प्रत्येक व्यक्तीला दररोज पुरेशी विश्रांती मिळणे आवश्यक असते. बदलत्या जीवनशैलीमुळे अवेळी जेवण अन् रात्री उशिरापर्यंत जागरणाचे प्रमाण वाढले आहे. व्यक्तीनुसार झोपेचे प्रमाण बदलत असले तरीही चांगल्या आरोग्यासाठी किमान सात तासांची झोप घेणे आवश्यक असते. ही झोप सलग असली पाहिजे.
झोपेमध्ये खंड पडला तर शरीराला त्याचा फारसा उपयोग होत नाही. अनेकांना रात्री जागरण करण्याची सवय असते. मात्र, ही सवय कालांतराने आरोग्यासाठी घातक ठरु शकते. झोप पूर्ण झाली नाही तर व्यक्तीच्या शरीरावर प्रतिकुल परिणाम होऊ शकतात. एका अभ्यासानुसार, रात्री झोप नीट न मिळाल्याने किंवा रात्रभर जागरण झाल्याने मनुष्याच्या डीएनएचा आकार बदलत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मानवी डीएनएच्या रचनेत बदल झाल्यास कर्करोगासह मधुमेह व इतर गंभीर आजाराची शक्यता वाढते. चुकीच्या जीवनशैलीचा सर्वात जास्त धोका वयाच्या तिशीनंतर आहे. या बदलांमुळेच कमी वयात कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. यावर वेळीच नियंत्रण न आणल्यास हा प्रकार किती धोकादायक आहे आणि रात्रीची झोप किती महत्त्वाची आहे, हे या संशोधनामुळे स्पष्ट झाले आहे. अपुऱ्या झोपेमुळे उद्भवणारी काही लक्षणे पाहूयात...
1. भावनिक अस्वस्थता – पुरेशी झोप न झाल्यामुळे व्यक्ती विनाकारण चीडचीड करते. बराच काळापासून शरीराला आवश्यक असणारी विश्रांती मिळाली नाही तर त्याचा परिणाम व्यक्तीच्या भावनांवर होतो. त्यामुळे व्यक्तीचा मूड सातत्याने बदलत राहतो.
2. विसरभोळेपणा – योग्य तितकी झोप न झाल्यास व्यक्तीमध्ये विसरभोळेपणा वाढतो. याचे प्रमाण काहीवेळा इतके वाढते की अगदी काही काळापूर्वी तुम्ही केलेली गोष्टही तुम्हाला सहज आठवेनाशी होते.
3. अकाली वृद्धत्व – आपण लवकर वयस्कर व्हावे असे कोणत्याच व्यक्तीला वाटत नाही. मात्र पुरेशी झोप न झालेल्या व्यक्तींच्या त्वचेवर लवकर सुरकुत्या पडतात. त्यामुळे व्यक्ती वयस्कर दिसू लागतात.
4. लठ्ठपणा – पुरेशी झोप न झालेल्या व्यक्तींचे शारीरिक गणित बिघडते. अन्नाचे योग्यप्रकारे पचन होत नाही. तसेच त्यांना वारंवार भूक लागण्याचीही शक्यता असते. त्यामुळे लठ्ठपणा वाढू शकतो.
5. कर्करोग होण्याची शक्यता – अपुऱ्या झोपेमुळे आपल्या शरीराचे नव्हे तर मेंदूचे कार्यही बिघडते. अपुरी झोप ही प्रोस्टेटचा कर्करोग, स्तनांचा कर्करोग यांसारख्या आजारांना कारणीभूत ठरु शकते.
6. कमी प्रतिकारशक्ती – अपुऱ्या झोपेमुळे शरीरातील प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते. त्यामुळे अशा लोकांना संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता जास्त असते.
निरोगी आरोग्यासाठी हे करा!
1. किमान सात ते आठ तास झोप घ्या.
2. रात्री 10 च्या आत जेवण करा.
3. रात्रीचे जेवण हलके व पचणार असेच घ्या.
4. पौष्टिक आहार घ्या.
5. भरपूर पाणी प्या.
6. नियमित व्यायाम करा.
7. चुकीच्या सवयी बदला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.