी जोरदार सेलिब्रेशन केले. अभिषेकची पत्नी आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन आणि मुलगी आराध्या या देखील सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थितीत होते.
सामना सुरू असतानाही अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या जयपूर पिंक पँथर्सला प्रोत्साहन देत होते. अखेर संघाने विजय मिळवल्यानंतर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
विशेष म्हणजे तब्बल 8 वर्षांनंतर पुन्हा एकदा जयपूरने विजय मिळवल्याने संघाचा आणि त्यांचा हा आनंद द्विगुणित झाला आहे. यापूर्वी 2014 मध्ये प्रो कबड्डीच्या पहिल्या हंगामात जयपूर पिंक पँथर्सने विजेतेपदाला गवसणी घातली होती.
अभिषेक बच्चनने सोशल मीडियावर एक पोस्ट करत संघाचे अभिनंदन देखील केले आहे.
तसेच त्याने त्या पोस्टमध्ये असेही म्हटले आहे की 'या संघाचा अभिमान वाटत आहे. त्यांनी विजेतेपद जिंकण्यासाठी खूप मेहनत घेतली. टीका झाल्यानंतरही त्यांनी विश्वास बाळगला आणि मेहनत घेतली. सर्वांनी त्यांना कमजोर समजले होते. पण त्यांच्याकडे आत्मविश्वास होता. मी या संघासाठी खूप आनंदी आहे.'
तसेच ऐश्वर्यानेही आराध्याने ट्रॉफी हातात घेतल्याचा तसेच अभिषेकबरोबरचा फोटो पोस्ट केला आहे. तिने पोस्टमध्ये म्हटले आहे की 'आम्हाला संघाचा अभिमान आहे.'
त्यामुळे सध्या अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्याचे हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चर्चेत आले आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.