Indian Super League Football: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या प्ले-ऑफ फेरीतील जागेचा दावा भक्कम करण्यासाठी चेन्नईयीन एफसीविरुद्ध विजय अत्यावश्यक आहे याची जाणीव एफसी गोवा संघाला आहे. तेच लक्ष्य बाळगून यजमान संघ गुरुवारी (ता. 16) फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर दाखल होईल.
(FC Goa vs Chennaiyin FC)
एफसी गोवाने गुरुवारी चेन्नईयीनला नमविल्यास त्यांचे 30 गुण होतील व सहा संघांच्या प्ले-ऑफ फेरीच्या दिशेने कार्लोस पेनया यांच्या मार्गदर्शनाखालील संघाची वाटचाल राहील. पराभूत झाल्यास त्यांच्यावर प्रचंड दबाव असेल. चेन्नईयीन एफसीसाठी गमावण्यासारखे काहीच नाही.
आठ सामन्यानंतर त्यांनी मागील लढतीत ईस्ट बंगालला हरवून पूर्ण तीन गुण मिळविले. प्ले-ऑफ फेरीच्या शर्यतीत थॉमस ब्रडॅरिच यांच्या मार्गदर्शनाखालील संघ नाही, पण त्यांच्यात धक्कादायक निकाल नोंदविण्याची क्षमता निश्चितच आहे. त्यांच्या खाती सध्या 21 गुण आहेत.
लढतीवर पूर्ण लक्ष केंद्रित
‘‘आम्ही सध्या फक्त चेन्नईयीनविरुद्धच्या लढतीवर पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. मुंबई सिटीविरुद्धचा पराभव इतिहासजमा झालाय. त्या लढतीनंतर माझी खेळाडूंशी चर्चा झाली. आता आम्ही सारे लक्ष उद्याच्या लढतीवर एकवटले आहे.
खेळाडू चांगले खेळत असून आता संघात बदलाची गरज नाही. आमच्यासाठी सातत्य आणि भक्कम खेळ महत्त्वाचा आहे,’’ असे प्रशिक्षक पेनया यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. एफसी गोवा संघ वेळोवेळी सेटपिसेसवर गोल स्वीकारताना दिसतोय.
या संदर्भात पेनयाही किचिंत चिंताग्रस्त आहेत. त्यांनी समतोल राखण्याची गरज प्रतिपादली. स्पर्धेत सध्याच्या सहा संघांत एफसी गोवाने सर्वाधिक 30 गोल स्वीकारले आहेत.
चेन्नईयीनचे आक्रमण दुखापतग्रस्त
चेन्नईयीनचा डच फुटबॉलपटू अब्देनास्सेर अल खयाती व पेतार स्लिस्कोविच दुखापतग्रस्त आहेत. त्यांनी संघाचे आक्रमक सांभाळताना एकत्रित 17 गोल केले आहेत. ते गुरुवारी अनुपलब्ध ठरल्यास चेन्नईयीनचे आक्रमण दुबळे होण्याचे संकेत आहेत.
मात्र पेनया त्यास महत्त्व देण्यास तयार नाहीत. त्यांच्यापाशी अन्य दर्जेदार खेळाडू असल्याचे त्यांनी नमूद केले.
स्पर्धेतील चुरस वाढली हे चांगलेच
आयएसएल स्पर्धेत यंदापासून सहा संघ प्ले-ऑफ फेरीसाठी पात्र ठरतील. मुंबई सिटी व हैदराबाद या फेरीसाठी पात्र ठरले आहेत. बाकी चार जागांसाठी चढाओढ आहे. त्याविषयी पेनया यांनी सांगितले, की ‘‘स्पर्धेच्या नव्या रचनेमुळे चुरस वाढली आहे. हे लीगसाठी चांगलेच आहे.
प्रत्येक संघ विजयासाठी प्रयत्न करत असून त्यांच्यात क्षमता आहे. गतमोसमातील कामगिरीचा विचार करता, एफसी गोवाने यावेळेस प्ले-ऑफसाठी पात्रता मिळविली, तर आमच्यासाठी हा मोसम यशस्वी ठरल्याचे मी मानेन.’’
‘‘आयएसएलमधील माझ्या सहा मोसमाच्या अनुभवानुसार स्पर्धा आता खूपच आव्हानात्मक बनली आहे. येथील फुटबॉलने खूप प्रगती साधली आहे. माझ्या पहिल्या मोसमात चार संघात जागा मिळविणे सोपे होते. आता सहा संघ पात्र ठरणार असल्याने चुरस वाढली आहे. गतमोसम आमच्यासाठी खराब ठरला, पण आता आम्ही ध्येयप्राप्तीच्या दिशेने वाटचाल करत आहोत.’’
- एदू बेदिया, एफसी गोवाचा खेळाडू
मैदानात उतरण्यापूर्वी...
प्रत्येकी 18 सामने खेळल्यानंतर एफसी गोवाचे 27, चेन्नईयीनचे 21 गुण
पहिल्या टप्प्यात 21 ऑक्टोबर रोजी चेन्नई येथील एफसी गोवा 2-0 फरकाने विजयी
आयएसएलमधील 22 लढतीत एफसी गोवाचे 12, चेन्नईयीनचे 8 विजय, 2 बरोबरी
स्पर्धेत यंदा एफसी गोवाचे 34, चेन्नईयीनचे 30 गोल
चेन्नईयीनविरुद्ध एफसी गोवाचे सलग 3 विजय - 1-0, 5-0 व 2-0
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.