Ganesh Festival: पूजनीय पत्रीचे औषधी उपयोग

भारतीय संस्कृतीतील वृक्षराजींचा पूजेतील वापर हा प्रतीक म्हणून केला जातो. ही वेगवेगळी प्रतिके आपल्याला माहीत व्हावीत, त्यांचा उपयोग आपल्याला कळावा, हाही हेतू त्यामागे असतोच. गणेशालाही आपण पत्री वाहतो, या "पूजनीय'' पत्रीचे औषधीय उपयोग जाणून घेऊया.
पूजनीय पत्रीचे औषधी उपयोग
पूजनीय पत्रीचे औषधी उपयोग Dainik Gomantak
Published on
Updated on

माका

माक्‍याला भृंगराज, भांगरी असेही म्हणतात. याची पाने साधी, लहान देठविरहित असतात. यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते, कफ कमी करणे, कावीळ, मूळव्याध, त्वचारोग, विंचूदंश याकरिताही माक्‍याचा उपयोग केला जातो.

मधुमालती

वासंती, माधवी, माधवमालती, तंद्रावळी अशा विविध नावांनी ओळखली जाणारी ही वनस्पती आहे. सह्याद्रिच्या जंगलात तुरळकपणे आढळणाऱ्या या वनस्पतीची पाने साधी, टोकदार व तजेलदार असतात. ही पाने वाटून लावलेला लेप खरुज आणि इतर त्वचा रोगांवर उपयुक्त आहे.

बेल

बेलाचे झाड काटेरी असते. भगवान शंकराला त्याची बिल्वपत्र प्रिय आहेत. कावीळ, मूळव्याध या आजारांवर बेलाच्या पानांचा रस औषधी म्हणून वापरला जातो.

Dainik Gomantak

दूर्वा

हरळी, मंगला, शतमुला अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या दूर्वा औषधी आहेत. कोरड्या वातावरणात, पाण्याअभावी दूर्वा जरी वाळल्या, तरी तिची जमिनीतली मुळे मात्र जिवंत असतात. नाकातून रक्त येणे, आम्लता कमी करणे अशा अनेक व्याधीवर दूर्वांचा रस उपयोगी पडतो.

धोतरा

कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर वाढणारी ही वनस्पती आहे. धोतरा विषारी असला, तरी त्याचे औषधी उपयोग बरेच आहेत. याची फुले मोठी, पाढंरी अगर जांभळट रंगाची असतात. या फुलांचा आकार नरसाळ्यासारखा असतो. दमा, हिवताप, सांध्याची सूज इत्यादी विकारांमध्ये धोतऱ्याची पाने, बिया औषध म्हणून वापरतात. धोतऱ्याचे पांढरा, पिवळा आणि काळा असे तीन प्रकार आहेत. यातील पांढरा गणपतीला वाहतात.

बोर

याची झाडे सर्वत्र आढळतात. बोरीच्या पानांचा लेप, साल आणि मुळे यांचा रस नेत्ररोग, ताप यावर गुणकारी आहे.

तुळस

भाद्रपद शुद्ध चतुर्थीला करण्यात येणाऱ्या गणेश पूजेत तुळशीला मानाचे स्थान आहे. वृंदा, विष्णूप्रिया, कृष्णप्रिया, सुमुखा, पूर्णसा अशी तुळसीला एकवीस नावे आहेत. कृष्ण आणि राम तुळस असे दोन प्रकार तुळशीत आहेत. संधिवात, उष्णता, चर्मरोग, मूत्रविकारात तुळशीची पाने आणि बिया यांचा काढा उपयोगी पडतो.

शमी

कच्छच्या वाळवंटी प्रदेशात बाभूळ कुळातले हे काटेरी झाड आहे. शमीला छोकर, बन्नीमर, खिडगी अशी नावे आहेत. याची पाने बाभळीसारखीच असतात. याचे काटेही लहान तर शेंगा अरुंद असतात. उन्हाळी लागणे, अतिसार अशा विकारावर शमीच्या शेंगा, पाला उपयोगी पडतो. वाळवंटी प्रदेशात शमीला कल्पवृक्ष मानतात. मोठ्या इमारतीसाठी लागणारे लाकूड यापासून तयार करतात. जनावरांना चारा म्हणूनही याच्या पाल्याचा उपयोग होतो.

विष्णुकांत / विष्णुक्रांता

पावसाळ्यात गवताळ कुरणात उगवणारी ही नाजूक औषधी वनस्पती आहे. मज्जारज्जू, मेंदू यांचे बळ वाढविण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग होतो. या वनस्पतीची पाने, मुळे औषधी आहेत. ज्वरानंतर पौष्टिक खाद्य म्हणूनही या वनस्पतीचा वापर करण्यात येते. विषमज्वर, आव यामध्येही याचा औषध म्हणून उपयोग करतात.

आघाडा

बागेत शेतामध्ये सर्वत्र आपोआप वाढणारी ही वनस्पती आहे. औषधी गुणधर्म असणारी वनस्पती म्हणजे आघाडा. याची पाने विरळ, लांबट, मध्यम आकाराची, लंबगोल असतात. यकृताचे विकार, गंडमाळा, कंडू, मूत्रविकार अशा अनेक रोगावर रूपकारक आहे. पोटदुखी, कफाचा ताप, रक्तीमूळव्याध, विंचुदंशावर याची पाने आणि खोडही उपयोगी पडते.

डोरली

वांग्याच्या प्रकारातील या झाडाला रानरिंगणी, बृहती अशी नावे आहेत. याची फळे सुपारी एवढी असतात. पिकल्यावर पिवळी होतात. डोरल्याचे मूळ दशमुळांपैकी एक महत्त्वाचे औषध आहे. पोटदुखी, मुरडा यामध्ये याच्या मुळांचा वापर केला जातो. त्वचारोगात आणि उलटी थांबवण्यासाठी याच्या पानांचा रस देतात. जनावरांना विषबाधा झाल्यास डोरलीच्या मुळांचा रस देतात.

कण्हेर

विषारी असलेली कण्हेर मुख्यता कुंपणासाठी वापरतात. याची फुले पांढरी व तांबडी असतात. कण्हेरीचे तेल इसबावर उपयोगी आहे. पांढऱ्या कण्हेरीची मुळे उगाळून साप-विंचू चावलेल्या ठिकाणी लावतात.

पूजनीय पत्रीचे औषधी उपयोग
Ganesh Chaturthi: बाप्पांना मोदक का अवडतात?

रुई (मांदार)

कोरड्या प्रदेशात आढळणारी ही वनस्पती आहे. अर्क, क्षिरंगा, आकडो अशा नावांनी हे झाड ओळखले जाते. याची पाने साधी, मोठी, केसाळ असतात. फुले निळसर, गुलाबी किंवा जांभळट रंगाची असतात. रुईमध्ये दुधी चीक असतो. डोकेदुखी, कान दुखणे, यावर रुईची पाने उपयोगी आहेत. तसेच रक्तदोष, व्रण, त्वचारोग यामध्ये रुईचे अर्कचूर्ण वापरतात.

अर्जून (सादडा)

कोहा, तोरमेती, इंद्रदुम अशा विविध नावांनी हे झाड ओळखले जाते. हे झाड मोठे आणि उंच वाढणारे आहे. याला सुगंधी पांढऱ्या पिवळसर रंगाचे तुरे येतात. याचे लाकूड मजबूत टिकावू असते. याची आंतरसाल औषधी उपयोगाची आहे. यापासून तयार केलेले अर्जुनारिष्ट औषध हृदयविकारासाठी उपयोगात आणले जाते.

डाळिंब

अनार, दाडिम, रक्तबीज अशा विविध नावाने डाळिंब ओळखले जाते. याला तांबड्या रंगाची फुले येतात. डाळिंबाचे साल, मुळे, पाने जंतुनाशक आहेत. पित्त, नाकातून रक्त येणे यावर गुणकारी आहे. भाद्रपद महिन्यातील गणेश, गौरी पूजेत डाळिंबांचा समावेश करण्यात येतो.

पूजनीय पत्रीचे औषधी उपयोग
Ganesh Festival: गणेश चतुर्थीतही जीवनशैलीनुसार बदल

देवदार

शंभर वर्षांहून अधिक काळ जगणारा हा वृक्ष हिमालयात आढळतो. याची पाने काड्यासारखी असतात. आयुर्वेदीय चिकित्सेत देवदार वृक्षाचा उल्लेख आढळतो. देवदारचे लाकूड पिवळसर करडे व सुवासिक, मध्यम कठीण टिकावू असते. याची पाने ताप घालविण्याठी उपयुक्त असतात.

मरुवा (मरवा)

भारतात ही वनस्पती बागेत मोठ्या प्रमाणात लावतात. या वनस्पतीची पाने साधी, राखट हिरवी, सुगंधी लहान असतात. फुले पांढरट किंवा जांभळट रंगाची असतात. सुगंधाकरिता याची पाने मसाल्यात, भाजीत आणि बिया मिठाईत घालतात. फुले, पाने यापासून सुगंधी तेल काढतात. दातदुखी, मुरगळणे, खरचटणे, पक्षाघात इत्यादी विकारात बाहेरुन लावण्यास त्याचा उपयोग करतात.

पिंपळ

हा मोठा पानझडी वृक्ष आहे. बंगाल, मध्यप्रदेश येथील जंगलात आणि भारतातील सर्व मंदिरे व खेड्यांच्या आसपास आढळतो. पिंपळाची पाने साधी, एकाआड एक निमुळत्या टोकाची अंडाकृतीकृती असतात. कावीळ, उलट्या, तोंड येणे, दमा, भाजणे यावर पिंपळ उपयुक्त आहे.

पूजनीय पत्रीचे औषधी उपयोग
Ganesh Chaturthiच्या या दहा दिवसांत या 4 गोष्टी करू नका

जाई

झुडपाप्रमाणे वाढणारी ही मोठी वेल आहे. भारतात सर्वत्र बागेत लावलेली आढळते. वेल लांब फांद्यांनी जवळच्या आधारावर चढत जाते. जाईची फुले नाजूक, पांढरी व सुवासिक असतात. प्रियंवदा, मोतिया, चमेली या नावाने ही फुले ओळखली जातात. बऱ्याच सुवासिक द्रव्यात गुलाबाखालोखाल जाईच्या फुलांचा वापर करतात. सौंदर्यप्रसाधने, साबण, दंतमंजने यामध्ये जाईचे तेल वापरले जाते. जाईची फुले उगाळून नायट्यावर लावतात. तोंड आले असता जाईची पाने चघळल्यास विकार कमी होतो. जाई कृमिनाशक आणि मासिक पाळीच्या दोषांवर गुणकारी आहे.

केवडा

ही सुगंधी वनस्पती आहे. याचा प्रसार ओरिसा, मध्यप्रदेश, सुंदरबन, अंदमान बेटे इत्यादि ठिकाणी झाला आहे. केवड्याची झाडे नद्या, कालवे, तळी व शेते यांच्या कडेने लावतात. याच्या पिकलेल्या कणासापसून तेल मिळते, हे तेल चंदनतेलात मिसळून केवडा अत्तर बनवितात. साबण, सौंदर्यप्रसाधने, अगरबत्ती, इत्यादीमध्ये सुगंधाकरिता वापरतात. याची पाने सुवासिक असून दंश, खरुज व श्‍वेतकुष्ठ (कोड) इत्यादीवर गुणकारी असतात. तेल जंतुनाशक असून डोकेदुखीवर, संधिवातावर उपयुक्त असते.

अगस्ती (हादगा)

हा शेवग्यासारखा भरभर वाढणारा वृक्ष आहे. याचे लाकूड मऊ व पांढरे असते. कोवळा पाला, फुले, शेंगा भाजीकरता वापरतात. हादग्याचे मूळ, पाने, फुले औषधी असतात. याचे मूळ उगाळून त्याचा लेप संधिवातावर देतात. खरचटल्यावर पानांचे पोटीस बांधतात. पानांचा रस अर्धशिशीवर चालतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com