म्हणून 'कशाय' देखील मागवला...

उकळत्या पाण्यात कशायचा मसाला घालून त्यात चवीपुरता गूळ घालून भरपूर उकळतात.
Kashay Yellow tea from Goa
Kashay Yellow tea from GoaDainik Gomantak
Published on
Updated on

फिल्डवर्कवर असताना हमखास चहाची तल्लफ येते. गरम गरम चहा घशाखाली उतरला की जरा तरतरी येते. पण खूप चहा पिऊन अॅसिडिटी वाढते. या अॅसिडिटीच्या भीतीपोटी चहा प्यावासा वाटत नाही. चहाला उत्तम पर्याय मिळत नव्हता. एकदा नेत्रावळीला गेले होते. तिथल्या छोट्याशा टपरीसारख्या हॉटेलमध्ये चहा घ्यायला थांबले होते. आजूबाजूच्या लोकांना बघितलं तर चहाच्याच कपात पिवळ्या रंगाचं गरम गरम वाफाळलेलं पेय ते पीत होते. जसं घरी आपण गरम दुधात हळद घालून पितो तसंच ते हळदीच्या दुधासारखं पेय दिसत होतं. त्या हॉटेलमध्ये जो कोणी येत होता, तो हे पिवळ्या रंगाचं पेय पीत होता. शेवटी न राहवून मी हॉटेलमालकाला त्या पिवळ्या पेयाबद्दल विचारलं तर त्याला ‘कशाय’ असं म्हणतात हे समजलं. 

कशाय हे नाव मी पहिल्यांदाच ऐकलं. एक कप चहा पिऊन झाला होता. पण कशायने उत्सुकता वाढवली होती म्हणून कशाय देखील मागवला. हळदीच्या दुधालाच इथले लोक बहुतेक कशाय म्हणतात की काय, असं वाटू लागलं. अतिशय उत्सुकता वाढवणाऱ्‍या कशायचा ग्लास समोर येताच सर्वांत आधी त्याचा वास घेतला. लवंग, दालचिनी, सुंठ यांचा छान एकत्रित सुगंध आला. चव वेगळीच लागली. गरम गरम कशाय पिताना घसा छान शेकून निघाला. एकदाच पिऊन तुम्हाला कशाय आवडेल, असं होणार नाही. मलाही तसं पहिल्यांदा आवडलं नाही. पण प्रोजेक्टच्या निमित्ताने नेत्रावळीला रोज जाणं होऊ लागलं आणि रोज त्या हॉटेलला थांबून एक ग्लास कशाय पिणं होऊ लागलं. यातून कशायची चव आवडत गेली.

Kashay Yellow tea from Goa
Restaurant in Goa: फॉरेस्ट इन कॅफे

कशायचा अधिक तपशीलात शोध घ्यायचा प्रयत्न केला असता त्याचं मूळ आयुर्वेदापर्यंत गेलं. चरकाने लिहिलेल्या संहितेत कशायबद्दलचे उल्लेख सापडतात. म्हणून याला प्राचीन पेय म्हणू शकतो. कशायचं महत्त्व कोरोनाच्या काळात जास्त समजलं.

खोकला, सर्दी, घसादुखी या साऱ्यावर कशाय चांगलं उपायकारक. वेगवेगळे काढे करून पिण्यापेक्षा सकाळ-संध्याकाळी कशाय करून पिणं देखील आरोग्यासाठी चांगलं. फक्त एवढंच नाही तर सांधेदुखी, चिंता, तणाव, वारंवार मनःस्थिती बदलणे, नैराश्य यातील प्रत्येक गोष्टीवर कशायमुळे उपाय होतो.

कशायला एवढं महत्त्व आहे हे माहीत नव्हतं. अनेक पोषणतज्ज्ञ कशायची शिफारस करतात. रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी देखील याचा उपयोग होऊ शकतो. अनेकांचा असा विश्वास आहे की दिवसातून दोन वेगवेगळ्या प्रकारचे कशाय केल्याने चयापचय वाढते आणि मन शांत होण्यास मदत होते.

आपल्याकडे घराघरांत कशाय करायच्या वेगवेगळ्या पध्दती आहेत. नेत्रावळीच्या हॉटेलमध्ये दिलं जाणारं कशाय हे दुधातलं आहे. पण ग्रामीण भागात घराघरांत कशाय बनवतात तो पाण्यात. उकळत्या पाण्यात कशायचा मसाला घालून त्यात चवीपुरता गूळ घालून भरपूर उकळतात. यात प्रामुख्याने मिरी, दालचिनी, लवंग, मेथी दाणे, बडीशेप, आलं आणि हळद हे सारं वाटून घातलं जातं. पाण्यात जसं केलं जातं तसंच दुधात देखील करतात. गरम दुधात कशाय मसाला घालून चांगली उकळी फुटेपर्यंत दूध गरम करतात. कशाय मसाल्यातील हळदीमुळे दुधाला पिवळसर रंग येतो. लवंग-बडीशेप आणि दालचिनीमुळे त्याचा सुवास देखील वेगळाच येतो.

Kashay Yellow tea from Goa
Restaurant in Goa: नैवेद्याची खिचडी...

जांबावलीच्या देवळाबाहेर असलेल्या छोट्याशा रेस्टॉरंटमध्ये छान कशाय मिळते. जांबावलीवरून तिळामळ चौकात आल्यावर त्याच चौकातील एका रेस्टॉरंटमध्ये गरम गरम कशाय मिळते. शिवाय कशायची पावडर देखील तेथे मिळते. विशेषतः केपे, सांगे, काणकोण या भागातल्या रेस्टॉरंटमध्येच कशाय मिळते. या भागात चहा व्यतिरिक्त एवढ्या मोठ्या प्रमाणावर कशायसारखं पेय प्यायले जाते हेच खूप विशेष आहे. चहामुळे आरोग्याची हानी होते; पण कशायमुळे नाही. पण हे समजायला मला खूप दिवस लागले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com