
स्वतःचे मन व्यक्त करण्यासाठी ‘चॅटबॉट’सारखी माध्यमे अनेकजण वापरतात हे वरचेवर वाचनात येते. आपल्या खाजगी आयुष्यातील खुपणाऱ्या गोष्टी सांगण्यासाठी, मनातील असुरक्षितता, भीती व्यक्त करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा आधार घेतला जातो. एकूणच ज्या समस्या मानवी संवादातून समुपदेशन, थेरपीच्या आधारे सोडवल्या जात असत त्यासाठी आता मशीनची मदत घेतली जाते. माणसापेक्षा कुठेतरी अधांतरी, अमानवी सिस्टिममध्ये आपले विचार मांडून त्यानुसार आपल्या वागण्याबोलण्यात फरक करणे हे भीतीदायक भासते.
‘चॅटबॉट्स’ हे मला आभासी जगातील बोलक्या बाहुल्यांसारखे भासतात. ‘ग्रोक’, ‘चॅटजीपीटी’, ‘जेमीनाय’ यांसारखी माध्यमे ही त्या बोलक्या बाहुल्यांची नावे.. ही कृत्रिम बुद्धिमत्तेची झलक दाखवणारी अॅप्लिकेशन्स चक्क आपल्याशी बोलतात, म्हणजे चॅट करतात.
दर क्षणाला नवीन काही घेऊन येणारे हे तंत्रज्ञान आता सांत्वन करते, मार्गदर्शन करते ही बातमी अनेक वाचकांसाठी नवीन नसेल. सतत या यंत्रासोबत वेळ घालवणारे लोक आता या यंत्रांचा आधार, आपल्या शंकेचे निरसन करण्यासाठी, मनातली एखादी सल बोलून दाखवण्यासाठी घेतात.
आपण रोजनिशी लिहितो तसे आता आत्मपरीक्षणासाठी डिजिटल जर्नल्स उपलब्ध आहेत. ही माध्यमे फार सुबक सुंदर दिसतात. त्याचबरोबर आपले आठवड्याभरातील भावनिक उतारचढाव आपल्याला इथे एका दृष्टिक्षेपात पाहायला मिळतात. ज्यामुळे आपल्याला स्वतःला समजायला मदत होते.
मला कंटाळा आलाय हे जरी आपण ‘चॅटबॉट’वर टाइप केले की लगेच आपली आभासी जगातली कुंडली पडताळून, पाणी कुठे मुरते आणि काय करता येऊ शकते यावर या बोलक्या बाहुल्या उपदेशही करतात. तेही अगदी मानसशास्त्राचा आधार घेऊन, नीट परानुभूती, आत्मीयता ही सगळी तांत्रिक पथ्ये पाळून.
माणसामध्ये असूनही एकटे असणारे अनेक जण या आभासी बोलक्या बाहुल्यांना, आपले भावनिक सखा-सोबती (इमोशनल कॉम्पेनियन्स) मानून त्यांच्याशी संवाद साधू लागतात. नव्याची नवलाई म्हणून अधूनमधून असा संवाद साधणे इथपर्यंत ठीक आहे. मात्र त्यावर आपण अवलंबून राहू लागलो तर? या यंत्रांशी कायमची आपली गट्टी झाली तर?
इतर क्षेत्रासारखीच मानसिक आरोग्य क्षेत्रातही ‘चॅटबॉट’ क्रांती आपले असे फायदे-तोटे घेऊन आली आहे. आपल्याकडे अजूनही समुपदेशन, मानसोपचार यासाठी खुल्या मनाने कुणीही पुढे येत नाही. गैरसमजुतींचे वलय, ‘लोक काय म्हणतील’ याची भीती आपल्याला उघडपणे मानसोपचार घेण्यापासून परावृत्त करते.
समुपदेशकाशी उघडपणे संवाद साधणे अनेकांना कठीण जाते. आपण सांगितलेली माहिती कुठे इतरांना सांगितली गेली तर? ह्या विचारांच्या अंती एकच सूर मनातून उमटतो ‘आळीमिळी गुपचिळी’. आतल्या वेदना, सल मग आतच दाबून ठेवले जातात. ‘चॅटबॉट’सारख्या माध्यमांशी गट्टी करणाऱ्या अनेकांचे असे मत असते की, इथे आपण आपल्या मनातल्या शंका, भावना मुक्तपणे व्यक्त करू शकतो.
आपण जे बोललो त्याबद्दल ‘इथे कोणी मला जज करणार नाही’. संवादाचे हे माध्यम अशा ठिकाणी उपयुक्त होते जिथे समुपदेशन परवडणारे नसते, उपलब्ध नसते. काही ठिकाणी ‘थेराबॉट’, ‘स्टेला’ यांसारखी, मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी वापरली जाणारी चॅटबॉट्स उपलब्ध आहेत.
आता प्रश्न उरतो की ह्या प्लॅटफॉर्म्सचा वापर कितपत योग्य आहे? ह्या मुद्द्यावर मानसशास्त्र आणि माहिती आणि तंत्रज्ञान या विषयातील जाणकारांकडून चर्चा, मार्गदर्शन आणि प्रबोधन होणे आवश्यक आहे. ही अॅप्लिकेशन्स वापरणाऱ्यांनी नीट लक्ष दिले आणि अभ्यास केला तर जाणवेल, की ह्यावर १००टक्के विश्वास ठेवणे अयोग्यच.
आणखी काही मुद्दे मी इथे मांडणे आवश्यक मानते ते म्हणजे एक तर आभासी जगात, एखाद्या डिजिटल जर्नलवर किंवा ‘चॅटबॉट’वर आपण जे व्यक्त करत असतो ते कोण, केव्हा वाचून आपल्यावर पाळत ठेवून त्याचा गैरवापर करेल हे सांगता येत नाही. हे म्हणजे आपल्याबद्दलची खूप खाजगी माहिती एका ध्वनिक्षेपकावर सांगण्यासारखेच आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की समुपदेशक, मानसोपचारतज्ज्ञ यांचा या विषयाचा अनेक वर्षांचा अभ्यास असतो, अनुभव असतो. तिसरी आणि सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक माणूस दुसऱ्या माणसाचे भावविश्व समजूनउमजून
दिशा गाठण्याची पाठराखण करतो. ‘चॅटबॉट’वर साधलेला संवाद हा एकतर्फी, पक्षपाती झाला तर आपल्या आजूबाजूची माणसं समजून घेणे कठीण जाऊ शकते. ‘स्क्रीन’ जेव्हा आपल्याशी संवाद साधते तेव्हाही तो केवळ त्या आभासी जगातील माहिती गोळा करून दिलेला प्रतिसाद असतो हे लक्षात असू द्यावे.
‘चॅटबॉट’सारखी कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या प्लॅटफॉर्म्सच्या वापराला काही मर्यादा आखल्या तर ही माध्यमे उपयुक्त ठरू शकतात. थेरपीमध्ये दिला जाणारा ‘होमवर्क’ ही माध्यमे वापरून केला तर आपल्या भावभावना, विचारांची दिशा देणे सोपे जाते. सजगतेचा (मायंडफुलनेस) सराव करण्यासाठी काही चांगली अॅप्लिकेशन्स वापरली जाऊ शकतात.
जर कोणी व्यक्त होण्यासाठी अशी माध्यमे वापरत असेल तर ती डेव्हलप करणाऱ्यांनी अशी खबरदारी घेतली पाहिजे की कालांतराने, हे अॅप्लिकेशन वापरणाऱ्या व्यक्तीला योग्य मानसोपचार घेण्यासाठी प्रेरित केले जाऊ शकते. या सिस्टिम्सवर माणसं कुठलाही अडसर न ठेवता व्यक्त होतात. ही सिस्टिम्स जाणकारांच्या देखरेखीखाली वापरली तर त्याची मदत होऊ शकते. काय घ्यायचे, कुठे थांबायचे हे समजणे आवश्यक आहे.
माझा मानसिक आरोग्य क्षेत्रातला अनेक वर्षांचा अभ्यास आणि अनुभव सांगतो की मनाची व्यथा सांगताना, व्यक्त होताना कुणी आपलं ऐकून घ्यावं ही एक निरागस आस असते. कार्ल रॉजर्स यांची ‘पर्सनसेण्टर्ड थेरपी’ सांगते की क्लाइंट जेव्हा बोलतो तेव्हा थेरपिस्टकडून मिळणार प्रतिसाद (मग तो शब्दातून असो किंवा नुसत्या हुंकारातून) हा जास्त उपचारात्मक असतो.
रॉजर्स यांनी थेरपीसाठी योग्य वातावरण निर्मितीसाठी सहा सूत्रे सांगितली आहेत. ते म्हणतात की जेव्हा एखादी व्यक्ती समुपदेशनासाठी येते तेव्हा ती मनाची विसंगती घेऊन येते; तेव्हा थेरपिस्ट आणि क्लाइंट यांमध्ये सुसंवाद, भावनिक सुसंगती असावी लागते. जर त्यांना थेरपिस्टची मानसिक व शारीरिक उपस्थिती, बिनशर्त स्वीकार आणि सह-अनुभूतीपूर्वक समज अनुभवायला मिळाली तर ते स्वतःला हळूहळू स्वीकारू लागतात आणि त्यांच्यात सकारात्मक बदल घडू लागतो. हे सगळं एखाद्या तांत्रिक उपकरणाच्या आधारे होणे सध्या तरी कठीण वाटते. कोलमडलेल्या मनाला समजून घ्यायला संवेदनशील, सेवाभावी मन लागते ती सेवाभावी वृत्ती एखाद्या उपकरणाला शिकवून किंवा ते स्वतः शिकून विकसित होऊ
शकते का? कृत्रिम बुद्धिमत्तेच्या रूपाने लाभलेल्या या बोलक्या बाहुल्यांना मर्यादा आहेत याचा विसर आपल्या विवेकी बुद्धीला पडता कामा नये. तणाव, चिंता, एकटेपणा यावर प्राथमिक उपाय म्हणून ‘चॅटबॉट्स’ उपयुक्त ठरतात; हे एक साधन होऊ शकते, उपाय नाही. हे साधन वापरताना ध्यानीमनी ही खुणगाठ बांधावी की शेवटी मायेची पाखर घालून आपल्याला पूर्णपणे एक मानवी मनच समजून घेऊ शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.