

फोंडा: माजी मुख्यमंत्री तथा फोंड्याचे आमदार रवी नाईक यांच्या आकस्मिक निधनामुळे फोंडा मतदारसंघातील एकमेव असलेल्या कुर्टी जिल्हा पंचायतीची समीकरणे बदलण्याचे संकेत मिळायला लागले आहेत. १३ डिसेंबरला होणाऱ्या झेडपी निवडणुकीवर यामुळेच सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व मगो पक्षाच्या प्रिया च्यारी या करत असून येणाऱ्या निवडणुकीतही त्याच परत रिंगणात उतरू शकतात, अशी माहिती मिळाली आहे. मात्र, भाजप त्यांना पाठिंबा देणार की आपला उमेदवार उतरविणार हे अजून स्पष्ट झालेले नाही. फोंड्याच्या येणाऱ्या पोटनिवडणुकीत मगोने भाजपला पाठिंबा देण्याचे जाहीर केल्यामुळे त्याच्या बदल्यात झेडपी
निवडणुकीत भाजप कुर्टी झेडपी निवडणुकीत मगोला पाठिंबा देऊ शकतो, असा होरा व्यक्त केला जात आहे.
कुर्टी झेडपी निवडणुकीत फोंडा मतदारसंघातील कुर्टी-खांडेपार पंचायतीबरोबर प्रियोळ मतदारसंघातील वेरे-वाघुर्मे पंचायतीचाही समावेश असल्यामुळे या झेडपीवर मगोचा प्रभाव अधिक दिसून येत आहे. त्यामुळे भाजप हा मतदारसंघ मगोला सोडण्याची शक्यता अधिक वाटत आहे. रवी असते तर ते भाजपचा उमेदवार रिंगणात उतरवू शकले असते. तशी रणनीती त्यावेळी आखली जात असल्याची माहिती प्राप्त झाली होती. पण आता भाजपला फोंडा पोटनिवडणुकीवर
लक्ष केंद्रित करायचे असल्यामुळे ते कुर्टी झेडपी मतदारसंघ मगोला देऊ शकतात. यामुळे विद्यमान झेडपी सदस्य च्यारी यांची बाजू भक्कम होऊ शकते.
दुसऱ्या बाजूला काँग्रेसची रणनीती अजूनही अस्पष्ट आहे. मध्यंतरी कुर्टी-खांडेपार पंचायतीचे माजी सरपंच जॉन परेरा हे काँग्रेसतर्फे झेडपी निवडणूक लढविणार, अशी हवा होती. पण ते खरेच रिंगणात उतरतात की काय याचे उत्तर अजूनही मिळालेले नाही.
त्याचबरोबर काँग्रेसला आप, गोवा फॉरवर्ड, आरजी हे पक्ष पाठिंबा देणार की काय, याचे उत्तरही सापडलेले नाही. पण सध्यातरी भाजप-मगो युती व काँग्रेस यांच्यात लढत होण्याची अधिक शक्यता वाटत आहे. या निवडणुकीनंतर फोंडा पोटनिवडणूक होणार असल्यामुळे कुर्टी झेडपी निवडणूक रंगण्याची चिन्हेही दिसायला लागली आहेत. आता नेमके काय होते याचे उत्तर येत्या महिन्याभरातच मिळणार आहे, हे निश्चित.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.