
योग ही भारताची प्राचीन आणि अमूल्य अशी देणगी आहे. आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत योग हा आरोग्य आणि तंदुरुस्ती साध्य करण्याचा अत्यंत प्रभावी मार्ग ठरत आहे. शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल राखणारा हा शास्त्रीय आणि नैसर्गिक उपाय आहे.
योगासने शरीराला लवचिकता, बळकटपणा आणि स्थिरता प्रदान करतात. नियमित योगाभ्यासामुळे हाडे, सांधे आणि स्नायूंना उत्तम व्यायाम मिळतो. पचनक्रिया सुधारते, श्वसनसंस्था कार्यक्षम राहते आणि हार्मोन्सचे संतुलन राखले जाते. वजन नियंत्रणात राहते आणि विविध आजारांपासून संरक्षण मिळते.
योग आणि मानसिक आरोग्य यांचा अनुबंध आहे. योग हा केवळ शरीरापुरताच मर्यादित नाही, तर तो मनालाही शांती देतो. ध्यान आणि प्राणायामामुळे मन स्थिर राहते. चिंता आणि नैराश्य कमी होते. मन:शांती, एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढतो. तणावमुक्त जीवनासाठी योग अत्यावश्यक आहे.
योग म्हणजे केवळ शरीराचे वाकवणे नव्हे, तर जीवनशैलीचा एक भाग आहे. योगामुळे शरीर सशक्त राहते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि झोपेच्या बाबतीत सकारात्मक सुधारणा होते. सतत योग केल्यास मन, शरीर आणि आत्मा यांचे एकरूपत्व साधता येते; जी खरी तंदुरुस्ती आहे..
नियमित योगाभ्यास आणि संप्रेरक संतुलन (हार्मोनल बॅलन्स) यांमध्ये दृढ नाते आहे. शरीरात संप्रेरके (हार्मोन्स) विविध ग्रंथी (ग्लॅण्ड्स) तयार करतात आणि ही संप्रेरके शरीरातील महत्त्वाच्या क्रिया नियंत्रित करतात. उदाहरणार्थ; पचन, झोप, लैंगिक आरोग्य, मानसिक स्थिरता, चयापचय (मेटाबोलिजम), मासिक पाळी, गर्भधारणा इत्यादी. ह्या संप्रेरकांचे असंतुलन झाल्यास अनेक शारीरिक व मानसिक समस्या निर्माण होतात. योगाभ्यास हे संतुलन राखण्यास अत्यंत उपयुक्त ठरते.
आता आपण संप्रेरकांचे संतुलन राखण्यासाठी योग कसा मदत करतो, हे पाहू. थायरॉइड ग्रंथींवर प्रभाव (थायरॉइड रेगुलेशन): सर्वांगासन, मत्स्यासन, हलासन यांसारखी योगासने थायरॉइड ग्रंथींवर थेट परिणाम करून ‘टी-३’ आणि ‘टी-४’ संप्रेरकांचे उत्पादन संतुलित करतात. त्यामुळे थकवा, वजनवाढ, केसगळती यांसारख्या समस्यांवर नियंत्रण मिळते. पिट्युटरी ग्रंथी (पिट्युटरी ग्लॅण्ड्स) वर नकारात्मक परिणाम: पिट्युटरी ग्रंथी ही शरीरातील इतर ग्रंथींना संप्रेरक तयार करण्याचे आदेश देते. शीर्षासन, विपरीतकरणी आणि ध्यानामुळे ही ग्रंथी सक्रिय राहते व संपूर्ण शरीरातील संप्रेरक संतुलन राखले जाते.
अधिवृक्क ग्रंथी (अॅडहेरल ग्लॅण्ड्स) आणि तणाव कमी करणे: ध्यान, प्राणायाम आणि शवासन यांमुळे कॉर्टिसॉल (तणाव संप्रेरक) कमी होते. त्यामुळे मानसिक तणाव कमी होतो. झोप सुधारते आणि हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
स्त्री संप्रेरक संतुलन : मासिक पाळी अनियमित असणे, पी.सी.ओ.डी./ पी.सी.ओ.एस., गर्भधारणेतील अडथळे हे सर्व हार्मोनल असंतुलनामुळे होत असते. बद्धकोणासन, सुप्त बद्धकोणासन, भुजंगासन, प्राणायाम आणि ध्यान यांमुळे यावर सकारात्मक परिणाम होतो. इन्सुलिन संप्रेरक संतुलन (मधुमेहासाठी): धनुरासन, अर्धमत्सेन्द्रासन आणि प्राणायाम यांमुळे पॅन्क्रियाज उत्तेजित होते आणि इन्सुलिनची कार्यक्षमता वाढते.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे विशेष फायदेशीर ठरते. कोर्टिसोल आणि झोपेचा दर्जा : अनिद्रा ही एक गंभीर समस्या झाली आहे. प्रत्येक रात्रीची झोप ही मेलाटोनिन संप्रेरकांवर अवलंबून असते. नियमित योग व ध्यान केल्यास, झोप चांगली लागते व मानसिक स्वास्थ्य टिकून राहते. कोर्टिसोलमुळे तणाव जाणवतो व अनिद्रा ही समस्या उद्भवते.
योग हा संप्रेरक संतुलन राखण्यासाठी एक नैसर्गिक आणि दुष्परिणाममुक्त उपाय आहे. नियमित योगाभ्यासामुळे संप्रेरक ग्रंथी सक्रिय राहतात, ताणाव कमी होतो आणि शरीर-मन यांचे आरोग्यपूर्ण संतुलन टिकते. योग ही फक्त व्यायामाची पद्धत नसून, ती एक जीवनशैली आहे. आधुनिक युगातील अनेक आजारांवर योग हा प्रभावी आणि नैसर्गिक उपाय आहे. जर आपण दररोज काही मिनिटे योगासाठी दिली, तर आरोग्य आणि तंदुरुस्तीचा सुंदर संगम आपल्याला अनुभवता येईल. ‘नियमित योग करा, निरोगी जीवनाचा आनंद घ्या!’ योगदिनाच्या शुभेच्छा!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.