Zuari Bridge Traffic : कुठ्ठाळीतील वाहतूक कोंडीवरुन युरी आलेमाव यांनी सरकारला धरलं धारेवर; म्हणाले...

वाहतूक कोंडीचे तीन व्हिडिओ जारी करून युरी आलेमाव यांनी सावळ्या गोंधळाने वाहतूक कोंडीचा उडालेला बोजवारा उघड केला आहे.
Zuari Bridge
Zuari BridgeDainik Gomantak

Zuari Bridge Traffic : रस्त्यांवर उभे केलेल्या अनावश्यक बॅरिकेड्समुळे वाहनांची होणारी संथ गती, वाहतूक व्यवस्थापनाबाबत अनभिज्ञ असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची कुठ्ठाळी जंक्शनवर तैनाती आणि दिशादर्शक चिन्हांचा अभाव यामुळे कुठ्ठाळी येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. सरकारच्या दुर्लक्षामुळे ही मानवनिर्मित वाहतूक कोंडी झाली आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला आहे. आज सोमवारी कुठ्ठाळी येथे झालेल्या वाहतूक कोंडीचे तीन व्हिडिओ जारी करून, युरी आलेमाव यांनी सावळ्या गोंधळाने वाहतूक कोंडीचा उडालेला बोजवारा उघड केला आहे.

युरी आलेमाव यांनी जारी केलेल्या व्हिडीओमध्ये कुठ्ठाळी जंक्शनवरील वाहतुकीचे संपूर्ण गैरव्यवस्थापन दिसून येत असल्याचं दिसत आहे. याठिकाणी तैनात असलेल्या वाहतूक पोलिसांना योग्य प्रशिक्षण देण्याची गरज आहे. कुठ्ठाळीच्या बाजूने झुआरी पुलावर जाणाऱ्या मार्गावरील रेल्वे ट्रॅकच्या खाली रहदारीवर देखरेख ठेवण्यासाठी होमगार्डना जबाबदारी देणे हे धक्कादायक आहे, अशी युरी आलेमाव यांनी म्हटलं आहे.

सणासुदीमुळे मडगाव-पणजी मार्गावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने, पणजी आणि मडगावकडून येणाऱ्या आणि वास्कोकडे जाणाऱ्या वाहनांसाठी कुठ्ठाळी जंक्शनच्या आधी 500 मीटर अंतरावर लेनचे सीमांकन करण्यात यावे, अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली आहे. या लेनचे सीमांकन केल्याने वाहन चालकांकडून अचानक लेन बदलणे थांबेल आणि रहदारी सुरळीत होण्यास मदत होईल, असे युरी आलेमाव यांनी म्हटलं आहे.

Zuari Bridge
Mopa Airport: कोण, कधी, कुठे? मोपा विमानतळाबाबत सर्व प्रश्नांची मुख्यमंत्र्यांनी दिली उत्तरे

वाहतुकीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सरकारने प्रशिक्षित वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात केले पाहिजेत. केसरवाळ ते कुठ्ठाळी जंक्शनपर्यंत विविध ठिकाणी लावलेले अनावश्यक बॅरिकेड्स काढून टाकले पाहिजेत आणि वास्को, पणजी आणि मडगावला जाणाऱ्या वाहनांच्या लेनचे सीमांकन करून योग्य दीशादर्शक फलक लावले पाहिजेत, अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली.

नेहमीच्याच झालेल्या वाहतूक कोंडीत रुग्णाला घेऊन जाणारी रुग्णवाहिका अडकल्यास रुग्णाचा जीव जाऊ शकतो. आज अनेक शाळकरी मुले त्यांच्या शाळेत वेळेवर पोहोचू शकली नाहीत. कार्यालयीन कर्मचाऱ्यांना वेळेत कामावर पोचणे अवघड होते. वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी प्रवाशांना भेडसावणाऱ्या वाहतुकीच्या त्रासाचा अंत करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश द्यावेत अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com