पर्यटनाचा वारसा लाभलेला गोवा (Goa) अनेक धर्म आणि अनेक संस्कृतीचा वारसा (Cultural heritage) घेऊन पुढे जात असतो. विविधतेने नटलेल्या या राज्यात भिन्न परंपरा आपल्याला बघायला मिळतील. स्थानिक गोव्यातील लोकांची खाद्यसंस्कृती (Food culture) आपण बघणार आहोत.
गोव्यातील लोक वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळे पदार्थ बनवतात. म्हणजे रोजच्या खाण्यासाठी वेगळे, सणावाराला, धार्मिक कार्यक्रमाला वेगळे, देवांचा नैवेद्य वेगळा, लुणा वारलेल्यांसाठी वेगळे आणि काही ऋतुप्रमाणे वेगवेगळे पदार्थ बनतात. पण रोजच्या खाण्यात भात, आमटी, मासे/भाजी आणि लोणचे हेच पदार्थ असतात. आणि जेवणाच्या शेवटी सोलकढी ही असतेच. ही सोलकढी दोन प्रकारे केली जाते कधी नारळाचं दूध घालून, तर कधी पाचक म्हणून तिवळ, म्हणजे नारळाचं दूध न घालता केलेली.
गोव्यातील लोकांचे प्रमुख अन्न म्हणजे तांदुळ, मासे आणि नारळ जे इथे मुबलक प्रमाणात पिकवळल्या जाते. येथील लोकांचा मांसाहारवर जास्त जोर आहे. त्यामध्ये मत्स्याहार तर रोजचा आसतो. इसवण (सुरमई), सुंगटां, मोरी, तारले, पापलेट, कुर्ली, तिसरे, खुबे अश्या अनेक माश्यांचे तरर्हेर्हेचे पदार्थ इथं रोजच्या जेवणामध्ये बनवले जातात. माश्यांपासून आमटी किंवा फिशफ्राय बनवला जातोच पण या व्यतिरिक्त माश्यांचे लोणचे व सलाडही इथे बनते. गोव्यातील हिंदु लोक धार्मिक सणावाराला मांसाहार करत नाहीत.
शिंपले, कालवं, कोलंबी (सुंगटां), खेकडे (कुर्ल्या) आणि इतर विविध प्रकारचे मासे आणि भात खायला मिळाला की गोव्यातील लोकांना दुसरे काही नसले तरी चालते. गोव्यात पोळी, भाजी, चटणी, कोशिंबीर या दैनंदिन पदार्थांचा वापर तुलनेने कमी असतो. गोव्यात क्वचितच कधीतरी पोळी केली जाते नाहीतर, भात आणि ताजे मासे हा इथल्या लोकांचा रोजचा आहार आहे. ताजे मासे नसले तर सुके मासे खातील. मासे हा गोव्यातील खाद्यसंस्कृतीचा केंद्रबिंदु आहे !
गोव्यात तांदूळ हे मुख्य अन्न
तांदुळाचे गोव्यामध्ये प्रामुख्याने उकडे आणि सुरय हे दोन मुख्य प्रकार पडतात. उकडया भातात भाताच्या पेजेचा पण समावेश असतो. तर सुरय भात हा नेहमी प्रमाणे शिजवला जातो. या दोघांच्या मधला वाफवलेला; हा एक तिसरा प्रकार असतो. उकड्या तांदुळाचं वरचं आवरण कायम असतं. त्यामुळे त्याला एक विशिष्ट प्रकारचा वास, आणि चव असते. गोव्यात भाताचे विविध प्रकार बनवले जातात. तांदळाची पेज बनवली जाते.ग्रामीण भागात ही पेज नाश्त्याला म्हणून बनवली जाते. कुणी आजारी पडल्यास पचायला हलके अन्न म्हणून त्या व्यक्तीला दिली जाते. तांदुळाच्या पीठाच्या भाकऱ्या करतात, तर गव्हाच्या पिठाचे ब्रेड बनवतात. डाळीच्या आमटी करण्याची इथे थोडी पद्धत वेगळीच आहे.
स्वयंपाकघरात मसाले फारसे वापरले जात नाहीत. फक्त चिकन आणि मटण याला गरम मसाले घालायची पद्धत आहे. बरेचसे पदार्थ स्थानिक पातळीवर होणार्या कांदे, नारळ, मिरच्या, धने, मिरी आमसुलं इतक्याच पदार्थांचा वापर करून केले जातात. याचं कारण म्हणजे पोर्तुगीजांच्या ताब्यात असतांना व्यापारावरच्या निर्बंधांमुळे सामान्य लोकांना मसाल्याचे आयात पदार्थ केलेले खूप महाग पडायचे.
सोमवार, गुरुवारी हिंदूंमधे शाकाहारी जेवायची पद्धत आहे. नाईलाज म्हणून खाव्या लागणार्या शाकाहारी पदार्थात कडधान्य, भाजी किंवा डाळी यांची ग्रेव्ही असलेले पदार्थ बनवतात, कापां म्हणजे भाज्यांचे तांदुळाचा रवा लावून तळलेल्या फोडी, लोणचं, कढी, आणि भात यांचा समावेश असतो. अनेक भाज्या घालून केलेलं खतखतं, कोवळ्या बांबूंच्या कोंबांची भाजी, अळूच्या मुळाची भाजी किंवा काप, पावसात नैसर्गिक रीत्या येणाऱ्या अळंबीची भाजी, ओल्या काजूची भाजी हे खाद्यपदार्थ शाकाहारी लोकसुद्धा पसंत करतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.