इतिहासाच्या पाऊलखुणा: रामनाथीचे रामनाथ मंदिर

मंदिराच्या मध्यभागी श्री रामनाथाची स्थापना करून, एका बाजूला कामाक्षी तर दुसऱ्या बाजूला सातेरी, अशा दोन देवींच्या मूर्ती स्थापन केल्या.
Ramnath Temple at Ramnathi in Bandoda is  landmark in history
Ramnath Temple at Ramnathi in Bandoda is landmark in history Dainik Gomantak
Published on
Updated on

बांदोडा येथील रामनाथी येथे स्थित असलेले रामनाथ मंदिर इतिहासाच्या कोंदणात वसलेले आहे. मूळतः हे मंदिर सासष्टी तालुक्यात जुवारी नदीच्या काठावर वसलेल्या लोटली या सुंदर गावात स्थित होते. 1568 साली पोर्तुगीज ‘इन्क्विझिशन’आणि त्याअंतर्गत पोर्तुगीजांनी माजविलेल्या दहशतीमुळे श्री रामनाथाच्या भक्तांना ही मूर्ती बांदिवडे किंवा बांदोडा या गावात स्थलांतरित करावी लागली. अंत्रुज महाल म्हणजेच फोंडा तालुक्यातील हा प्रदेश तत्कालीन आदिलशाही राजवटीखाली होता.

रायतूर (राचोल) येथील किल्ल्याचा पोर्तुगीज किल्लेदार दिओगो रॉड्रिग्सने लोटली येथील भगवान रामनाथाचे मंदिर नष्ट केले आणि जाळून टाकले. या गोष्टीचा स्थानिक भक्तांना आधीच सुगावा लागला होता, त्यामुळे त्यांनी तत्काळ मूर्ती स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. मूर्ती घेऊन रासई येथून त्यांनी झुवारी नदी ओलांडण्यास सुरुवात केली आणि झुवारीच्या दुसऱ्या बाजूला दुर्भाट येथे ते पोहोचले. दुर्भाट येथून आडपई आणि आडपईहून बांदोडा असा त्यांनी प्रवास केला आणि बांदोडा येथे श्री रामनाथाच्या मूर्तीला आश्रयस्थान लाभले.

Ramnath Temple at Ramnathi in Bandoda is  landmark in history
गोव्याला दुसऱ्या वसाहतवादाकडे फरपटत नेण्याची नांदी

भाविकांनी आपले कुलदैवत श्री रामनाथासाठी बांदोडा येथे छोटेसे मंदिर उभारले. मंदिराच्या मध्यभागी श्री रामनाथाची स्थापना करून, एका बाजूला कामाक्षी तर दुसऱ्या बाजूला सातेरी, अशा दोन देवींच्या मूर्ती स्थापन केल्या. त्याचबरोबर ‘सिद्धिविनायक’नामक गणपतीची एक मूर्तीही या मंदिरात असलेली पाहायला मिळते. या मुख्य रामनाथ मंदिराजवळ बेताळ आणि काळभैरवाची मंदिरे आहेत.

पुढे 18 व्या शतकाच्या मध्यात मंगेशी आणि कवळे येथील शांतादुर्गा मंदिरांप्रमाणेच रामनाथ मंदिराचीही पुनर्बांधणी करण्यात आली. वस्तुतः कवळे येथील शांतादुर्गा मंदिर आणि बांदोडा येथील रामनाथ मंदिर ही एकमेकांच्या शेजारी आहेत. या परिसरात मूळपुरुष नरसिंहाचे छोटेसे मंदिरही आहे. रामनाथ मंदिरात एक सुंदर तळी आहे, नगारखाना आहे. त्याचबरोबर एक विशिष्ट दीपस्तंभ आहे. या दीपस्तंभाचे वैशिष्ट्य म्हणजे, या दीपस्तंभावर तुकाराम, मीराबाई, रामदास स्वामी आणि इतर संतांच्या प्रतिमा आहेत. मंदिरात व्यासपीठासह एक भव्य आयताकृती सभामंडप आहे. मंदिराची अंतर्गत रचना फारच सुंदर आहे. आतील भागात सुंदर आणि रेखीव पर्ण फुलांच्या रचना आहेत. चांदीचा रूपेरी भव्य दरवाजा मुख्य देवता श्री रामनाथ यांचे निवासस्थान असलेल्या सुंदर गाभाऱ्याकडे नेतो. मंदिराला भोपळ्याच्या आकाराचा सुंदर घुमट आहे. महाशिवरात्री आणि इतर सणांच्या प्रसंगी मंदिराचे उजळलेले दृश्य विलक्षण सुखदायक आणि प्रसन्न भासते.

Ramnath Temple at Ramnathi in Bandoda is  landmark in history
लोकशाहीचा गोमंतकीय प्रयोग अपयशी?

1966 साली बांधलेले मंदिराचे सभागृह लग्न-कार्यांसाठी बरेच लोकप्रिय आहे. या सभागृहाचे वैशिष्ट्य म्हणजे खिडकीच्या ठिकाणी फुलांच्या नमुन्यांची दगडी जाळी आहे. बेताळ नामक एक सभागृह आणि इतर काही सभागृहे इथे आहेत. भक्तांच्या सोयीसाठी आणि आरामशीर मुक्कामासाठी खोल्यादेखील उपलब्ध आहेत. या मंदिराचे सर्वात लोकप्रिय सांस्कृतिक वैशिष्ट्य म्हणजे, 1946 साली इथे स्थापन केलेले नाट्यमंडळ होय. त्या वर्षापासून मंदिरातील महाजन महाशिवरात्रीच्या सणानिमित्ताने विविध नाटकांचे आयोजन करतात.

माझ्या आजोळचे कुलदैवत श्री रामनाथ असल्यामुळे, माझी आई श्रीमती मिलन केणी साखरदांडे यांनी येथे रंगलेल्या काही नाटकांमध्ये स्वतः अभिनय करुन विविध भुमिका बजावलेल्या आहेत. माझे आजोबा श्री गुलाबचंद केणी आणि माझ्या दोन मावश्यांनीही या नाटकांमध्ये अभिनय केला आहे. कोणतेही नाटक सुरू करण्यापूर्वी भगवान रामनाथासाठी म्हटली जाणारी नांदी खरोखरच सुंदर आणि दर्शनीय असते. अशाप्रकारे आपण पाहू शकतो की लोटली येथील श्री रामनाथाची मूर्ती 16 व्या शतकात बांदोडा येथे स्थलांतरित झाली. या स्थलांतरानंतर बांदोडा येथील या मंदिराच्या आसपासचा परिसर रामनाथी याच नावाने ओळखला जाऊ लागला. ‘इन्क्विझिशन’च्या वेळी धर्मांतराच्या भीतीने पळून गेलेले श्री रामनाथाचे मूळ गोमंतकीय असे कित्येक भाविक आज कर्नाटकात पसरले आहेत. गोव्यातील भक्तांप्रमाणे ही कुटुंबेही सणाच्या निमित्ताने गोव्याला भेट देतात आणि मनोभावे श्री रामनाथाचे दर्शन घेतात. जय श्री रामनाथ.

- प्रजल साखरदांडे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com