
सिगारेट ओढणे (Smoking) आरोग्यासाठी किती हानिकारक आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. धूम्रपानामुळे फुफ्फुसे खराब होतात, कर्करोगाचा धोका वाढतो, अशा अनेक धोक्यांबद्दल सातत्याने जागरुकता केली जाते. मात्र, आता धूम्रपानाच्या सवयीमुळे एक नवीन आणि गंभीर धोका समोर आला आहे. धूम्रपानामुळे आता पाठदुखी आणि स्लिप डिस्कचा (Slip Disc) धोका वाढत असल्याचा गंभीर इशारा NEIGRIHMS च्या डॉक्टरांनी दिला आहे.
शिलॉंग येथील उत्तर-पूर्वी इंदिरा गांधी प्रादेशिक आरोग्य संस्थेच्या (NEIGRIHMS) डॉक्टरांनी याविषयी संशोधन केल्यानंतर एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी एका रुग्णावर उपचार केला, ज्याच्या पाठीच्या मणक्यात सतत वेदना होत होत्या. डॉक्टरांनी त्या रुग्णाची शस्त्रक्रिया केली, ज्यावेळी मणक्यावरील दाब कमी करण्यासाठी 'ट्युब्युलर मायक्रोडिसेक्टोमी ट्यूब'चा (Tubular Microdiscectomy Tube) वापर करण्यात आला. या संपूर्ण प्रक्रियेत रुग्णाच्या मणक्यातून डिस्कचे चार तुकडे बाहेर काढण्यात आले. या घटनेवरुन धूम्रपानाचा स्लिप डिस्कच्या समस्येशी थेट संबंध असल्याचे सिद्ध झाले आहे.
स्लिप डिस्कची समस्या तेव्हा उद्भवते, जेव्हा मणक्याच्या दोन हाडांमधील कुशनसारखी डिस्क आपल्या जागेवरुन सरकते, ज्यामुळे कंबर, मान आणि पायांमध्ये तीव्र वेदना होतात. नसांवर दाब आल्यामुळे वेदनांसोबतच पायांमध्ये मुंग्या येणे किंवा बधीरपणा जाणवणे अशी लक्षणे दिसतात. पूर्वी वाढत्या वयानुसार ही समस्या उद्भवत असे, पण आता धूम्रपान हे त्यामागील एक प्रमुख कारण बनले आहे.
तज्ज्ञांच्या मते, सिगारेटमध्ये निकोटीन, कार्बन मोनोऑक्साइड आणि विषारी हायड्रोकार्बनसारखी अनेक हानिकारक रसायने असतात.
कोलेजनला नुकसान: सिगारेटच्या धुरातील विषारी हायड्रोकार्बनमुळे 'कोलेजन फायबर' (Collagen Fiber) कमजोर होतात, जे डिस्कचा बाहेरील थर मजबूत ठेवण्यास मदत करतात. यामुळे डिस्क कोरडी, कडक आणि तुटण्याची शक्यता वाढते.
रक्तपुरवठा कमी: सिगारेटमधील रसायनांमुळे रक्तातील ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि डिस्कला आवश्यक पोषण मिळत नाही, परिणामी डिस्क कमजोर होऊन तुटते.
सतत खोकला: धूम्रपानामुळे सतत खोकला येतो. खोकल्याचा थेट दाब मणक्यावर पडतो, ज्यामुळे डिस्क तुटण्याचा धोका वाढतो.
ही सर्व कारणे धूम्रपान करणाऱ्यांमध्ये स्लिप डिस्क आणि पाठदुखीची समस्या निर्माण करतात. त्यामुळे, निरोगी राहायचे असल्यास धूम्रपान ताबडतोब सोडणे आवश्यक आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.