जेवणाचं काय करावं?’ हा उन्हाळ्यातला दर दिवसाचा कठीण प्रश्न असतो. एक तर उष्म्याने गळपटलेपणा नको म्हणावा इतका शरीरावर उतरून आलेला असतो आणि भूक केवळ औपचारिकता म्हणून देहाशी येत असते. तहान मात्र अगदी अस्सलपणे दहा दहा मिनिटांनी, अस्वलाने गुदगुल्या केल्याप्रमाणे आपल्याला छेडत असते. धोक्याचे सगळे इशारे ठावूक असतानादेखील ‘कोल्ड ड्रिंक’चे मायावी रंग पावला-पावलांवर मोहवीत असतात. गुलछबू मासिकातून देण्यात येणारे ‘नारळाचे पाणी प्या’ वगैरे सल्ले एखादे दिवशी मानणेच परवडण्यासारखे असते.
आपल्या दैनंदिन सामान्य आहारातच, उन्हाळ्यात आपली पचनशक्ती सहन करू शकेल अशी क्षमता नाही काय? नक्कीच आहे. पण त्यासाठी काही पथ्ये (जी कठीण नाहीच) पाळावी लागतील. उन्हाळा हा खरे तर आपल्या पचनशक्तीची परीक्षा घेणाराच मोसम आहे. ‘कंटाळा आला म्हणून खाणे किंवा खाण्याचा कंटाळा करणे’ या दोन भीषण पर्यायात आपल्यापैकी अनेकजण या काळात अडकलेले असतात. मग अशा वेळी काय करावे?
‘रोज शरीराला पौष्टिक घटक व पोषक आहार तत्वे मिळतात की नाही हे आवर्जून पहा.’ हे वाक्यही उन्हाळ्यात (किंबहुना सार्याच मोसमात) अगदी गुळमुळीत होऊन सामोरे येते. ‘पौष्टिक घटक व पोषक तत्वे’ हे जाहिरातीत वापरल्यासारखे शब्द आपोआपच नेहमीच्या वापरातल्या कडधान्यांना, फळभाज्यांना उगाच परके करून टाकतात. त्यापेक्षा, ‘या दिवसात बाजारात येणारी कलिंगडे किंवा अननस नियमितपणे (नियमित अंतराने देखील चालतील) घरी आणा आणि त्यांचा मस्त आनंद लुटा’ असे सांगण्याने ही फळे उन्हाळ्यात येणार्या पाहुण्यांसारखीच उन्हाळ्यात आनंद देतात.
टोमॅटोदेखील या दिवसात जिवाभावाचा मित्र बनू शकतो. तो तर उन्हाळ्यातल्या खोट्या खोट्या भुकेवरदेखील समाधान देतो आणि पोटासही तडस लागत नाही. तो स्वस्त असतो आणि त्यात रोग प्रतिकार वाढवण्याची शक्ती असते हे त्याचे बोनस गुण. अननस उन्हाळ्यात बाजारात उपलब्ध असतातच. त्यात असलेले ‘ब्रोमेलिन’ अन्नाच्या पचनासाठी खूपच चांगली मदत करते. या मोसमात बाजारात येणार्या कारल्यांना विसरू नका. त्यांचाही आहारात समावेश अवश्य करा. घरी कैऱ्या आणून त्यांचे बनवलेले पन्हे तर अमृतासमान असतं. या अमृताचा आनंद अधेमध्ये अवश्य लुटा. जेवणानंतर फळे खायची आपल्याला सवय असते. थोडं उलटा करून बघा- जेवणाआधी फळे खा. त्यानंतर केलेलं जेवण योग्य प्रमाणातच आपल्या पोटात जाईल.
उन्हाळ्यातले दिवस इतके दमट असतात की त्यामुळे अनेकदा अन्नावरची वासनाच उडून जाते. अशा वेळी ‘पेज’ हा या दिवसातला उत्तम आहार आहे. आम्हा गोमंतकीयांना पेज अजिबात नवीन नाही. पचनाला हलकी असल्याने, करपट ढेकर किंवा पोटातली जळजळ पेज ती दूर ठेवते. स्वयंपाकासाठी लोखंडी भांड्यांचा (तवा, कढई वगैरे) वापर करणे उत्तम. त्यातून हिमोग्लोबिनची पातळीही वाढते.
या दिवसात बाहेरचे प्यायचेच असे वाटले तर उसाच्या रसपानाचे सुख अवश्य अनुभवा. या रसात असणारे इलेक्ट्रोलाईट शरीराला ऊर्जा पुरवतातच शिवाय त्या रसातली लोह, मॅग्नीज, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम ही खनिज द्रव्ये शरीराला फायदेशीर ठरतात.
जंक फूड टाळाच. घरीही घरीही फारसे तेलकट पदार्थ बनवू नका. घरची फळे, गाजर, काकडी यांची मस्त कोशिंबीर बनवा. नेहमीच्या आपल्या डाळींचा समावेश जेवणात करा. तांदूळ, ज्वारी, बाजरीपासून जे बनते ते उत्तमच असते. घरात दही असेल तर उत्तमच. ते चाखा. अगदीच चैन करायची असेल तर घरच्या घरी मिल्कशेक बनवा. उन्हाळ्यात पोटाचे स्वास्थ्य मजबूत ठेवणे कठीण नाही, महागही नाही. अदबशीर अन्नसेवनाने ते नक्कीच शक्य आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.