आज सर्वत्र जागतिक संग्रहालय दिन साजरा केला जात आहे. या निमित्ताने मिरामार येथील गोवा सायन्स सेंटरने ‘माय ऑन कलेक्शन’ हे प्रदर्शन आयोजित केले आहे. हे प्रदर्शन आज सकाळी 9:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाहण्यासाठी खुले असेल. यात अनेकांनी आपल्या आवडीनुसार जमवलेल्या वस्तू- स्टॅम्प, नाणी, पोस्टकार्ड किंवा इतर काही, दर्शकांना तिथे पहावयास मिळतील. (International Museum Day Goa best Museum)
संग्रहालय म्हटल्यावर ते अवाढव्य असायला हवे असे काही नाही. गोव्यात आज अनेक संग्राहक आहेत. त्यानी केवळ जुन्या-पुराण्या वस्तूंवरील त्यांच्या उत्कट प्रेमामुळे अनेक दुर्मिळ वस्तूंचा संग्रह केला आहे. वास्कोचा तेजस पंडित, गोविंद शिरोडकर, सत्तरीतील गोपीनाथ गांवस यांनी आपल्या पदरचे पैसे खर्च करून जे जमवले आहे त्याचे मुल्य केवळ पैशाने करणे शक्य होणार नाही. त्या वस्तू जमवण्यामागचे त्यांचे श्रम, त्यांची तळमळ यांचे मुल्य करणे तर अशक्यच होईल. या संग्रहकांसारखे गोव्यात आणखीनही संग्रहक असतील ज्यांनी अशा अऩेक ‘अप्राप्य’ वस्तू मिनतवारीने मिळवल्या असतील.
गोव्यात (Goa) असेही काही खाजगी संग्राहक आहेत, ज्यांच्या छंदाचा विस्तार होऊन आज त्यांनी जमा केलेल्या वस्तूंची जागतिक दर्जाची उत्कृष्ट संग्रहालये बनलेली आहेत. गोव्यात, बाणावली गावात असलेले ‘गोवा चित्रा’ (Chitra Museum) हे अशा संग्रहालयाचे उत्तम उदाहरण आहे. चित्रकार असलेल्या व्हिक्टर गोन्साल्विस याने गेल्या कित्येक वर्षाच्या आपल्या अथक परिश्रमाने, आपल्या या संग्रहालयाला स्वप्नसदृश जागा बनवली आहे. ‘वारसा जतन करणे आणि तो भावी पिढीपर्यंत पोहचवणे’ हे त्या संग्रहालयाचे घोषवाक्यच, त्याच्या कर्तृत्वाची साक्ष देते.
चाडवाडो, वार्का येथे असलेले ‘सात थॉन’ हे संग्रहालय हे 1800 सालापासून झालेल्या अनेक तांत्रिक क्रांतीच्या खुणा आपल्यासमोर मांडते. थॉमस कोस्टा हे या संग्रहालयाचे चालक आणि मालक. आपल्या जगातील तांत्रिक प्रगतीच्या पायऱ्या स्पष्ट करणाऱ्या या संग्रहालयात, छापखाना, संगीत, दिवे, सिनेमा, घड्याळे, रेडिओ, कॅमेरा आणि मानवाचे जीवन बदलून टाकणाऱ्या अनेक वस्तूंमध्ये वेळोवेळी झालेल्या उत्क्रांतीचे दर्शन घडवते. हस्तीदंती कीबोर्ड असलेला, आशियातला एकमेव ग्रॅण्ड पियानो तुम्हाला इथे पहायला मिळेल. जर हे वाद्य तुम्हाला वाजवता येत असेल तर ते वाजवण्याचे भाग्यही तुमच्या नशिबात असू शकते.
प्रसिध्द वास्तुविशारद जेरार्ड दा कुन्हा यांचे ‘हाऊसेस ऑफ गोवा’ संग्रहालय एका आकर्षक त्रिकोणी जहाजासारख्या दिसणाऱ्या इमारतीत वसले आहे. गोव्याच्या ऐतिहासिक पैलूला स्पर्श करणाऱ्या अनेक वस्तू इथे मांडलेल्या आहेत. या संग्रहालयातून फेरफटका मारणे म्हणजे निःसंशय काळात मागे जाऊन प्रवास करण्यासारखे आहे.
प्रसिध्द वास्तुविशारद जेरार्ड दा कुन्हा यांचे ‘हाऊसेस ऑफ गोवा’ संग्रहालय एका आकर्षक त्रिकोणी जहाजासारख्या दिसणाऱ्या इमारतीत वसले आहे. गोव्याच्या ऐतिहासिक पैलूला स्पर्श करणाऱ्या अनेक वस्तू इथे मांडलेल्या आहेत. या संग्रहालयातून फेरफटका मारणे म्हणजे निःसंशय काळात मागे जाऊन प्रवास करण्यासारखे आहे.
नुवे (Nuvem) येथे असलेल्या ‘अश्वेक व्हिंटेज वर्ल्ड’ मध्ये आपल्याला अनेक जुन्या पुराण्या गाड्या पहायला मिळतील. गोवा आणि शेजारील राज्याच्या भागामधून या गाड्या मिळवलेल्या आहेत. हे गोव्यातील पहिले आणि एकमेव व्हिंटेज कार संग्रहालय आहे.
या साऱ्या खाजगी संग्रहालयाची सुरुवात छोट्याशा पावलांनीच झाली आहे. आपली वैयक्तिक आवड जपता-जपता त्याचा फार मोठा विस्तार झाला आहे. आजच्या जागतिक संग्रहालय दिनाच्या निमित्ताने या साऱ्या खाजगी संग्रहकांना सलाम. आपल्या सांस्कृतिक श्रेष्ठत्वात या साऱ्या संग्रहकांचे योगदान फार फार मोलाचे आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.