Goa Recipe: कोकण खाद्यसंस्कृतील पातोळ्या

Kokan: पातोळ्यांची लज्जत काही वेगळीच असते.
Goa Recipe | Patoleo
Goa Recipe | PatoleoDainik Gomantak

Kokan: कोकणात तांदूळ आणि नारळ भरपूर पिकत असल्यामुळे तेथील खाद्यसंस्कृतीत आणि ओघानेच तिथे बनवल्या जाणाऱ्या गणपतीच्या नैवेद्यात प्रामुख्याने हे दोन पदार्थ वापरले जातात. तांदळाची पिठी व ओला नारळ वापरून केला जाणारा पातोळ्या (Patoleo) हा पदार्थ कोकणात आणि गोव्यात खास नैवेद्यासाठी बनवला जातो. हळदीच्या पानावर तांदळाची उकड थापून त्यात गूळ-खोबऱ्याचे सारण घालून वाफवलेल्या पातोळ्यांची लज्जत काही वेगळीच असते.

साहित्य: 6 ते 7 हळदीची पाने, 1 वाटी तांदळाची पिठी, 1 वाटी पाणी, 1 लहान चमचा तूप, 1 वाटी खवलेला ओला नारळ, अर्धी वाटी किसलेला गूळ आणि चिमूटभर वेलदोड्याची पूड.

कृती: सारण करण्यासाठी ओले खोबरे, गूळ आणि वेलदोडा पावडर एकत्र करून शिजवून घ्यावे. उकड करण्यासाठी पाण्यात तूप घालून ते उकळायला ठेवावे. पाण्याला उकळी आली, की त्यात तांदळाची पिठी घालून चमच्याने ढवळून चांगले एकजीव करावे आणि गॅस बंद करून भांड्यावर झाकण लावावे. मिश्रण जरा गार झाले, की हाताला तूप लावून मऊसर मळून घ्यावे. ही उकड थापता येईल इतपत सैल असावी.

तयार उकडीचे गोळे करून घ्यावे. हळदीच्या पानाला पाणी लावून त्यावर उकडीचा गोळा थापावा. त्यावर सारण पसरून पानासहित करंजीसारखे दुमडावे. अशा तऱ्हेने सर्व पाने तयार झाली, की मोदक पात्रात किंवा चाळणीवर ठेवून 10 मिनिटे वाफवून घ्यावी. हळदीचे पान अलगदपणे बाजूला काढावे व नरम पातोळ्या साजूक तुपाबरोबर खाव्यात.

पातोळ्या करताना काही ठिकाणी तांदळाच्या पिठाची उकड न काढता तांदूळ चार-पाच तास भिजत घालून ते बारीक वाटले जातात. हे वाटलेले पीठ हळदीच्या पानांवर थापून त्यावर सारण घातले जाते. अशा प्रकारे केलेल्या पातोळ्या उकडायला जरा जास्त वेळ लागतो. गोव्यात बनवल्या जाणाऱ्या पातोळ्यांचे तांदूळ वाटताना त्यात थोडे पोहे घातले जातात. कोणत्याही पद्धतीने केल्या तरी पातोळ्यांचा घाणा वाफवायला ठेवला, की घरभर हळदीच्या पानांचा सुगंध दरवळतो.

कोकणात नागपंचमी, हरतालिका व गणपतीच्या वेळी, तर गोव्याकडे गणपतीबरोबरच 15 ऑगस्टलाही पातोळ्या बनवल्या जातात. हळदीच्या पानात उकडल्यामुळे पातोळ्यांकडे एक आरोग्यकारक पदार्थ म्हणून बघितले जाते. महत्त्वाची बाब म्हणजे हा पदार्थ ग्लुटेनफ्री असल्यामुळे हल्ली तो फक्त गणपतीच्या नैवेद्यासाठी न बनवता इतर वेळीदेखील केला जातो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com