Goan Summer Drink
Goan Summer DrinkInstagram

Goan Summer Drink|तांदूळापासून बनवलेली पेज

गोव्यात लाल, उकडे तांदूळ हे पेजेसाठी विशेष पसंत केले जातात.
Published on

उन्हाळा आपली सारी ‘ताप’शस्त्रे घेऊन सकाळी सकाळीच शरीराला येऊन भिडतो आणि मग पूर्ण दिवस अंगातून सारे बल शोषत ‘ग्लानिर्भवति’चा अर्थच स्पष्ट करत जातो. अशावेळी रंक-रावांना समानतेने शारीरिक सामर्थ्य देणारी एक पूर्वापार पाककृती म्हणजे ‘पेज’! हो, हा पाककलेतला अगदी साधा, स्वयंपाकघरात अंग चोरून असलेला, सर्वांच्या ओळखीचा पण विलक्षण कर्तबगार अन्नपदार्थ आहे. गोव्यात (Goa) सबंध कोकणात, देशात आणि जगभरच वेगवेगळ्या रुपाने आणि प्रकाराने तो स्वयंपाकघरात आणीबाणीच्या वेळी अवतरतो.

मातीच्या मडक्यात, जळाऊ लाकडांच्या इंधनावर रांधली जाणारी आणि मग त्यात खोबऱ्याचे दोन-चार तुकडे पडून, खोलगट वाडग्यातून समोर येणारी परंपरागत पेज कुणाला ठाऊक नाही? अर्थात, मातीचे मडके आणि जळाऊ लाकडांचे इंधन आता स्वयंपाकघरातून अदृष्य झाले असले तरी फिक्या चवीची ही पेज, सुरबुसपणे भाजलेल्या सुक्या माशाबरोबर किंवा ‘चेपणी’तल्या कैरीच्या आंबूस फोडीबरोबर किती खमंग होत जाते हे आपल्यापैकी प्रत्येकाने अनुभवले असेल. अलिकडच्या काळापर्यंत ही पेज अनेकांचा ‘मध्यान्नपूर्व’ आहार होती. पचनाला हलकी असल्याने अनेक जणांचे ती रात्रीचे पूर्णान्नही होती. कोवळ्या वयाच्या बाळासाठी ती अजूनही त्याचे पहिले भरीव अन्न आहे. आज आपली आहारशैली बदलली गेली असली तरी आजारी पडल्यावर किंवा अशक्तपणा जाणवत असल्यास आई अजूनही ताटातून पेज देतेच. खरं तर पेज केवळ आणीबाणीच्या काळातलंच नव्हे तर ती आपल्या दैनंदिन जीवनातलेदेखील झटपट बनणारे आणि आरोग्यपूर्ण असे जेवण निश्चितच आहे.

Goan Summer Drink
World Heritage Day: गोव्यातील महत्त्वाची ऐतिहासिक स्थळं पाहिलीत का?

उन्हाळ्याच्या (Summer) मोसमात वाढलेल्या तापमानामुळे अनेकदा शरीरातल्या पाण्याची पातळी कमी होते अशावेळी भाताची कांजी (कोकणीत- निवळ) पिणे हा त्यावर चांगला उपाय असतो. कांजी, पेजेचे पाणी हे एक उत्तम हेल्थ ड्रिंक आहे. उन्हाळ्यातल्या घामामुळे शरीरातून मिठाचे प्रमाण खूपच खाली येते (डिहायड्रेशन), अशावेळी शरीरातली घटलेली पोषकद्रव्य वाढवण्यात पेजेचे पाणी खूप मदत करते. भाताच्या पेजमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण भरपूर असते, त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते. उन्हाळ्यात जर घरातून निघताना कांजी पिऊन निघाल्यास दिवसभर ताजेतवाने राहण्यास नक्कीच मदत होऊ शकते.

याशिवाय पेजेचे इतर फायदे आहेतच. भातामधील ‘फायबर’ घटक, मलविसर्जनाची प्रक्रिया सुकर करते आणि त्यातील स्टार्च, उपयुक्त बॅक्टेरियाच्या वाढीस मदत करतो. त्यामुळे पोट साफ राहून बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. वायरल इन्फेक्शनमुळे आलेल्या तापाच्यावेळी, पेज घेणे हा अशक्तपणा दूर करणारा खास उपाय असतो.

गोव्यात (Goa) लाल, उकडे तांदूळ हे पेजेसाठी विशेष पसंत केले जातात. त्यात स्टार्चचे प्रमाण कमी असल्यामुळे त्याची पेज (Pez) फार चिकट बनत नाही आणि या कारणामुळे मधुमेह असणाऱ्यानाही लाल तांदळाची ही पेज चालते. अशा या गुणकारी असलेल्या पेजेला, आपल्या आहारात समावेश करण्याचा, असह्य होत जाणारा उन्हाळा हा उत्तम आणि समयोपयोगी मुहूर्त आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com