
मडगाव: एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ज्या तालुक्याकडे पाहिले जात होते, त्या सासष्टी तालुक्यावर आपला कब्जा स्थापन करण्यासाठी गोवा फॉरवर्ड आणि आम आदमी पक्ष या दोन्ही पक्षांनी काम करण्यास सुरू केले असून या पार्श्वभूमीवर काँग्रेस गोटात मात्र अगदी शांततेचे वातावरण आहे.
येणारी जिल्हा पंचायत निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून गोवा फॉरवर्ड आणि ‘आप’ या दोन्ही पक्षांनी आपला विस्तार सुरू केला आहे. काल दसऱ्याच्या मुहूर्तावर गोवा फॉरवर्डने रायचे माजी सरपंच लुईस क्वॉद्रूश यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन आपले इरादे स्पष्ट केले. त्यापूर्वी गोवा फॉरवर्डने नावेलीतही आपला उमेदवार जिल्हा पंचायत निवडणुकीत उतरविला जाणार, हे स्पष्ट केले होते.
गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करताना, जिल्हा पंचायत निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून आम्ही आमच्या पक्षाचा विस्तार हाती घेतला आहे. आम्हाला गोव्यातील मतदारांना गोवावादी पर्याय द्यायचा आहे. त्यामुळे खालच्या स्तरापासून वरपर्यंत निवडणुका लढविण्याची आम्ही तयारी ठेवली आहे. नावेली आणि राय जिल्हा पंचायत मतदारसंघांतून आम्ही निवडणुकीत उतरणार, असे त्यांनी सांगितले.
यापूर्वी नुवे मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारीवर जिंकून आलेले आमदार आलेक्स सिक्वेरा यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांच्याबरोबर जे कार्यकर्ते होते त्यांच्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली हाेती. त्याचाच फायदा घेऊन गोवा फॉरवर्डने या मतदारसंघासाठी आपला उमेदवार हेरण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत.
दुसऱ्या बाजूने आम आदमी पक्षानेही येणारी जिल्हा पंचायत निवडणूक अगदी गांभीर्याने घेण्याचे ठरविले असून सासष्टी तालुक्यात येणाऱ्या आठही मतदारसंघांतून हा पक्ष आपले उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आहे. यासाठी ‘आप’ने कार्यकर्त्यांची फळीच सासष्टी तालुक्यात उतरवली असून सासष्टी तालुक्यात आपले राजकीय वजन वाढविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.
सध्या सासष्टीतील बाणावली जिल्हा पंचायत मतदारसंघ ‘आप’च्या ताब्यात आहे. त्यापाठोपाठ गिरदोली मतदारसंघावर ‘आप’ने आपले लक्ष केंद्रीत केले आहे. मागच्या महिन्यात आम आदमी पक्षाने चांदरचे माजी सरपंच सावियो हेन्रिक्स यांना आपल्या पक्षात घेतले होते.
हेन्रिक्स यांना पक्षात सामावून घेऊन कुंकळ्ळी विधानसभा मतदारसंघात आपला प्रभाव वाढविण्यासाठी ‘आप’चे प्रयत्न आहेत. त्याशिवाय कुडतरी मतदारसंघावरही ‘आप’ने आपले लक्ष केंद्रीत करताना कामाला सुरुवात केली आहे.
या संपूर्ण पार्श्वभूमीवर काँग्रेस गोटात मात्र अगदी शांतता दिसून येत असून एकाही ठिकाणी अजून काँग्रेसने काम केले नाही. सासष्टीतील आठ जिल्हा पंचायत मतदारसंघांपैकी फक्त एका मतदारसंघात मागच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार जिंकून आला होता. अशी परिस्थिती असतानाही सासष्टीत आपली स्थिती सुधारण्यासाठी काँग्रेसने अजूनही हात-पाय हलविण्यास सुरुवात केलेली नाही.
आम आदमी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जर्सन गोम्स यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना, जिल्हा पंचायत निवडणुकीद्वारे गोव्यात आमच्या पक्षाचा पाया आणखी भक्कम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
प्रत्येक मतदारसंघावर लक्ष ठेवून आम्ही काम सुरू केले आहे. सध्या गोव्यातील चाळीसही मतदारसंघांत आमचे तीनस्तरीय काम सुरू असून त्यासाठी आमच्या केंद्रीय नेत्या आतिषी यांच्यासह अन्य नेतेही गोव्यात ठाण मांडून आहेत, असे त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.