गोव्यातील विठ्ठल आवदियेंकरांच्या कवितेतून झळकतो समंजसपणाचा सूर

कवितांमधून कवितेचा विषय कुठलाही असला तरी विठ्ठल आवदियेंकरांच्या कवितेतून समंजसपणाचाच एक सूर ठळकपणे जाणवतो.
गोव्यातील विठ्ठल आवदियेंकरांच्या कवितेतून झळकतो समंजसपणाचा सूर
गोव्यातील विठ्ठल आवदियेंकरांच्या कवितेतून झळकतो समंजसपणाचा सूर Dainik Gomantak

‘तळहातावरील उलट्या-सुलट्या रेषा आणि प्राक्तनाचे संदर्भ नियतीच्या हाती देऊन आपण सुस्त असतो….’ याओळी आहेत विठ्ठल आवदियेंकर यांच्या हल्लीच प्रकाशित झालेल्या ‘मुक्त मन’ या कवितासंग्रहामधील एका कवितेच्या. हा कवितासंग्रह जरी हल्लीच प्रकाशित झाला असला तरी आवदियेंकर यांनी त्या लिहिल्या आहेत त्यांच्या युवा काळात. त्यांच्यामधल्या कवीने हातावरच्या रेषा आणि प्राक्तनांचे संदर्भ ज्याप्रमाणे नियतीच्या हातात सोपवले आहेत त्याचप्रमाणे त्या काळात लिहिलेल्या आपल्या कवितानाही त्यांनी नियतीच्या हातातच सोपवले असावे. अन्यथा त्या प्रकाशित व्हायला इतका उशीर न होता.

विठ्ठल आवदियेंकर हे मुळात शिक्षक (Teacher) . शिक्षकाला अभिप्रेत असणारा आदर्शवाद आणि विनम्र सभ्यता त्यांच्या कवितेमधल्या शब्दांमधून प्रतीत होत असते. (किंवा कदाचित त्यांच्यात वसुन असलेल्या त्यांच्या या स्वभाव वैशिष्ट्यांमुळेच ते शिक्षक बनले असावेत) त्यांच्या कवितांमधून कवितेचा विषय कुठलाही असला तरी समंजसपणाचाच एक सूर ठळकपणे जाणवतो. ‘संकटांचा वर्षाव सोसण्यास पोलादी बलदंड हवेत’ हे तथ्य जाणून घ्यायचा ते आपल्या कवितेमधून आग्रह करतात, तेव्हा त्यांच्या समंजस वृत्तीचेच दर्शन आपल्याला घडत असते.

गोव्यातील विठ्ठल आवदियेंकरांच्या कवितेतून झळकतो समंजसपणाचा सूर
गोव्यात मेईस्नेर तंत्रावर आधारित नाट्य कार्यशाळा

‘मुक्त मन’ हा त्यांचा पहिलाच काव्यसंग्रह. त्याआधी ‘प्रसंग’ हा त्यांच्या कोकणी कथांचा कथासंग्रह प्रसिद्ध झाला आहे. त्यांच्या या कवितासंग्रहाला प्रसिद्ध गोमंतकीय कवी पुष्पाग्रज यांची प्रस्तावना लाभली आहे. त्यात पुष्पाग्रज लिहितात, ‘कविता या संज्ञेची व्याख्या करणे कठीण असते. व्यक्तिगणिक ती बदलू शकते. कोणी व्रत म्हणून कवितेचा स्वीकार करतात, कोणी स्वांतसुखाय कविता लिहितात तर कोणी प्रासंगिक प्रकटीकरणासाठी कवितेचा अंगीकार करतात. या तीनही प्रकारातील कवींना कमी-अधिक लेखता येणार नाही. कारण मुळात ते संवेदनशील असतात. त्यांच्या निर्मितीचे श्रेष्ठत्व आपण काळाच्या कसोटीवर सोडून द्यायचे असते. विठ्ठल आवदियेंकर यांच्या कवितांचे लेखन हे बरेच त्यांच्या तारुण्यसुलभ वयातले असावे. त्यांच्या कवितात भावविवशता असली तरी कवी मनाची तडफड मात्र निश्चितपणे जाणवते. भावविवशतेच्या मर्यादा पार करून हा कवी जेव्हा वैश्विक सत्याकडे पाहू लागतो तेव्हा त्यांच्या कवितेची खरी ओळख पटते.

‘आज माझे मन पाखरू मनमोकळे उडणार आहे नसते पाश तोडून सारे दूर दूर जाणार आहे....’ ही दिगंताची जाणीव कवीला जितकी प्रकर्षाने होते तितकी ती सामान्यांना होत नसते. म्हणून तर रवींद्रनाथ म्हणतात आम्ही की? आम्ही कोथाय?’ ‘यातले काहीच नाही झाले नुसते भेटीत मन न्हाले सांगायचे राहून गेले, दिवस असेच सरते झाले....’ कवीकडे कदाचित, अजून सांगण्यासारखे बरेच असेल. तेव्हा त्यांनी ‘मुक्त मना’तून लिहिल्याप्रमाणे दिवस सरते करू नयेत, अर्थात याबाबतीत त्यांनी आपल्या कवितेतूनच दिलेल्या आश्वासनानुसार आपल्याला त्यांच्यावर त्याबाबतीत विश्‍वासही ठेवता येईल. कारण तेच म्हणतात, ‘वेगळ्या जगण्यात मन, मंत्रमुग्ध होणार आहे आगळ्या शब्दात मग, नवी कविता रचणार आहे. विठ्ठल आवदियेंकर यांच्या भावी नव्या कवितेला आताच शुभेच्छा!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com