- प्रदीप नाईक
'परफॉर्मिंग आर्ट असोसिएशन ऑफ इंडिया’ आणि ‘सम्राट क्लब- पर्वरी’ यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय गायन स्पर्धेअंतर्गत, दक्षिण विभागासाठी घेण्यात आलेल्या फेरीत, 18 ते 24 वर्षीय गटासाठी भारतीय चित्रपट संगीत (पुरुष) विभागात वास्कोच्या नवाब शेख याला प्रथम क्रमांकाचे बक्षीस प्राप्त झाले. नवाब शेख आता हरिद्वार येथे अखिल भारतीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेत गोव्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
या स्पर्धेअंतर्गत दक्षिण भारत विजेतेपदासाठी गायन स्पर्धेची गोव्यासाठीची (Goa) पहिली फेरी पर्वरी येथे घेण्यात आली. 18 ते 24 वयोगटासाठी भारतीय चित्रपट संगीत पुरुष विभागात नवाब शेख याला प्रथम क्रमांकाचे बक्षीस प्राप्त झाले. नवाब शेख हा मडगाव येथील चौगुले कॉलेजच्या विज्ञान शाखेचा विद्यार्थी आहे. यापूर्वी त्याने अखिल गोमंतकीय तसेच अखिल भारतीय गायन स्पर्धेत भाग घेऊन अनेक बक्षिसे पटकावली आहेत. कोविड महामारी काळात ऑनलाईन (Online) पद्धतीने घेण्यात आलेल्या गायन स्पर्धांमधूनही त्याने अनेक बक्षिसे पटकावली आहेत. ' स्टेज फॉर यू' या स्पर्धेत व ‘स्वर-योद्धा’ या राष्ट्रीय स्तरावर आयोजित स्पर्धेत त्याला प्रथम बक्षीस लाभले आहे. सुरेश वाडकर अकादमी आयोजित जागतिक स्तरावरील गायन स्पर्धेत त्याने पहिल्या 110 मध्ये स्थान पटकावून जावेद अली या संगीतकारकडून कौतुकाची थाप मिळवली आहे. ‘संगीत परीक्षा’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेतही आपली चमक दाखवून, इंडियन आयडियल अंकुश भारद्वाज यांच्याकडून शाबासकी मिळवली आहे. कला व संस्कृती संचालनालय आयोजित राज्य स्तरीय ‘टॅलेंट सर्च’ स्पर्धेत तो प्रथम बक्षिसाचा मानकरी ठरला होता.
शास्त्रीय संगीताचा शागिर्द
अखिल गोवा पातळीवरील अभंग, नाट्यगीत, भावगीत, कॅरोल गायन, घुमट आरती अशा विविध शैलीच्या गायनात प्रथम क्रमांकाची बक्षिसे प्राप्त करून त्याने कलाप्रेमींच्या हृदयात स्थान मिळवले आहे. या उभरत्या गायक कलाकाराने संगीत कलेत दाखवलेली चमक व त्याला लाभलेल्या सुमधुर गळ्यामुळेच सर्व स्तरांतून त्याचे कौतुक होत आहे. नवाब शेख हा हेडलँड सडा येथील शास्त्रीय संगीत शिक्षक शरद मठकर यांचा शिष्य आहे. शेख आपल्या विजयाचे सर्व श्रेय आपले आई वडील व आपले गुरू शरद मठकर यांना देतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.