प्रायव्हसी जपा; स्पष्टता व अर्थ

सर्वांबरोबर गोडीगुलाबीने, हसत खेळत राहताना आपल्या प्रायव्हसीची सीमारेषा आपणच स्पष्टपणे जाणून ती सांभाळावी. तिथं रोधन कवच म्हणजे इन्शुलेशन उभारावं. पिडणूक, छळ, जाच होणार नाही.
Protect your privacy

Protect your privacy

Dainik Gomantak

Published on
Updated on

फोन केला तर तू घेत नाही. मॅसेज पाठवला तर उत्तर देत नाही. अजबच तुझं'.

'अजब म्हण, विचित्र म्हण, नाही तर विक्षिप्त म्हण. फोन माझा. तो कधी ऑफ ठेवावा, किती वेळ बंद ठेवावा, वाजल्यावर घ्यावा की नको हे मी ठरवणार. मला माझी शांती महत्त्वाची.' असं उत्तर मी माझ्या मित्राला देतो.

प्रत्येक मनुष्याभोवती एक खाजगीपणाचं म्हणजेच वैयक्तिक प्रायव्हसीचं कव्हर असतं. त्यात दुसऱ्यानं अतिक्रमण वा हस्तक्षेप करणं बरोबर नसतं. 'प्रायव्हसी' हा माझा जिव्हाळ्याचा चिंतनाचा विषय.

हे बघा, रविवारी मी माझ्या कामाच्या धबडग्याच्या चक्रव्युहात व्यवस्थित नियोजन करून गुंतलेलो असतो. कामं क्रमवार लावलेली असतात. बाजार असतो, कधी लिहिण्याचं, कधी वाचनाचं जे काय आहे ते...

अकस्मात बेल वाजते. इतक्यात मस्णोबाब प्रवेशतो. सहज. कॅज्युअल. सांगतो कसा, ''त्याचं काय झालं, बेकारबाबाकडे आलो होतो, तुमच्याच कॉलनीत. मेल्याला सांगितलं होतं यायच्या अगोदर. दार बंद. फोन केला. ट्रॅफिक जॅममध्ये अडकलाय म्हणे. अर्ध्या तासात पोचणार. म्हटलं तुम्ही आहातच...''

मी निरूत्तर. सांगण्याचं तात्पर्य म्हणजे प्रायव्हसीविषयी पर्वा नाही. फिकीर नाही. दुसऱ्याच्या वेळेची पर्वा नाही. म्हणून ही बेशिस्त घडते.

लहान मुलाचंही त्याचं आपलं प्रायव्हसीचं विश्व असतं. तो त्यात रमतो. तो कायम खेळतच राहतो असं नव्हे. त्याचा मूड नसतो, त्या स्थितीत त्याला दर्याकिनारी वाळूचे किल्ले बांधायला जाऊ म्हणू आग्रह केला तर ते त्याच्या प्रायव्हसीवर घाला घालण्यासारखं आहे.

मला भेटायला कोण यायचा आहे, ते आधी ठरलं आहे. अशा वेळी आणखीन आगंतुक, बिन बुलाए मेहमान आले तर मी त्याना वेळ देत नाही. आपण कुणाला तरी अकस्मात धडकून त्रास करतोय याची जाणीव ज्याला नसते त्याची दगदग आपण का सोसून घेऊ?

मूल्यशिक्षणाचा सध्या बाऊ सुरू आहे. संस्कार हवेत. आपली प्रायव्हसी सांभाळणे आनी दुसऱ्यांच्या खाजगीपणात व्यत्यय आणू नये हा धडा मुलांना बारावीपर्यंत शिकवावा असं मला वाटतं.

प्रायव्हसी हा अनाकलनीय, अगोचर असा स्वस्थचित्त प्रांत असतो. शब्दात पकडून सांगता येत नाही. कधीकधी आपणाला निवांत एकांत हवाहवासा वाटतो. तिच ती प्रायव्हसी. ते काही विसाव्याचे क्षण आपणाला उज्जिवीत ताजेतवाने करून टाकतात. कुणीही विचलित करू नये, असं वाटतं. कधीकधी अंतर्मुख होऊन राहावं, बोलूच नये असंही वाटतं. खाजगीपणाविना व्यक्ती असण्यात अर्थ नसतो. आजच्या डिजिटल सोशल माध्यम नियंत्रित जगात प्रायव्हसी हा विषय जास्तीत जास्त समस्या बनत आहे.

<div class="paragraphs"><p>Protect your privacy</p></div>
लव्ह स्टोरी सक्सेसफुल! पण रिचा आणि अलीचे लग्न लांबणीवर

तू लग्न झाला आहेस का? मुलं झाली नाही? त्यांना नाटकंच का आवडतात? टीव्हीच जास्त का आवडतो? तुम्ही दोन्ही कोविड डोस घेतले का? प्रायव्हसीत रिगणारे असले फालतू, अनाहूत प्रश्न विचारायची वाईट सवय लोकांना असते. ती गाडी का विकली? तू आता नवीन गाडी घ्यायला पाहिजे, असे वैताग आणणारे बाष्कळ प्रश्न विचारून आपण दुसऱ्यांच्या प्रायव्हसीत प्रवेश करतो. श्वास घेतो तितकीच मूलभूत चीज आहे ही – प्रायव्हसी. आदर करूया तिचा.

मित्र जिवलग असला तरीही आपण त्याचं प्रायव्हसीचं क्षेत्र मर्यादेबाहेर विचलित करणं बरोबर नाही. त्याच्या किंवा कुणाच्याही घरी अकस्मात गेलो तर त्यांचं पूर्वनिर्धारीत वेळापत्रक चक्र दिशाहीन अर्थात फ्रॅक्चर होतं.

हल्ली टीव्ही सिरियलमध्ये मश्गुल असणाऱ्यांना दुसरा नातेवाईकसुध्दा आलेला नको असतो.

सर्वांबरोबर गोडीगुलाबीने, हसत खेळत राहताना आपल्या प्रायव्हसीची सीमारेषा आपणच स्पष्टपणे जाणून ती सांभाळावी. तिथं रोधन कवच म्हणजे इन्शुलेशन उभारावं. पिडणूक, छळ, जाच होणार नाही.

बाबासाहेब पुरंदरेंचा एक मंत्र आहे, विचार! दिलेला शब्द आणि वेळ पाळत नसेल तर तो भ्रष्टाचार ठरतो. कारण या दोन्ही गोष्टींचं आपण उल्लंघन करतो तेव्हा दुसऱ्यांच्या प्रायव्हसीत आपण बाधा आणतो. आपल्या अनास्थेमुळे दुसऱ्याला त्रास करतो. आपली आणि दुसऱ्याची प्रायव्हसी अदबशीलतेने, विनयशीलतेने, अगत्याने, प्रेमपूर्वक पाळली पाहिजे.

कायद्यात खाजगीकरणाची व्याख्या केलेली आहे. खाजगीकरणाच्या हक्कासंदर्भात विधिज्ञ वेळोवेळी ऊहापोह करतात.

एक सज्जन सद्गुणी सद्गृहस्थ होता. त्याचा एक मित्र त्याच्याकडे आला होता. मित्राला या सज्जनाने आपलं प्रशस्त भवन दाखवलं. बागेत नेलं. झाडांची माहिती दिली. पुढं एक ओहोळ होता. त्याच्या बाजूला एक कुटी होती. सज्जन सगळी माहिती देत होता. मित्र त्याला परत परत विचारणा करत होता, ''ही कुटी कसली? ''

कुटीकडे बोट दाखवून मित्राचा प्रश्न.

सज्जन निःशब्द. काहीही उत्तर नाही.

मित्राला विचित्र वाटलं. आपलं काही चुकलं का? खाजगीकरणात घुसलो की काय? द्विधा स्थिती.

<div class="paragraphs"><p>Protect your privacy</p></div>
दिवार बेटावरील तलाव आणि स्मशानभूमी कर्नाटक-गोवा यांच्यातील दुवा

चहा वगैरे झाल्यानंतर सज्जन मित्राला सोडायला मुख्य द्वाराजवळ गेला. सज्जनानं स्पष्ट केलं – ती कुटी माझी प्रायव्हसीची खोली. मनातील कोलाहल वाढल्यावर मी वाट्टेल तेव्हा तिथं जातो. आराम करतो. श्वासाच्या झोपाळ्यावर डुलत राहतो. तो ठेका, तो ताल फॅनसारखा वेगवान फिरणारं मन, मनातील अस्वस्थता, आवेग, गोंधळ सगळं काही जाग्यावर, समेवर आणतं. स्थिरतेत, शांततेत.

''मग तुम्ही उत्तर का दिलं नाही मघाशी? ''

उत्तर दिलं मित्रा. तुला नाही समजलं. गुपचूप राहिलो याचा अर्थ ती कुटी गप्प राहण्याची, गप्प होण्याची. स्वतःच्या आत जाण्याचा सराव करण्याची....

मित्राच्या डोळ्यात प्रायव्हसीची स्पष्टता व अर्थ चमकत राहिला!

-मुकेश थळी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com