मन स्पर्शातीत व्हायला लावणाऱ्या असंख्य आठवणी. गावच्या बालपणीतल्या आठवणी. मातीचा गंध आणि पहिला पाऊस. कौलावरून उतरणारं पाणी सगळीकडं हिरवं हिरवं. ‘‘पावसा यो पावस यो’’ करीत पक्षी पावसाला हाक मारायचा आणि मग पाऊस यायचा. ओढ्याचा आवाज. बेडकांचा आवाज. अधूनमधून साप येऊन जायचे. रात्र झाली, की रातकिड्यांची कीर्रकीर्र आणि लुकलुकणारे कित्येक काजवे अवतीभवती भिरभिरत यायचे. कधी उनाड माकडाचं टोळकं पावसानं भिजत कौलावरून जायचं. पाऊस जरा ओसरला की खारी, चिमण्या, अंगणात यायच्या. एखादं घुबड आपले मोठे डोळे वटारत जवळ येऊन बसायचं. लाकूडतोडा पक्षी टकटक करायचा. फुलपाखरं भिरभिरत राहायची. केवड्याचा वास धुंद करायचा. नकळत मन फुलायचं... झुलायचं
पाऊस आला, की सृजन प्रक्रिया सुरू व्हायची. भूमी फुलायची... कित्येक पाऊस फुलांनी पावसात भिजत कुळागरातून रानातून फिरताना मन हिरवं हिरवं राहायचं. कधी रानातल्या झाडावर बसलेला मोर दिसायचा. गोगलगाय, तपुकळ, लाल मुंग्या, काळ्या मुंग्या, उडउडणाऱ्या मुंग्या.. कुस लावणाऱ्या किडी, सृजनानं, उर्जेन, रंगानं, गंधानं, नादानं व्यापलेले ते क्षण. सांज झाली का माडांनी, झाडांनी, हिरव्या निसर्गानं आठवणीनं ओलंचिंब झालेलं ते जग आठवतं आणि मी जगलेले ते पावसातले क्षण. यात मिळणार नाही असे क्षण.
पावसाचं येणं आणि जाणं
पावसाचं चिरंतन रूप
पावसाचं ऊर्जा रूप, सृजनरूप
दरवर्षी पाऊस येतो जातो, पण पावसांसोबतच्या आठवणी पावसाच्या थेंबासारख्या मनावर बरसतात. अशा बाहेरच्या प्रवासातल्या पावसाच्या कित्येक आठवणी आहेत. दिल्लीतला ‘अनप्रेडिक्टेबल पाऊस’.. धुळीला घेऊन येणारा पाऊस.. धूळ वर येत गरगरत भोवऱ्यासारखी. एखादी पोरगी घागरा फिरवत गोल गोल नाचत तशी आणि मग पाऊस येतो. मध्यप्रदेशात एकदा धुळीच्या वादळाची आणि मग पावसाची गाठ पडली होती. तो पाऊस पाहताना मनाला अनामिक भय आणि सभोवताली डोलणारे वृक्ष बेफाम वादळं पाहण्याची ओढ. पावसाचं रौद्र धुवाधार रूप.
हिमालयातल्या पावसाचे रौद्ररूप हे मध्यप्रदेशापेक्षा रौद्र भीषण डोळं दीपावणारं संपूर्ण आकाशच पेटतं आणि आकाश कोसळतं, विजेचा लोळच लोळ. अथांग निसर्गासारखा पाऊसही अथांग पावसाच्या तडाख्याचा आघात पहाडातला पहाडी माणूस सहज पचवतो. पाऊस तिथं क्षणाक्षणाला सांगतो ‘‘ माझ्या पुढं तुमचं काही चालत नाही. तुमचं अस्तित्व माझ्या विराट रूपापुढे नगण्य आहे’’. हिमालयातला पाऊस म्हणजे शिवच नटराजाच्या रूपात नर्तन करतो असं वाटावं असा. मनाला मुक्त करणारा असा पाऊस. त्या क्षणांची आज लिहिताना आठवण येते. आणि माझ्या मनावरचे भूमिकांचे ओझे विसरून कितीतरी अव्यक्त क्षण पाकळी पाकळीनं व्यक्त होत राहतात.पावसातले ते क्षण मस्त निर्भर भिजणं आणि जगणंही. आजही पाऊस पडतो अविरत. पण ह्या पावसात भिजावंसं वाटत नाही... एक पोकळी कधीही न भरून येणारी, अविरत अशी वेदना, ‘‘तू नसल्याचं’’ दुःख. बाहेर पाऊस कोसळतो आणि मनातही मनात आदिम वेदना ‘‘ तू नसण्याची’’
हरवलेला ह्रदयाचा तुकडा
आणि पोकळीतून बरसणारा
पाऊस आठवणींचा
आणि मनात एक सागर रितेपणाचा
आणि मुक्या वेदनांचा पाऊस.
-सुजाता सिंगबाळ
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.