Year Ending: भारतीय खेळाडूंनी यंदा अभिमानाने फडकावला तिरंगा! पाहा 2023 मधील रेकॉर्डब्रेकर्स

Sports Achievements: साल 2023 गाजवणाऱ्या भारतीय खेळाडूंचा घेतलेला आढावा.
India's Sports Achievements
India's Sports Achievements

2023 Flashback, India's Sports Achievements :

वर्ष 2023 मधील आता अवघा शेवटचा आठवडा राहिला आहे. वर्षभरात अनेक गोष्टी आपल्या आयुष्यात घडलेल्या असतात, अशाच गोष्टींच्या आठवणींचा उजाळा वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात बरेचजण देताना दिसतात.

याच वर्षात क्रीडाक्षेत्रातही अनेक मोठ्या आणि जागतिक स्तरावरील स्पर्धा झाल्या. या स्पर्धा बऱ्याच खेळाडूंनी गाजवल्या देखील. काही नवे विक्रम बनले, तर काही जुने विक्रम मोडले गेले. भारतीय खेळाडूंनीही ऐतिहासिक कामगिरी करत नवी उंची गाठली.

या लेखातही अशाच काही भारतीय खेळाडूंचा आढावा घेऊ, ज्यांनी जागतिक स्तरावर नवे विक्रम रचत भारताचा झेंडा अभिमानाने फडकावला.

आयसीसी क्रमवारीत भारताचेच वर्चस्व

क्रिकेट हा भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. याच खेळात भारतीय संघाने एकाचवेळी कसोटी, वनडे आणि टी20 क्रमवारीत अव्वल क्रमांक मिळवण्याचा पराक्रम यावर्षात केला.

याशिवाय टी20 क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत सूर्यकुमार यादवने तर अव्वल क्रमांक राखलाच, पण युवा रवी बिश्नोईनेही गोलंदाजांमध्ये अव्वल क्रमांक मिळवण्याचा कारनामा या वर्षात केला.

इतकेच नाही, तर वनडे क्रमवारीतही शुभमन गिल फलंदाजांच्या, तर मोहम्मद सिराजने गोलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांक मिळवण्याचा पराक्रम केला.

नीरज चोप्राची पुन्हा गोल्डन कामगिरी

भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा मैदानावर उतरला की नेहमीच शानदार कामगिरीने प्रभावित करतो. त्याच्यासाठीही 2023 वर्ष विक्रमी ठरले. त्याने या वर्षात वर्ल्ड ऍथलेटिक चॅम्पियनशीप 2023 स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला.

याशिवाय त्याने यावर्षी 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले. याच स्पर्धेत भारताच्या किशोर कुमार जेनाने रौप्य पदकाला गवसणी घातली. त्याचबरोबर नीरजने यावर्षी डायमंड लीग फायनलमध्ये दुसरा क्रमांक मिळवला होता.

19 वर्षांच्या अंतिम पांघलने रचला इतिहास

19 वर्षाची भारताची स्टार कुस्तीपटू अंतिम पांघलनेही यावर्षात ऐतिहासिक कामगिरी केली. तिने 2023 मध्ये दुसऱ्यांदा 20 वर्षांखालील वर्ल्ड चॅम्पियनशीपचे विजेतेपद पटकावले. त्यामुळे ती सलग दोनदा विश्वविजेती होणारी भारताची पहिली महिला कुस्तीपटू ठरली.

तसेच बेलग्रेडला झालेल्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या 53 किलो वजनी गटात कांस्य पदकाची कमाई करत पुढीलवर्षी पॅरिसला होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रताही मिळवली. याशिवाय तिने 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही कांस्य पदक जिंकले.

बुद्धिबळाच्या इतिहासात भावंडांनी कोरलं सुवर्णक्षरांनी नाव

बुद्धिबळ खेळात भारताची मान वैशाली रमेशबाबू आणि रमेशबाबू प्रज्ञानानंद या भावंडांनी अभिमानाने उंचावली. वैशालीने 2023 मध्ये ग्रँडमास्टर किताब मिळवला. ती ग्रँडमास्टर होणारी भारताची तिसरीच महिला ठरली आहे.

वैशालीचा धाकटा भाऊ प्रज्ञानानंदने देखील काही वर्षांपूर्वीच ग्रँडमास्टर किताब मिळवला होता. त्यामुळे आता त्यांची ग्रँडमास्टर असणारी पहिला भाऊ-बहिणीची जोडी आहे.

इतकेच नाही, तर 2023 वर्षात प्रज्ञानानंदने फिडे चेस वर्ल्डकपचा अंतिम सामन्यात पोहचण्याचा पराक्रमही केला. या स्पर्धेत त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्याला अंतिम सामन्यात दिग्गज मॅग्नस कार्लसनने पराभूत केले.

सात्विक आणि चिराग 'नंबर वन'

सात्विकसाईराज रांकिरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारताच्या बॅडमिंटनमधील दुहेरीतील जोडीने अनेक पराक्रम आत्तापर्यंत केले आहेत. त्यांनी सातत्याने यावर्षी शानदार कामगिरी केली. त्यांची यावर्षी खेलरत्न या भारतातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कारासाठी निवडही झाली. त्यांनी या वर्षात अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत.

19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकांचाही समावेश आहे. तसेच त्यांनी पुरुष दुहेरी क्रमवारीत अव्वल क्रमांकाही मिळवला. अशी कामगिरी करणारी त्यांची पहिलीच भारतीय जोडीही ठरली.

शितल देवीने जिंकली तीन पदके

2023 वर्षात आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धाही खेळवण्यात आली. ही स्पर्धाही भारतासाठी ऐतिहासिक ठरली. या स्पर्धेत भारताची तिरंदाज शितल देवीने शानदार कामगिरी केली. तिने या स्पर्धेत 3 पदके जिंकण्याची कामगिरी केली. ती जागतिक क्रमवारीतही अव्वल क्रमांकाची पॅरा आर्चर आहे.

विराटचे 50 वे शतक

याचवर्षी वर्ल्डकप 2023 स्पर्धेत खेळताना विराट कोहलीने वनडे कारकिर्दीतील 50 वे शतक झळकावले. तो अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच क्रिकेटपटू ठरला. त्याने सचिन तेंडुलकरच्या 49 वनडे शतकांचा विक्रम मागे टाकला.

भारतीय फुटबॉल संघाचे यश

दक्षिण आशियाई महासंघ अजिंक्यपद स्पर्धेच्या (SAFF Championship) अंतिम सामन्यात भारतीय संघाने कुवेतविरुद्ध 1-1 बरोबरीनंतर पेनल्टी शुटआऊटमध्ये 5-4 अशा फरकाने विजय मिळवला. या विजयासह भारताने ही स्पर्धा विक्रमी 9 व्यांदा जिंकली.

याचवर्षी भारतीय फुटबॉल संघ जागतिक क्रमवारीत तब्बल 5 वर्षांनंतर 100 च्या आत आला होता. जुलै 2023 मध्ये भारतीय फुटबॉल संघ 99 व्या क्रमांकावर आला होता.

हॉकी संघाचे सुवर्णयश

19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पुरुष हॉकी संघाने सुवर्ण पदकाला गवसणी घालण्याबरोबरच पुढीलवर्षी पॅरिसला होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी तिकीटही मिळवले. दरम्यान भारतीय पुरुष संघाचे हे आशियाई क्रीडा स्पर्धेतील चौथेच सुवर्णपदक ठरले.

भारताच्या अंध महिला व पुरुष संघाचा पराक्रम

आयबीएसए वर्ल्डकप गेम्स 2023 स्पर्धेत पहिल्यांदाच क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताचे अंध महिला व पुरुष संघ पोहचले होते. दरम्यान महिला संघाने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे, तर पुरुष संघाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com