सप्रे यांच्या साहित्यातल्या वेगळ्या वाटा

साहित्य संमेलन किंवा साहित्यप्रेमींच्या गोतावळ्यापासून आणि प्रसिद्धीपासूनही अंतर राखून असलेले सप्रे, लेखनाशी त्यांची असलेली जवळीक मात्र जाणीवपूर्वक जतन करतात.
सप्रे यांच्या साहित्यातल्या वेगळ्या वाटा
सप्रे यांच्या साहित्यातल्या वेगळ्या वाटा Dainik Gomantak
Published on
Updated on

बाळ सप्रे हे शब्दवेधी, प्रयोगशील गोमंतकीय लेखक. कथा कादंबरी ललित हे त्यांचे आवडते वाङमय क्षेत्र. साहित्य संमेलन किंवा साहित्यप्रेमींच्या गोतावळ्यापासून आणि प्रसिद्धीपासूनही अंतर राखून असलेले सप्रे, लेखनाशी त्यांची असलेली जवळीक मात्र जाणीवपूर्वक जतन करतात. साहित्यक्षेत्रातल्या मळलेल्या वाटेने जाणं त्यांच्या स्वभावला व धर्माला मानवत नसावे. बहुतेकांच्या लेखनाची सुरुवात कवितेपासून, विशेषतः प्रेम कवितेपासून होते. सप्रे मात्र कवितेच्या वाटेने कधीच गेले नाहीत. कथात्म स्वरूपाच्या कथा, कादंबरी, ललित लेखन अशा लेखनातच ते रमले.

सप्रे मूळचे वेलींग गावचे. प्राथमिक शिक्षक. वय वर्षे 82 च्या उंबरठ्यावरचे ज्येष्ठ नागरिक. त्यांनी 1990 च्या सुमारास, बऱ्याच उशिरा, वयाच्या 40 च्या आसपास लेखनाला सुरुवात केली असावी. आता वय झालेल असले तरी सप्रे नव्या नवलाईने अजूनही लिहित आहेत. सप्रेना नाट्य अभिनयाचेही मनस्वी वेड होते. वयाच्या साठीपर्यंत त्यांनी उत्सवी रंगभूमीवरील नाटकातून महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. ‘कुंजविहारी’ नाटकातील पेंद्या ही त्यांची बालपणातली पहिली भूमिका. ‘करीन ती पूर्व’ (शहा), देवता (पदु), देवमाणूस (विलास), ‘वेगळं व्हायचंय मला’ (विनायक), ‘नातीगोती’ (पंडित), ‘वाहतो हि दुर्वांची जुडी’ (बाबा) ‘तनमाजोरी’ (मुकादम) अशा त्यांनी केलेल्या नाटकातल्या भूमिका आठवणीत राहिलेल्या आहेत. वयोमानामुळे आता नाटकात काम करणं जमत नसले तरी नाटकाची आवड आणि नाटकाच्या आठवणी मात्र मनात कायम आहेत.

त्यांना नाटकाचं (Drama) जसं उपजत वेड आणि आवड आहे तसंच पुस्तकांचं (Book) पण आहे. त्याकाळी त्यांनी वि. स. खांडेकर, ना. सी. फडके समरसून वाचले आहेत. पण त्यांच्या लेखनाचं आंधळे अनुकरण मात्र आपल्या लेखनात केले नाही. त्यांच्यासंबंधीच्या आणखी एका विशेषत्वाचा उल्लेख करायलाच हवा, तो म्हणजे वेलिंग येथे असताना ज्येष्ठ गोमंतकीय कथाकार लक्ष्मणराव सरदेसाई यांचे लेखनिक म्हणून त्यांनी अल्प काळ कार्य केले आहे. सरदेसाई यांची लेखनशैली आणि लेखन कार्यपद्धती त्यांनी आपल्या जडणघडणीच्या काळात जवळून अनुभवली. प्रारंभापासून थोरामोठ्यांच्या साहित्यिकांच्या आणि चांगल्या दर्जेदार पुस्तकांच्या (Book) सहवासात राहूनही ते स्वतःच्याच प्रज्ञेने आणि वृत्तीने लिखित लिहीत राहिले. त्यांनी स्वतःची अशी वेगळी साहित्य क्षेत्रातली वाट निर्माण केली. त्याचा प्रत्यय त्यांचे एकंदरीत साहित्य वाचताना येतो.

सप्रे यांच्या साहित्यातल्या वेगळ्या वाटा
गोव्यातील विठ्ठल आवदियेंकरांच्या कवितेतून झळकतो समंजसपणाचा सूर

त्यांनी बहुतेक ललित लेखन ‘दैनिक गोमंतक’ तसेच वेगवेगळ्या दैनिकांमधून केले. वर्तमानपत्रातून सदर लेखन करणाऱ्या लेखकाला खूप व्यवधाने पाळावी लागतात. वर्तमानपत्राच्या संपादकांनी आखून दिलेली शब्दमर्यादा व इतर बंधनेही पाळावी लागतात. वाचकांना घाईगडबडीत वाचता येईल अशा पद्धतीचे खुसखुशीत लिहावं लागतं. साधं सोपं लिहिणं खूप कठीण असते.

‘यक्षप्रश्न ज्याचा त्याचा’, ‘परीघ’, ‘भ्रमाचा भोपळा’, ‘मी चिंतामणी बोलतोय’, ‘संभ्रम’ (कथासंग्रह), ‘अपूर्णांक’, निवडुंग (कादंबऱ्या), ‘शब्दवेध’ (भाग 1 व 2) ही त्यांची काही प्रकाशित पुस्तके. ‘मी चिंतामणी बोलतोय’ आणि ‘भ्रमाचा भोपळा’ हे विनोदी कथासंग्रह. त्यातील कथा प्रायोगिक स्वरूपाच्या व आत्मकथनात्मक आकृतिबंधातील आहेत. विविध व्यक्तिरेखांचे त्यात दर्शन घडते. गोमंतकीय कथेला समृद्ध अशी परंपरा आहे. वी. स. सुखटणकर, बा. भ. बोरकर, लक्ष्मणराव सरदेसाई, पंडित महादेवशास्त्री जोशी इत्यादी कथाकारांनी मराठी कथेच्या मध्यवर्ती प्रवाहात राहूनही कथेतले स्वतःचे ‘गोमंतकीयत्व’ राखले. त्यानंतरच्या कथाकारांनी नवकथेच्या आकृतिबंधात राहून कथालेखन केले. गोमंतकीय कथेत मात्र आकृतिबंधाचे प्रयोग अभावानेच दिसतात.

सप्रे यांनी गोमंतकीय मराठी कथेत ‘यक्षप्रश्न’ या कथासंग्रहाच्या माध्यमातून संवादात्मक कथेचा प्रयोग केला आहे. तर ‘शब्दवेध: भाग 1 व 2’ मधुन संवादात्मक ललित लेखनाचे प्रयोग केले आहेत. संवादरूपातील छोटे छोटे प्रसंग लघुतम रूपात चितारून गोमंतकीय आणि कथा आणि ललित लेखनात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न त्यानी केला. वेगळं असं प्रयोगशील करणं हा त्यांचा लेखनगुण आहे. त्यांच्या लेखनात सभोवतालच्या वास्तव जीवनाचे प्रतिबिंब उमटतात. मनुष्यस्वभावातील विसंगतीवर ते नेमकेपणाने बोट ठेवतात. त्यांच्या लेखनात तरलता आणि त्याचं भाषाकौशल्यही दिसून येते.

त्यांच्या प्रयोगशील कथा-ललित लेखनाची दखल वाङमय क्षेत्रात नक्कीच घेतली जाईल. तीन पिढ्यांच्या आंतरिक संबंधाचे सूक्ष्मपणे चित्रण करणाऱ्या त्यांच्या ‘अपूर्णांक’ या कादंबरीची दुसरी आवृत्ती सध्या प्रकाशनाच्या वाटेवर आहे. ‘आम्ही दोघी’ ही नवीन कादंबरी (Novel) त्यांनी नुकतीच लिहून हातावेगळी केली आहे. वेगळ्या आकृतीबंधातल्या ह्या कादंबरीत त्यांनी वेगवेगळ्या पिढीतल्या दोन स्त्रियांच्या (Women) मनातला बंध रेखाटला आहे. गोवा (Goa) दूरदर्शन आणि नभोवाणीसाठीही त्यांनी लेखन केले आहे. सप्रे आपल्या वाढत्या वयाची पर्वा न करता सातत्याने लिहीत आहेत याची मुद्दाम दखल घ्यायलाच हवी.

- नारायण महाले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com