Vinayak Mete Biography : विनायक मेटे हे भारतीय राजकारणी आणि शिवसंग्राम पक्षाचे नेते होते. माजी आमदार आणि शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे महाराष्ट्रातील मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातात निधन झाले. मुंबईपासून 70 किमी अंतरावर खोपोली शहराजवळ मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर हा अपघात झाला. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.
पाच वेळा विधान परिषद सदस्यत्व
शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायकराव मेटे होते. 30 जून 1970 रोजी एका सामान्य कुटूंबात त्यांचा बीड येथे जन्म झाला. विनायकराव मेटे यांचे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात झपाट्याने पुढे आले होते. शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांच्या नावावर पाच वेळा विधान परिषद सदस्यत्व मिळविण्याचा रेकॉर्ड आहे स्वातंत्र्यलढा आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ यांचा त्यांच्या विचारांवर खोलवर परिणाम झाला होता. विनायक मेटे 2016 मध्ये भाजपच्या कोट्यातून बिनविरोध आमदार म्हणून निवडून आले होते.
महाराष्ट्र लोकविकास पक्षाची स्थापना
बीड जिल्ह्यातील राजेगाव (ता. केज) या खेडेगावचे ते मुळ रहिवाशी होते. त्यांनी व्यवसायानिमित्त मुंबई गाठली याचवेळी त्यांचा मराठा महासंघाशी संबंध आला. आणि यातूनच त्यांनी आपल्या सामाजिक कामाला सुरुवात केली. पहिल्या युती सरकारच्या काळात म्हणजे 1995 साली त्यांना विधान परिषदेवर पहिल्यांदा मोठी संधी मिळाली होती. याच दरम्यान त्यांनी महाराष्ट्र लोकविकास पार्टी या पक्षाची स्थापना केली.
विधान परिषदेची तिसरी टर्मही पुर्ण
चर्चेत आल्यानंतर काही काळातच विनायक मेटे यांचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी संबंध तयार झाले. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर मेटे यांनी आपला पक्ष राष्ट्रवादीत विलीन केला. त्यानंतर राष्ट्रवादीने त्यांना उपाध्यक्ष पदासह दोन वेळा विधान परिषदेवरही संधी दिली. मात्र मागच्या लोकसभा निवडणूकीच्या वेळी त्यांनी भाजपसोबत आघाडी केली. पक्षांतरामुळे मेटे यांचे विधान परिषद सदस्यत्व रद्द झाल्यानंतर भाजपने त्यांना पुन्हा संधी दिली आणि त्यांनी विधान परिषदेची तिसरी टर्मही पुर्ण केली. आता चौथ्या वेळेस ते विधान परिषदेचे सदस्य म्हणून काम करत होते.
बीड जिल्ह्यात मोठा जनसंपर्क उभा केला
विनायक मेटे यांनी शिवसंग्राम पक्षाची स्थापना केल्यानंतर त्यांनी राज्यासह बीड जिल्ह्यात मोठा जनसंपर्क उभा केला होता. मराठा आरक्षणाच्या बाबतीत कोणतीही घटना असेल तर ती थेट त्यांच्याशी जोडली जायची. मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनातील मेटे हे महाराष्ट्रातील मुख्य नेते होते. मराठा आरक्षणासाठी त्यांनी राज्यात अनेकदा आंदोलनं केली आहेत. एवढच काय तर ते अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचे अध्यक्ष देखील होते. पहिल्यांदा शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात आमदार त्यानंतर सलग पाच टर्म विधानपरिषद सदस्य म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे.
अनेक मोठ्या निर्णयाचे साक्षिदार
महाराष्ट्रातील मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण, स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवारांचे वय वाढविणे अशा अनेक सामाजिक विषयांसाठी त्यांनी जबाबदारीने पुढाकार घेतला होता. त्यांच्या मराठवाडा लोकविकास मंचतर्फे राज्यात मोठं काम करणाऱ्या मराठवाड्यातील नामांकीत व्यक्तींना मराठवाडा भूषण पुरस्काराने गौरविले जाते. यामध्ये आतापर्यंत दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख, दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे, दिवंगत गोविंदभाई श्रॉफ आदींचा गौरव करण्यात आला आहे.
मराठा समाजाला मोठा धक्का
माजी आमदार मेटे बीडहून मुंबईला जात होते. मात्र पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांच्या गाडीला अपघात झाला. विनायक मेटे यांचे गोपीनाथ मुंडे यांच्याशी अतिशय जवळचे संबंध होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपशी हातमिळवणी केली. यापूर्वी ते राष्ट्रवादीचे समर्थक होते. मेटे हे मराठा समाजासाठी काम करण्यासाठी ओळखले जात होते, त्यांच्या निधनाने या समाजाला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.