गोव्यात बालनाट्याची चळवळ अतिशय कमकुवत आहे. कधीकाळी पणजीतली ‘कला शुक्लेंदू’ ही संस्था सातत्याने बालनाट्ये सादर करायची. गोव्यातल्या अनेक अभिनेते- अभिनेत्रीनी ‘कला शुक्लेंदू’ च्या बालनाट्यांच्या माध्यमानेच अभिनयाच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. सुप्रसिध्द अभिनेत्री वर्षा उसगांवकर ही एकेकाळी ‘कला-शुक्लेंदू’ च्या नाटकांमधून कामे करायची.
पण अलीकडच्या काळात गोव्यात बालनाट्याला ग्रहणच लागले आहे. मुलांच्या सुटीच्या काळात बालनाट्य कार्यशाळा कला आणि संस्कृती खात्याकडून घेतल्या जातात पण त्यातही सातत्य नसते. शाळांमधून नाट्यशिक्षकांचीही नियुक्ती केल्या गेल्या आहेत पण शाळांच्या गॅदरिंगमध्ये अथवा कला अकादमीच्या ‘बालनाट्य एकांकिका’ स्पर्धेत सादर करण्यापुरती त्यांची मर्यादा राहिली आहे.
एखादे चांगले चाललेले बालनाट्य (म्हणजे किमान पाच प्रयोग तरी झालेले) गेली तीस- पस्तीस वर्षात तरी गोव्यात सादर झालेले नाही. किंवा एखाद्या आशयपूर्ण बालनाट्याची संहिताही चर्चेत आलेली नाही. खरंतर ‘नाट्यवेडा’ म्हणवून घेणाऱ्या गोव्यासाठी हे दुर्देवाचे आहे.
गोव्याच्या (Goa) हौशी, उत्सवी रंगभूमीवर ढिगभर चमचमीत, झणझणीत नाटके निर्माण होतात. त्यातली अवघीच पाहण्यालायक असतात. बालनाट्ये हौशी रंगभूमीवर सादर करता येणे शक्य नाही काय? पण असा प्रयत्न कुठल्याच संस्थेकडून झाल्यांचे ऐकिवात नाही. शालेय सुट्टीच्या दिवसात बालनाट्य कार्यशाळा आयोजित होतात पण त्यातून एकही सकस बालनाट्य निर्माण झालेले नाही.
आम्हा गोमंतकीयांचे ‘नाट्यवेड’ हे ‘खाज’ या शब्दांभोवती फिरणारेच आहे. नाट्यस्पर्धेमुळे ते अधिकाधिक तांत्रिकतेकडे झुकत जात असलेले स्पष्ट जाणवते. गोव्यातले भले-भले दिग्दर्शक नेपथ्य आणि प्रकाशयोजना याद्वारे जेव्हा नाटक रंगतदार कसे होईल आणि ते मनावर परिणाम कसा होईल याचाच विचार करत असतात आणि नाटकाच्या आशयाकडे फारसे लक्ष देत नसतात तेव्हा आमच्या नाट्यवेडाची एकंदरच मर्यादा लक्षात येते.
नाटक झाल्यानंतर नाटकाबद्दल चर्चा फारच कमी होते. जी होते ती अनेकदा नाटकाच्या बाह्य-स्वरूपाबद्दलच होते पण नाटकाचा आशय, त्याची मांडणी इत्यादीबद्दल बोलणे प्रेक्षकांनांच नव्हे तर कलाकारांनाही फारसे रूचत नाही. नाटकाच्या आशयाबद्दल प्रश्नांना उत्तर देता अनेक तथाकथित सुप्रसिध्द दिग्दर्शकांची ‘फेंफे’ उडते.
मुळातच नाटकाचा सखोल विचार न झाल्याने आणि केवळ ‘मनोरंजन’ या पातळीवरच आज नाटक मर्यादित राहिले आहे. नाटक हे कविता कादंबरीसारखेच साहित्यमूल्य मांडते हा विचार नाटक सादर करताना अपवादानेच आढळतो. नाटकाचा गंभीर विचार नाही म्हणून चांगल्या संहिता नाहीत आणि स्वतंत्र संहिता तर फार दूरचा विचार झाला.
जे नाटके (Drama) लिहितात त्यांच्या संहितांवर चर्चा होत नाही. नवीन स्वतंत्र नाटके लिहिली जावी यासाठी कुठलीही योजना नाही. नाट्यस्पर्धांचे दळण तर वर्षानुवर्षे चालले आहे. गोव्यात नाट्यशाळा सुरू झालेल्याला वर्षे लोटून गेली आहेत. नाट्यशाळेच्या यशाचा निकष अनेकदा पुढील शब्दांत मांडलेला ऐकू येतो- ‘बरे झाले, या नाट्यविद्यालयातून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत नोकऱ्या तरी मिळाल्या’ किंवा ‘स्पर्धेतल्या नाटकांचा तांत्रिक दर्जा आता खूप सुधारला आहे’….वगैरे. बस्स इतकेच.
म्हणून बालनाट्य चळवळीला पुन्हा आधार देणे खूप गरजेचे आहे. शाळेत भाषेचा अभ्यास होतानादेखील आजकाल त्यातील साहित्यिक मूल्यांची ओळख विद्यार्थ्यांना दुर्देैवाने करून दिली जात नाही. ‘ट ला ट’ जोडून कविता करणाऱ्यांची संख्या त्यामुळेच भरमसाट झाली आहे. (किंवा तो जोडण्याची सुध्दा गरज नाही हे रहस्यही त्यांच्या हाती लागले आहे) मुळातच साहित्याचा अभ्यास नाही त्यामुळे सकस नाटके लिहिणारेही कमीच होत चालले आहेत.
अशावेळी बालनाट्यांद्वारे, जीवनाविषयीची वेगवेगळी सूत्रे समजून घेता घेता, त्यांना रंगमंचावरून मांडता-मांडता, बालवयातच जर त्यांना नाटकाच्या आशयासंबंधी जाण येत गेली तर ते सकस नाटकासाठी उपकारकच ठरेल. गोव्यात बालनाट्यसंबंधाने पुन्हा सुरुवात होणे गरजेचे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.