(Home remedies) लोकांना नेहमीच चिरतरुण राहायला आवडते. वाढत्या वयासोबत चेहऱ्याचा आकर्षकपणा कमी होण्यास सुरुवात होते. सध्या हिवाळ्याला सुरुवात झालीय, वातावरणात गारवा वाढला आहे. या ऋतूमध्ये त्वचा कोरडी बनते. मात्र 'ह्या' फळाचा आहारात समावेश करून नियमित सेवन केल्यास चेहऱ्यावरील सुरुकुत्या कमी होऊन तुम्ही चिरतरूण दिसाल सोबत निरोगी आणि सशक्त देखील व्हाल.
रसायन असलेलं दिव्य औषध, ज्याचा नंबर नारळाच्या खालोखाल लागतो असं पौष्टिक आणि 'व्हिटॅमिन सी'ने भरपूर असलेलं एकमेव फळ म्हणजे 'आवळा'. 'आमलकी' हे आवळ्याचं संस्कृत नाव. डोंगरी आवळा (जो आकाराने लहान) आणि बनारसी आवळा ( जो आकाराने मोठा) असे दोन प्रकार मिळतात. आयुर्वेदामध्ये रसायनाच्या दृष्टीने आवळा फार महत्वाचा मनाला जातो. आवळा साधारणतः कार्तिक महिन्यात तयार होतो.
आवळा पदार्थातील जो मांसल भाग असतो तोच खरा उपयोगी येतो. आवळ्याचा रस पित्तशामक आहे. कोणत्याही कारणाने पित्त वाढले असल्यास व पित्तामुळे डोळ्यापुढे अंधारी येत असेल तर आवळ्याचा रस 20 ग्रॅम, 20 ग्रॅम खडीसाखरेत घालून घ्यावा. एक-दोन दिवस हा उपाय केल्याने पित्त कमी होते. व्हिटॅमिन-सी, ए, पॉलिफेनॉल आणि फ्लेव्होनॉइड्स हे घटक आवळ्यात असून याच्या नियमित सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढून त्वचेचे आरोग्य सुधारते. आवळा हा क्षयरोगावर फार गुणकारी आहे. रोजच्या सेवनाने देह पुष्ट होतो. मूर्च्छा, ओकारी, श्वास व खोकला हे विकार होत नाहीत. तसेच याच्या प्रयोगाने बुद्धी, कांती, दीर्घायुष्य लाभते, जठराग्नी प्रदीप्त होतो, वातही कमी होतो.
आवळ्याच्या हंगामा व्यतिरिक्त ताजा आवळा मिळत नाही. त्यामुळे ताजा आवळा मिळाला नाही तरी मोरावळा,आवळ्याचा पाक,आवळ्याचा किस, आवळकाठी,आवळा सुपारी, आवळा पेठा, आवळ्याचं लोणचं, अशा अनेक स्वरूपात आपण आवळा वापरू शकतो. तस पाहिलं तर मोरावळा हाही गुणकारी समजला जातो. चांगले मोठे आवळे घेऊन ते वाफावेत व टोचून साखरेच्या पाकात टाकावेत व हे मिश्रण पंधरा दिवस काचेच्या बरणीत ठेवावे. साखरेत मुरवून ठेवलेल्या अशा आवळ्याला मोरावळा असे म्हणतात. आवळा शिजवला तरी त्याचा एकही गुण कमी होत नाही. एक मोरावळा रोज सकाळी खाल्ला तर रसायन म्हणून काम होऊन शरीरातील सप्त धातूंचं (रस, रक्त, मांस,मेद, अस्थी, मज्जा, शुक्र) पोषण होते.
(आयुर्वेदिक चिकित्सा ही व्यक्तिपरत्वे होणारी असते. वरील माहितीमधील औषधे तज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावीत)
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.