ज्या वेळी २००५ साली त्यांनी आपल्या व्यवसायाला सुरुवात केली तेव्हा मात्र परिस्थिती प्रतिकूल होती. मुलगा एक वर्षाचा होता. सासरच्या मंडळीकडून कसलेही पाठबळ नव्हते. वाट एकाकी होती. परंतु श्रीमी यांनी आपले पहिले पाऊल धाडसाने टाकले आणि येणाऱ्या अनुभवातून तावून-सुलाखून जात आपली वाट विस्तीर्ण केली. त्या सांगतात, त्यांच्या दिवंगत वडिलांनी मात्र त्यांच्या पाळण्यातले पाय ओळखले होते. वडील तिला सांगायचे, ती एक यशस्वी ‘एंत्रेप्रिन्योर’ (capable woman From Goa) बनू शकेल. आपल्या मुलीची उद्यमशीलता त्यांनी तिच्या घडणाऱ्या काळात ओळखली होती. श्रीमी सांगतात, ‘मलाही रुटीन जॉब करणे पसंत नव्हते. एक-दोन नोकऱ्या मी केल्या परंतु त्यात मला समाधान लाभले नाही.
श्रीमी या खरे तर होम सायन्सच्या विद्यार्थिनी. त्याना फाईन आर्टची आवड होती पण त्यांना तिथे प्रवेश मिळाला नाही. मात्र त्यानंतर स्वतः पुस्तके वाचून, स्वतःच्या लॅपटॉपवर त्या ग्राफिक डिझाईन शिकल्या. खुप प्रॅक्टीस केली आणि छोटी छोटी कामे मिळवायला सुरुवात केली. ग्रफिक डिझाईनचे काम जरी आर्थिकदृष्ट्या फार परतावा देणारे नसले तरी जे क्लाइंट त्यांना मिळाले ते उपयुक्त होते, मदत करणारे होते. अशाच एका क्लायंटने त्यांना ‘साईन बोर्ड’ तयार करून देशील का अशी विचारणा केली. श्रीमीना त्याबद्दल काहीच ठाऊक नव्हते पण एका ‘बिझनेस वुमन’ वृत्तीने त्यांनी आपल्या क्लायंटला ‘हो’ असे उत्तर दिले. आणि त्यांच्या त्या धैर्यशाली ‘हो’ ने त्यांना उद्योगाचे नवे दालन उघडे करून दिले. पुढचे दोन दिवस त्यांनी साईन बोर्ड बाबतीत अभ्यास केला. त्यासंबंधी जाणून घेतले. साईन बोर्डचे काम करणारे मजूर मिळवले. कामाचे अंदाजपत्रक तयार केले आणि आपले कोटेशन क्लायंटला सादर केले. तिचे कोटेशन जिंकले आणि तिला साईन बोर्डचे पहिले काम मिळाले. अर्थात कामात चोख असल्यामुळे त्यानंतर तिला कामे मिळत गेली. ताज विवांता, होटेल न्यू मॅजेस्टिक वगैरे. तिचे क्लायंट तिच्या कामावर खूष असायचे.
या उद्योगात पहिली सात वर्षे तिने तिला मिळवलेली कामे आउटसोर्स करून पूर्ण केली. या कामाने तिला भरपूर अनुभव दिला. तांत्रिकरित्या ती संपन्न झाली. पण आता तिला स्वताकडे यंत्रसामुग्री असणे आवश्यक झाले होते पण त्यासाठी तिला हवी असणारी रक्कम बँक कर्ज म्हणून द्यायला तयार नव्हती. मात्र उद्योगसंबंधित एका परिसंवादात श्रीमीची गाठ उद्योगपती नारायण बांदेकर यांच्याशी पडली. श्रीमीनी आपली योजना त्यांच्या समोर मांडल्यानंतर बांदेकर समूह त्यांना कर्ज द्यायला तयार झाले. इतकेच नव्हे तर श्रीमीना कामही पुरवण्याचीची तयारी दर्शवली. साल होते 2016 आणि कर्जाची रक्कम होती 25 लाख! यंत्रसामग्री आली आणि मग श्रीमीच्या धडाडीने उद्योगांचा व्यापही वाढत गेला. आणलेल्या यंत्रसामुग्रीची क्षमता मोठी होती त्यामुळे श्रीमीनी आणखीन एक पाऊल उचलले. त्यांनी ‘प्रोजेक्ट एक्झिक्युशन’ क्षेत्रात उडी घेतली. एका जागेच्या सजावटीसाठी जे जे लागते ते आता बनवता येणे शक्य झाल्यामुळे या क्षेत्रातही त्या स्वावलंबी बनल्या. कुंडई येथील ‘क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज’ ची रिसेप्शन लॉबी, ‘एचक्यु’ हॉटेलच्या खोल्यांचे इंटेरियर डेकोरेशन, वगैरे. मग या क्षेत्रातही त्यांचा दबदबा वाढला.
पुढे दोनच वर्षांनी ॲल्युमिनियम कंपोझिट पॅनलची डिस्ट्रीब्यूटरशिप त्यांना मिळाली. आपल्या उद्यमशीलतेला त्यांनी सदैव जागृत आणि चलनात ठेवलं. आता कुठलीही बँक कितीही रकमेचं कर्ज त्यांना द्यायला तयार आहे. श्रीमिनी स्वतः आपल्या कर्तुत्वाने ती प्रतिष्ठा मिळवली आहे. आता त्या ‘गोवा चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री’च्या सन्माननीय सदस्या आहेत. त्या म्हणतात, आता त्यांना त्यांच्यासारख्याच धडाडीच्या असलेल्या परंतु संधीच्या शोधार्थ असलेल्या स्त्रियांना मदतीचा हात देणे आवडेल. आपण समाजाकडून जे मिळवले आहे ते समाजाला परत करण्याची वेळ आली आहे अशी त्यांची भावना आहे. गेल्या पंधरा वर्षात श्रीमीनी ज्या क्षेत्रात काम केले ते पूर्ण पुरुषी क्षेत्र होते. परंतु आपल्या श्रमानी, प्राणाणिकतेने श्रीमीनी ध्येयनिष्ठ स्त्री पुरुषापेक्षा तसूभरही कमी नसते हेच सिद्ध केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.